श्रीरामपूर / प्रतिनिधी:
रयत शिक्षण संस्थेच्या जेऊर येथील श्री संतुकनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांनी शिक्षण सप्ताहानिमित्त 'पाणी वाचवा' असा जनजागृती संदेश दिला आहे.
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने २२ ते २७ जुलै २०२४ अखेर संपूर्ण राज्यभर सर्व शाळा आणि महाविद्यांमध्ये शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिक्षण सप्ताहानिमित्त नुकतीच अहमदनगर तालुक्यातील जेऊर येथील श्री संतुकनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य डॉ. ए एन सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची 'पाणी वाचवा' याविषयी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीतून विद्यार्थ्यांनी कागदी फलकांवर पाणी वाचविण्याचे विविध घोषवाक्य लिहून पाण्याच्या बचतीचा महत्त्वपूर्ण संदेश ग्रामस्थांना दिला. जेऊरच्या बाजारपेठेत आणि गल्लीतून आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन पाणी वाचविण्याविषयी ग्रामस्थांची जनजागृती केली. यावेळी प्राचार्य सिद्दिकी यांनी पाणी वाचवणे ही काळाची गरज असून यासाठी तरुणपिढीने पुढे यावे आणि ग्रामस्थांनी पाणी वाचवण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111