shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथी निमित्त रामदरा येथे वृक्षारोपण


लोणी काळभोर / प्रतिनिधी: 
इतिहासात अजरामर झालेले वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदीर परिसर येथे ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या हस्ते पिंपळ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी गणेश काळभोर हवेली तालुकाध्यक्ष, गणेश पातडे, दादा कोळपे,सचिन महानवर,प्रविण जाधव, अभिषेक शेंडगे उपस्थित होते. 

दोन मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला होता. या वेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसातसुद्धा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला. त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. वीर शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्धी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. वीर शिवा काशीदचे खरे रूप कळल्यावर सिद्धीने त्यास ठार केले. तोपर्यंत छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते. छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर, सिद्दीने, सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले. त्या वेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना ‘ते विशाळगडावर पोहोचून तोफांनी इशारा करत नाहीत, तोपर्यंत ही खिंड लढवली जाईल,’ असे सांगितले. घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला. महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला. इकडे घोडखिंडीत वीर बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच समाधानाने आपला प्राण सोडला. वीर बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड, पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.

*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार तुषार महाजन, शिर्डी 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close