shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

क्षमता तयार करण्यासाठी विविध कला उपक्रमाचे सातत्य हवे - कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज


राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगाव (कर्नाटक) व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा (महाराष्ट्र) मराठी विभाग आयोजित राष्ट्रीय कार्यशाळा बेळगावमध्ये संपन्न 

बेळगांव (कर्नाटक) प्रतिनिधी:
आजच्या काळात केवळ पैशाचा प्रश्न महत्वाचा नसून शिक्षणात क्षमतेचा प्रॉब्लेम आपल्याला जाणवत आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढीसाठी कौशल्यवृद्धीसाठी पर्यावरण निर्माण करून देणारे आणि विद्यार्थ्यांना आनंदाने शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची गरज जाणवत आहे.विद्यार्थ्यांना  भाषिक व अन्य कला विषयक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी नृत्य,नाट्य,संगीत,साहित्य कला महोत्सव आपण सुरु केले पाहिजेत. विद्यार्थ्यांना आनंद मिळायला हवा आणि शिक्षण मिळायला हवे.केवळ मार्क्स मिळवण्यासाठी शिक्षण नसून विविध प्रकारच्या क्षमता विद्यार्थ्यांना मिळतील या साठी पर्यावरण तयार करा.मराठी विभागात मोठ्या प्रमाणात वर्षभर नवनवीन उपक्रम सुरु ठेवावेत.भाषेशी संबंधित गायन,वादन,नाटक सादरीकरण,वक्तृत्व,साहित्यलेखन,संशोधन झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी सजग असावे. विद्यार्थ्यांनो तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्हाला भय किंवा चिंता करण्याची गरज नाही. क्षमता तयार करण्यासाठी विविध कलाविषयक उपक्रमाचे आयोजन  मराठी विभागात करायला  हवे’‘असे विचार राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी.एम. त्यागराज यांनी व्यक्त केले.राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभाग व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने."मराठी भाषा आणि साहित्य : संशोधनाच्या नव्या दिशा" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  उद्घाटन  समारंभात कुलगुरू बोलत होते. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ सुभाष वाघमारे,  मराठी विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत वाघमारे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. नंदकुमार मोरे, गोवा विद्यापीठ मराठी विभागातील प्रा. विनय मडगावकर, डॉ. मनीषा नेसरकर, प्रा. डॉ. मैजुद्दीन मूतवल्ली, डॉ. संजय कांबळे उपस्थित होते. प्रारंभी रोपट्याला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 


 विद्यापीठाशी सलग्न  महाविद्यालयातील मराठी विभागातील विद्यार्थी , विद्यापीठातील विद्यार्थी , प्राध्यापक यांचेशी संवाद साधत कुलगुरू त्यागराज  पुढे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनो नेहमीच वाचन करत रहा. बोलण्याची व शिकण्याची कला महत्त्वाची आहे. सतत नवनवीन कल्पना राबविल्या पाहिजेत. तुम्ही लिहिते व्हा. तुमची आकलन क्षमता वाढवा. आपल्या वयातील २० ते ४० हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. यातून आपल्याला खूप काही करता येते. ती तळमळ स्वतः ठेवली पाहिजेत. माझ्या चार वर्षांच्या कार्यकाळात माझ्याकडून जितके सहकार्य हवे तितके मी देईन. मराठी विभाग चांगला झाला पाहिजे. नेहमीच साहित्याची पूजा करा, असेही ते म्हणाले.

 प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा.डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले की ‘ संशोधन हे मानवी हितासाठी करायचे असते. संशोधनाची सुरुवात प्रश्न किंवा समस्येपासून होते. वाचनातून किंवा भोवतालच्या पर्यावरणात जगताना आपल्याला समस्या जाणवतात. समस्येचे यथार्थ आकलन करून घेणे म्हणजे सत्य शोधणे असते. संशोधनात सत्याचा शोध जसा महत्वाचा तसे  हिताचे काय याचा शोध पद्धतशीरपणे मांडणे आवश्यक असते. संशोधक विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे असायला हवेत. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकस मध्ये सादर केला. ब्रिटीश सरकार पौंडच्या तुलनेने रुपयांचे अवमूल्यन करून शोषण करीत आहे. असा निष्कर्ष त्यांनी पुराव्यानिशी मांडला. ब्रिटीश सरकारला दोष देणारे लेखन म्हणून  परीक्षकांनी प्रबंध आशयात बदल करा अन्यथा  डॉक्टरेट पदवी देता येणार नाही असे सांगितले. डॉ .आंबेडकर यांनी ब्रिटीश सरकारच्या अहवालाचे आधारे लेखन केल्याचे सांगून  आशयातील शब्दही एक बदलणार नाही अशी भूमिका घेतली.आपल्या निष्कर्षावर ठाम राहण्याचे धैर्य त्यांनी अभ्यासामुळे दाखवले होते.  त्यामुळे परीक्षक देखील विचारात पडले.शेवटी आशय न  बदलता भाषा सौम्य करून घेत त्यांनी  बाबासाहेब यांना डी.एस.सी पदवी दिली .  देशाच्या हितासाठी योग्य विषय निवडून सत्य परिस्थिती दाखवणारे संशोधन बाबासाहेब यांनी  केले. संशोधक विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घ्यावा.  या प्रकारचे संशोधन विद्यार्थ्यांनी करायला हवे .आपले प्रबंध समाज उपयोगी असावेत.समाजातले प्रश्न शोधा त्यावर संशोधन करा, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात  डॉ. चंद्रकांत  वाघमारे यांनी मराठी विभागातील उपक्रमांची माहिती दिली. डॉ. नेसरकर यांनी कुलगुरू व पाहुण्यांची ओळख करून दिली. स्वागत गीत पूजा कांबळे यांनी म्हटले.. सूत्रसंचालन नविजन कांबळे यांनी केले. आभार डॉ.संजय कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी पीएच.डी.चे विद्यार्थी सुधाकर जोगळेकर, संतोष मादाकाचे, सुवर्णा पाटील, पूजा कांबळे, प्रियंका भांदुर्गे, नेहा देसाई आदीने परिश्रम घेतले. सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक व विद्यार्थी, तसेच विद्यापीठांशी सलग्न असणाऱ्या  कर्नाटकातील  विविध महाविद्यालयातील मराठी विषयाचे  प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यशाळेला उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख, पदवी व पदव्युत्तर मराठी अभ्यास व संशोधन केंद्र, 
प्रसिद्धी विभागप्रमुख
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. 
(घटक महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा)
भ्रमणध्वनी: ९८९०७२६४४०
*संकलन:*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close