श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टि२० विश्वचषक विजेत्या टिम इंडियाने तीन टि२० सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिकेवर आधीच कब्जा केला होता. त्यामुळे तिसरा सामना केवळ औपचारीकता म्हणून बनून राहिला होता. या सामन्यात भारत आपल्या बेंच स्ट्रेंग्थला संधी देणार हे होणार उघड होतेच व झालेही तसेच. हार्दिक, अक्षर, पंत व अर्शदिप या चार प्रमुख खेळाडूंना आराम देऊन वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, शुभमन गिल व शिवम दुबेला संधी दिली. त्यावेळी प्रश्न इतकाच होता की भारत हा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश देणार का ? यजमानांची लाज राखण्यासाठी हसत खेळत पराजय ओढवून घेणार ?
प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने पॉवर प्लेमध्येच अवघ्या ३० धावात चार प्रमुख फलंदाज गमावले तेंव्हा भारताने वर उल्लेखलेला दुसरा पर्याय तर निवडला नाही ना ? असे वाटून गेले. पण या पडझडीत रियान पराग व मागच्या सामन्यात पाठदुखीमुळे खेळू न शकलेला उपकर्णधार शुभमन गिलने अर्धशतकी भागीदारी करून संघाची लाज राखली. कदाचित या भागीदारीमुळेच भारतीय गोलंदाजांना किमान लढत देण्याइतपत धावांच पाठबळ मिळालं.
कँडी स्थित पल्लेकेले येथे मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टि सामन्यात भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग बॅटने नव्हे तर चेंडूने हिरो बनले. श्रीलंकेच्या संघाला बारा चेंडूत नऊ धावांची गरज असताना आणि सहा विकेट शिल्लक होत्या, तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही. रिंकू सिंगला आश्चर्यजनक निर्णय घेत कर्णधार सुर्याने १९ व्या षटकात गोलंदाजीला आणले आणि त्याने तीन धावांत दोन गडी बाद केले. रिंकूने कुशल परेरा (३४ चेंडूत ४६) आणि रमेश मेंडिस (सहा चेंडूत ३ धावा) यांना बाद केले.
अखेरच्या षटकात श्रीलंकेला सहा धावांची गरज होती. त्यानंतर कोणीही विचार केला नसेल की हे निर्णायक षटक सुर्यकुमार यादव टाकेल. मात्र सुर्याने धाडसी निर्णय घेत कर्णधार कसा बोल्ड असतो हे त्याने दाखवून देत यशापयशाचे खापर थेट आपल्या माथी घेतले आणि चक्क गोलंदाजीला आला. त्या शेवटच्या षटकात दोन विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. त्याने कामिंदू मेंडिस (३ चेंडूत १ धाव) आणि महेश तिक्षणा (एक चेंडूत ० धाव ) यांना बाद करून केवळ पाच धावा दिल्या आणि सामना टाय करवला. सुपरओव्हरमध्ये श्रीलंकेचा संघ केवळ दोन धावा करू शकला आणि भारताला तीन धावांचे लक्ष्य मिळाले. पहिल्या चेंडूवरच चार धावा करून भारताने विजयावर शिक्कामोर्तब केला. सुर्यकुमारने चेंडू फाइन लेग बाऊंड्रीबाहेर पाठवला आणि या विजयासह श्रीलंकेला क्लिन स्विप दिला.
भारताने रोमहर्षक सामना जिंकून श्रीलंकेला ३-० असा व्हाईटवॉश दिला. भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला. भारतीय फलंदाजांना फिरकी जादूगारांमध्ये बदलण्याचे श्रेय नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना दिले. एका नेटकऱ्याने तर रिंकू सिंग, सुर्यकुमार यादव आणि रियान पराग या तिघांची तुलना शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन आणि अनिल कुंबळे या दिग्गज फिरकी गोलंदाजांशी केली.
तत्पूर्वी, महेश तिक्षाणा (२८ धावांत तीन) आणि वानिंदू हसरंगा (२९ धावांत दोन) बळी यांच्या फिरकीच्या जादूने श्रीलंकेने तिसऱ्या आणि अखेरच्या टि२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताला नऊ बाद १३७ धावांवर रोखले. भारताकडून सलामीवीर आणि उपकर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक ३९ धावा केल्या. त्याने रियान पराग (२६) सोबत सहाव्या विकेटसाठी ५४ धावा जोडून भारताला नामुष्कीपासून वाचवले. अखेरच्या काही षटकात वॉशिंग्टन सुंदर (२५) आणि रवी बिश्नोई (नाबाद ८) यांनी आठ गड्यासाठी ३२ धावा जोडून संघाला १३७ धावांपर्यंत पोहोचवले.
तिक्षणा आणि हसरंगा यांच्याशिवाय श्रीलंकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या चामिंडू विक्रमसिंघे (१७ धावांत एक बळी), असिथा फर्नांडो ११ धावांत एक विकेट आणि रमेश मेंडिस २६ धावांत एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात एक वेळ श्रीलंकेची एक बाद ११० अशी सशक्त प्रकृती होती. तेंव्हा भारतीय संघ हा सामना जिंकू शकेल असे वाटले नव्हते. मात्र, रिंकू व सुर्यकुमारच्या अफलातून माऱ्यानंतर सुपरओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या शानदार गोलंदाजीमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला.
वास्तविक सामना सुपर ओव्हरपर्यंत जायलाच नको होता. श्रीलंकेच्या हातातोंडातला विजय त्यांना घशात घालता आला नाही यात त्यांच्या फलंदाजांची हाराकिरी व दबावाचा सामना करण्यात असलेली कमजोरी प्रामुख्याने कारणीभूत ठरली, कुशल परेरा, कुशल मेंडिस व पथुन निसांका या तिघांनी मिळून १३७ मधल्या १०८ धावा केल्या मात्र बाकीच्या फलंदाजांना एक वाढीव धाव काढता आली नाही. श्रीलंकेच्या डावात भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने वाईड चेंडूची खिरापत वाटूनही श्रीलंकेला सामना जिंकता आला नाही.
शेवटी नियतीच्या मनात होतं तेच घडलं आणि भारताने निर्विवाद वर्चस्व राखत मालिका जिंकली व आपले विश्वजेतेपद सार्थक ठरवले.
लेखक :-
डॉ. दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो.नं. : - ९०९६३७२०८२