shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पुरुषांचा कित्ता गिरविण्यात भारतीय महिला अपयशी


               श्रीलंकेविरुद्धची तीन टि२० सामन्यांची मालिका भारताने जिंकली आहे. रविवारी झालेल्या सलग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार सुर्यकुमार यादव यांनी झोकात कामगिरी केली. पल्लेकेले स्टेडियमवर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १६२ धावांचे लक्ष्य ठेवले पण भारतीय डावाला सुरुवात होताच हवामान अडथळा ठरले. पावसामुळे सामना बराच वेळ थांबवावा लागला आणि सुरू झाल्यावर षटके कमी करण्यात आली. डिएलस मेथडनुसार भारताला नवे लक्ष्य मिळाले, ते आठ षटकांत ७८ धावांचे. भारताने ६.३ षटकातच ८१ धावा केल्या आणि मालिकेत २-० अशी दणदणीत आघाडी घेतली.


              विजयासाठीच्या लक्षाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्या टि२० सामन्यानंतर पाठदुखीने त्रस्त झालेल्या शुभमन गिलच्या जागी सलामीला आलेला संजू सॅमसन दुसऱ्याच षटकात शून्यावर बाद झाला. अशा परिस्थितीत यशस्वी आणि कर्णधार सुर्यकुमार यादवने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतले. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली.  यशस्वीने पंधरा चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या. सुर्याने बारा चेंडूत २६ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि एक षटकार पडला.  यशस्वी पाचव्या षटकात तर सुर्या सहाव्या षटकात बाद झाला. अष्टपैलू हार्दिक पांड्याने ९ चेंडूत २२ धावा करत विजयाचा उंबरठा ओलांडला. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दोन धावा करून नाबाद राहिला.

             तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला विस षटकात नऊ बाद १६१ धावांवर रोखले. शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने शेवटच्या सहा बळी ३१ धावांत गमावले होते. पहिल्या दहा षटकांत ८० धावा करूनही श्रीलंकेचा संघ मोठा धावा करू शकला नाही आणि शेवटच्या दहा षटकांत त्यांना केवळ ८१ धावा करता आल्या. हार्दिकने दोन षटकांत २३ धावा देऊन दोन बळी, तर रवि बिश्नोईने चार षटकांत २६ धावा देऊन चार बळी घेतले. तोच सामनावीर म्हणून निवडला गेला. श्रीलंकेसाठी पथुन निसांकाने २४ चेंडूत ३२ धावा केल्या तर कुशल परेराने ३४ चेंडूत ५४ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी सहा षटकांत ५४ धावा जोडल्या. 

            त्यानंतर अष्टपैलू दासून शनाका (०) आणि वानिंदू हसरंगा (०) बेजबाबदार फटके खेळून बाद झाले. एकवेळ श्रीलंकेची धावसंख्या पंधरा षटकांत दोन बाद १३० धावा होती, पण मधल्या फळीच्या ढिसाळ खेळामुळे दहा चेंडूंत चार विकेट पडल्या, त्यात एक धावबादही होता. कर्णधार सुर्यकुमार यादवने युवा रियान परागसह गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने चार षटकात ३० धावा दिल्या, त्याच्या २४ चेंडूंच्या गोलंदाजीत दहा डॉट बॉलचा समावेश होता. यावरून त्याची गोलंदाजी चांगली झाली हे लक्षात येते. दुर्देवाने त्याला बळी मिळाला नाही. अक्षर पटेलने चार षटकांत ३० धावा देत दोन बळी घेतले. वरच्या फळीतील फलंदाजांविरुद्ध आरामात गोलंदाजी करू न शकलेल्या बिश्नोईने नंतर मधल्या फळीला लक्ष्य केले.  टि२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी होणार आहे. 

              रविवारी महिला आशिया चषक २०२४ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. यासह चमरी अटापट्टूच्या संघाने महिला आशिया कप जिंकला. यजमान संघाने प्रथमच हे विजेतेपद पटकावले आहे. रंगिरी डांबुला इंटरनॅशनल स्टेडियम, डांबुला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात १६५ धावा केल्या.  प्रत्युत्तरात श्रीलंकेने १८.४ षटकांत २ बाद १६७ धावा केल्या आणि सामना जिंकला. भारतीय संघ विक्रमी आठव्यांदा फायनल पोहचला होता.  मात्र, गत विजेतेपद राखण्यात अपयशी ठरला.

              या सामन्यापूर्वी भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज आणि गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी अद्याप प्रतिस्पर्धी संघांना संधी दिलेली नाही. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी आतापर्यंत संघाला चांगली सुरुवात केली होती, पण गोलंदाजांच्या, विशेषत: दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंग यांच्या कामगिरीने संघ व्यवस्थापन खूप खूश असेल. दीप्तीने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक नऊ विकेट्स घेतल्या आहेत, तर रेणुका सात विकेट्ससह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.  या दोघींचा इकॉनॉमी रेटही उत्कृष्ट आहे, याचा अर्थ त्यांनी विरोधी संघाच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. मात्र गोलंदाज या सामन्यात फलंदाजांने ठोकलेल्या १६५ धावांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्या. श्रीलंकेने त्यांच्या टि२० कारकिर्दीत पहिल्यांदाच १६५ सारख्या मोठया आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. यापूर्वी महिला टि२० प्रकारात न्यूझिलंडच्या नावे १५६ धावांचा रेकॉर्ड होता तो आता श्रीलंकेच्या नावे लागला आहे.

               सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सुगीचे दिवस असून पुरुष संघ वर्ल्ड कप जिंकला, वर्ल्ड कपनंतर नवा टि२० संघ नव्याने मोहिमेवर निघाला तेंव्हापासून झिंबाब्वे व श्रीलंकेविरूध्द मालिका जिंकला, सिनियर संघ लिजंड वर्ल्ड कप जिंकला तेंव्हा महिला संघ आपल्या धारदार कामगिरीने विजेतेपदाचा शानदार करंडक जिंकेल अशी अपेक्षा होती मात्र भारतीय महिला संघ आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. त्या परिणाम संपूर्ण देशवाशीयांच्या आनंदात भर टाकू शकल्या नाही.

डॉ.दत्ता विघावे,

क्रिकेट समिक्षक .

मो.नं. - ९०९६३७२०८२
close