*शाहू बोर्डिंग येथे डॉ. बाळासाहेब*
*आंबेडकर भेट दिन साजरा*
उद्धव फंगाळ / मेहकर
सातारा - "ज्या अस्पृश्य मुलाला ओंजळीतून पाणी प्यावे लागत होते, कोणाला स्पर्श करता येत नव्हता असा मुलगा आपल्या विद्वत्तेच्या जोरावर परदेशात जाऊन कित्येक पदव्या मिळवतो, बॅरिस्टर होतो ही गोष्ट आजच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वातील एक महान विद्वान पुरुष होते", असे मत प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते सातारा येथील शाहू बोर्डिंग मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेट दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दि. २९ जुलै १९२८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू बोर्डिंगला भेट दिली होती. वसतिगृहात स्पृश्य - अस्पृश्य मांडीला मांडीला मांडी लावून बसतात, जेवतात, शिक्षण घेतात हे दृश्य पाहून डॉ. आंबेडकर प्रभावित झाले होते.
आपल्या भेटीत त्यांनी वसतिगृहास वीस रुपयांची देणगीही दिली होती. डॉ. आंबेडकर यांनी शाहू बोर्डिंगचा उल्लेख 'अद्वितीय संस्था' असा केला आणि शेरे बुकात त्यांनी 'देशाच्या हिताची ज्यांना काळजी आहे त्यांनी शाहू बोर्डिंग ला पाठींबा द्या' असे लिहिले. छ. शिवाजी कॉलेज, रा. ब. काळे शाळा व शाहू बोर्डिंग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेत असतानाच्या छायाचित्राची दुर्मिळ प्रतिमा शाहू बोर्डिंगला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. हसत खेळत सहजपणे त्यांनी मुलांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडला. कर्मवीर भाऊराव पाटील तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे पाहून प्रा.वाघमारे चकित झाले. ऐतिहासिक घटनेवरील प्रश्नांची उत्तरे देताना मुलांमध्ये चढाओढ होती कु. दिशा शेलार, पूर्वी जांभळे, सोहम बर्गे, गणेश गावडे, मृगेंद्र पवार या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी प्रा. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना खाऊसाठी एक हजार रुपयांची देणगी दिली.
कार्यक्रमास शाहू बोर्डिंग चे अधीक्षक प्रशांत गुजरे, मुख्याध्यापक अमोल कोळेकर, प्रा.सरगडे, श्री. विजय माने, सौ.शीतल सुतार, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111