श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शहरातील सेंट झेवियर्स शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षक पालक-संघाची स्थापना दर दोन वर्षांनी करण्यात येते. शाळेचे प्राचार्य फा.विक्रम शिणगारे व मॅनेजर फा. प्रकाश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू शैक्षणिक वर्ष २०२४ ते २०२६ साठी नूतन शिक्षक - पालक संघाची स्थापना नुकतीच करण्यात आली. सदर निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन पार पाडण्यात आली. सुरुवातीला वर्गनिहाय संघ सदस्यांची निवडणूक घेण्यात आली नंतर निवडून आलेल्या सदस्यांनी पुरुष गटातून उपाध्यक्ष म्हणून उदयसेन राठोड यांची तर महिला गटातून कावेरी मांडण यांची निवड केली.
संघ स्थापनेच्या नियमाप्रमाणे पदसिद्ध अध्यक्ष हे प्राचार्य फा. विक्रम शिणगारे हे असतील.
शालेय व्यवस्थापनाने महिलांना ५० टक्के आरक्षण देत पालक संघात प्रतिनिधित्व दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक-पालक संघाचे सचिव रवि त्रिभुवन यांनी केले तर नवनिर्वाचित सदस्यांसाठी आवश्यक सूचनांचे वाचन श्री. जगदीश बनसोडे यांनी केले.
यावेळी शिक्षक-पालक संघाच्या नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मॅनेजर फा.प्रकाश भालेराव म्हणाले की, शिक्षक पालक संघ हा शाळा, विद्यार्थी व पालकांमधील दुवा आहे. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून शालेय प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आपण कार्यरत असावे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केवळ शिक्षकच जबाबदार नसून शिक्षक व पालक यांच्या करवी चालणारी ती दुहेरी प्रक्रिया आहे. विधायक कार्यासाठी शालेय व्यवस्थापनास सर्वतोपरी सहकार्य करून आपण आपल्या पाल्याचा विकास घडवावा. उत्तम माणूस व सुजाण नागरिक म्हणून आपली पाल्य घडावीत यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूयात असे सांगून त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
व्यवस्थापनास आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही राठोड व मांडण यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी मीनाक्षी ब्राह्मणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
रवि त्रिभूवन (सर) श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111