shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सुर्या भारतीय क्रिकेटला मिळालेला अदभूत सितारा


                स्काय नावाने ओळखला जाणारा सुर्यकुमार यादव हा आता एक सामान्य खेळाडू राहिला नसून तो सध्या श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या टि२० या क्रिकेटच्या छोट्या प्रारूपाचा भारतीय संघाचा कर्णधार आहे. टि२० विश्वचषकात अंतिम सामन्यात भारताला विजय मिळवून देणारा झेल घेऊन देशवासीयांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या सुर्याचं नशीब त्या एका सुवर्ण क्षणाने अक्षरशः बदललं. एक वेळ अवाक्याबाहेर असलेलं भारतीय संघाच कर्णधारपद देखील त्याला लिलया मिळालं.  'मिस्टर ३६० डिग्री' म्हणून प्रसिद्ध असलेला सूर्यकुमार यादव हा उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज आणि स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो.  सुर्यकुमार इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो.  आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सुर्याने क्रिकेट विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुर्यकुमार यादव हा जगातील सर्वोत्तम टि२० फलंदाज मानला जातो.

              सुर्यकुमार यादवचा जन्म १४ सप्टेंबर १९९० रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सुर्यकुमार अशोक यादव याचे वडील अशोक कुमार यादव हे भाभा अणु संशोधन केंद्रात (बीईआरजी) इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते. त्याच्या आईचे नाव सपना यादव असून ती गृहिणी आहे.  सुर्यकुमार यादव हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याला दिलील यादव नावाची बहीण आहे.  सुर्यकुमारचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील वाराणसीचे आहे, परंतु त्याचे वडील बीबीसीमध्ये नोकरी करण्यासाठी मुंबईत आले. सन २०१६ मध्ये, सुर्यकुमार यादवने डान्स कोच असलेल्या देविशाशी लग्न केले.

               सुर्यकुमार यादव यांचे पहिले प्राथमिक शिक्षण मुंबईच्या अणुऊर्जा सेंट्रल स्कूलमधून झाले.  त्यानंतर त्यांनी अणुऊर्जा कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई आणि नंतर पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, मुंबई येथे प्रवेश घेतला. जिथे त्याने बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान त्याने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. सुर्यकुमार यादव दहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला चेंबूरच्या बीआरसी कॉलनीतील क्रिकेट कॅम्पमध्ये दाखल केले. वयाच्या बाराव्या वर्षी ते अल्फ वेंगसरकर अकॅडमी मध्ये गेले, जेथे त्यांनी माजी भारतीय महान फलंदाज दिलीप वेंगसरकर यांच्याकडून खेळातील बारकावे शिकले. त्यानंतर सुर्यकुमारने जिमखाना क्रिकेट क्लबसाठी मुंबईतील क्लब क्रिकेटमध्ये भाग घेतला. तो मुंबईतील पारसी जिमखाना आणि भारत कॉर्पोरेशन लिमिटेड संघांव्यतिरिक्त शिवाजी पार्क जिमखाना क्लब आणि दादर युनियन क्लब यांसारख्या क्लबसाठी क्लब क्रिकेट खेळला.

            सुर्यकुमारने सन २०१० मध्ये क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. ११ फेब्रुवारी २०१० रोजी, त्याने मुंबईला गुजरातविरुद्ध हजारे ट्रॉफी जिंकून दिली. अंतिम सामन्यात त्याने ३७ चेंडूत झटपट ४१ धावा केल्या आणि तो सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.  काही महिन्यांनंतर त्याने हैद्राबादविरुद्ध मुंबईत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टि२०मध्ये पदार्पण केले. पण तो ५ धावांवर बाद झाला आणि संघाला ७ गड्यांनी  मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.  सन २०१० च्या अखेरीस त्याला मुंबईकडून दिल्लीविरुद्ध रणजी खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने सर्वाधिक ७३ धावा केल्या. 

             सन २०११-१२ च्या  रणजी मोसमात, सुर्यकुमार यादवने मुंबईसाठी ९ सामन्यांमध्ये ६८.५४ च्या सरासरीने ७५४ धावा करून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. ओरिसाविरुद्धच्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात त्याने द्विशतक आणि पुढच्या सामन्यात आणखी एक शतक झळकावले.  सुर्यकुमारने सन २०११-१२ च्या हंगामात तेवीस वर्षाखालील गटात एक हजाराहून अधिक धावा ठोकल्या.  सुर्यकुमारचा सातत्याने उत्कृष्ट फॉर्म दिसून आला आणि त्याला सन २०१४ च्या रणजी हंगामासाठी मुंबई संघाचा कर्णधार बनवण्यात आले.  सुर्यकुमारची सन २०२०-२१ मध्ये मुंबईसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या कर्णधारपदीही नियुक्ती करण्यात आली होती. 

               सुर्यकुमार यादवच्या देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीने प्रभावित होऊन, मुंबई इंडियन्सने सन २०१२ च्या आयपीएल हंगामात १०  लाखांच्या प्राईम बेसवर निवड केली.  मात्र, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड या दिग्गज खेळाडूंच्या समावेशामुळे त्याला खेळण्याची देण्याची संधी मिळाली नाही.  त्यानंतर सन २०१४ च्या आयपीएल लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने  सुर्यकुमार यादवला ७० लाख रुपयांना विकत घेतले.  त्याने आयपीएल २०१५ मध्ये त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध मॅच-विनिंग २० चेंडूत ४६ धावा करताना पाच षटकार मारले. तो चार वर्षे केकेआर संघाशी जोडला गेला.

              सुर्यकुमारचे आक्रमक रूप पाहून मुंबई इंडियन्सने त्याला सन २०१८ मध्ये पुन्हा आपल्या संघात समाविष्ट केले. त्या हंगामात एकूण ५१२ धावा केल्या आणि मुंबई इंडियन्ससह स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.  मुंबईच्या चौथ्या आयपीएल विजेतेपदात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.  सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ साठी आठ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.

             देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये कठोर परिश्रम केल्यानंतर, सुर्यकुमार यादवला सन २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट संघात सामील होण्याची संधी मिळाली. १४ मार्च २०२१ रोजी सुर्यकुमारने इंग्लंडविरुद्ध टि२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुर्यकुमारला पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नसली तरी मालिकेतील चौथ्या टि२० सामन्यात त्याने ५७ धावांची झणझणीत खेळी केली.  त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि टि२० आंतरराष्ट्रीयमध्ये असे करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.  यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. अगदी झटपट त्याने टि२० क्रिकेटमध्ये नाव कमावले. सन २०२१ च्या टि२० विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता, ज्यामध्ये त्याने चार सामने खेळले आणि तीन डावात ४२ धावा केल्या. सन २०२२ मध्ये आयर्लंड विरुद्धच्या टि२० मालिकेत त्याने नाट्यमय फॉर्म चालू ठेवला आणि ३० ऑक्टोबर २०२२ रोजी, सुर्याने आयसीसी टि२० क्रमवारीत पहिले स्थान पुन्हा मिळविले. सुर्यकुमार यादवने अनेक टि२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 'एक्स-फॅक्टर' असल्याचे सिद्ध केले आहे. 

               सुर्यकुमार यादवने १८ जुलै २०२१ रोजी श्रीलंकेविरूध्द वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ३१ धावा केल्या. त्याने आतापर्यंत एकूण ३१ वनडे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २६.७६ च्या सरासरीने ६६९ धावा केल्या आहेत. 

            ९ फेब्रुवारी २०२३ रोजी, सूर्यकुमार यादवने विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यात सहा धावांवरच बाद झाला. त्यानंतर त्याला पुन्हा कसोटीत संधी मिळाली नाही. मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात, सुर्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तीनदा गोल्डन डक मिळवणारा एकमेव भारतीय फलंदाज ठरला.

             सुर्याला भले वनडे व टेस्टमध्ये संघात स्थिरावता आले नसले तर टि२० मध्ये तो आज भारताचा निव्वळ कर्णधारच नसून हुकमाचा एक्का आहे.  विश्वविजयी संघाचा कर्णधार म्हणून रोहितची गादी चालवण्याची अवघड जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. २७ जुलैपासून श्रीलंकेविरूध्द होणाऱ्या मालिकेत यश मिळविण्यासाठी त्याला मागील ८ टि२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील कर्णधारपदाचा अनुभव नक्कीच फायदेशीर ठरेल.
डॉ.दत्ता विघावे,
क्रिकेट समिक्षक
मो.नं. - ९०९६३७२०८२
close