मुलांच्या आरोग्याबाबत पालकांनी जागृत राहणे गरजेचे - महेबुब शेख
अहमदनगर / प्रतिनिधी:
आज फास्टफूट, चॉकलेट, व्यायाम, मैदानी खेळांचा अभाव यामुळे लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या जाणवत आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत नेहमीच चांगल्या सूचना देत असतात. परंतु त्या अंमलात आणण्याचे काम पालकांनी केले पाहिजे. दातांची समस्या ही अनेक मुलांना जाणवत असते. त्याबाबत जागृत होणे गरजेचे आहे. आज मेहेर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांची दंत तपासणी करुन मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थी दातांची काळजी घेतील. युनिर्व्हसल ट्रस्टच्या माध्यमातून शालेय स्तरावर विविध जागृतीपर उपक्रम घेतले जातात, त्याचप्रमाणे गरजूंना मदतीचाही हात दिला जातो, असे प्रतिपादन युनिवर्हसल ट्रस्टचे उपाध्यक्ष महेबुब शेख यांनी केले.
युनिर्व्हसल एज्युकेशन ट्रस्टच्या युनिर्व्हसल डेंटल मल्टीस्पेशालिटी क्लिनिक, अहमदनगर च्यावतीने मेहेर इंग्लिश मेडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष महेबुब शेख , डॉ.सॉलेहा बागवान , डॉ. वैष्णवी गोरे, दिपा शिंदे, मास्टर मुस्तफा, प्राचार्या अनुरिता झगडे, समीना शेख, योगिता, पुनम, शितल, आशा आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्या अनुरिता झगडे म्हणाल्या, शैक्षणिक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषय जागृती व्हावी, लहानपणापासून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, यासाठी शाळेच्यावतीने विविध उपक्रम राबवत असते. विद्यार्थीना सामाजिक जाणिवेतून स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण, याबरोबर कला-क्रिडा, स्पर्धा परिक्षांसाठी प्रोत्साहन दिले जाते. आज युनिर्व्हल ट्रस्टचे शाळेत दंत तपासणीचा चांगला उपक्रम राबविला. याद्वारे विद्यार्थ्यांना दाताचे महत्व आणि त्याची काळजी कशी घ्यावी, या विषयीचे ज्ञान मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगली जागृती झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीना शेख यांनी केले तर आभार योगिता मॅडम यांनी मानले. यावेळी सुमारे 300 मुलांची दंत तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.
ज्येष्ठ पत्रकार आबीद दुलेखान, अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111