shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

प्राचार्य भगवान बाबर यांनी माणुसकी वाढवणारे विद्यार्थी घडवले - प्रा. डॉ. सुभाष वाघमारे


उद्धव फंगाळ / मेहकर 
हुमगांव (ता.जावळी जि. सातारा) येथील प्राचार्य भगवान बाबर यांच्या सेवापूर्ती निमित्त हुमगांव येथे सेवापूर्ती समारंभात सत्कार करण्यात आला.याप्रसंगी डावीकडून ज्येष्ठ शिक्षिका स्वाती देशपांडे, सौ.गीता बाबर, प्राचार्य भगवान बाबर यांचा सत्कार करताना मा. दादासाहेब शिंदे आबा,प्रा. डॉ.सुभाष वाघमारे व रघुनाथ बाबर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

'माणूस जगात अनेक हेतू मनात ठेवून जगत असतो. स्वतःला सम्यक बनवण्याचे भान हे प्रत्येक माणसा जवळ असणे आवश्यक असते. संकटे अडचणी या तर प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात तरी त्यांना न घाबरता आपल्या नैतिकतेने आणि प्रयत्नाने त्यांचा पराभव आपण करावयाचा असतो. सतत परिश्रम करून आपली चांगली स्वप्ने माणसाने पूर्ण करायची असतात. प्राचार्य भगवान बाबर यांचे जीवन म्हणजे प्रतिकूल परिस्थितीशी केलेला संघर्ष आहे. त्यांनी लहानपणापासूनचे तळदेव, अंधारी,तापोळा या परिसरात शिक्षण घेऊन इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले.शिक्षक म्हणून प्रभावी अध्यापन केले. आयुष्यभर सुसंवाद करून अनेक माणसे त्यांनी जोडली.आपल्या वाणीचा हितकारी उपयोग केला.

आपल्या विनोदी स्वभावामुळे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आनंद दिला. अनेक नातेवाईकांना त्यांनी सहकार्य केले. रयत शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयात  अनेक माणुसकी वाढवणारे  विद्यार्थी घडवण्याचे कार्य बाबर सरांनी केले ‘असे मत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्राध्यापक डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल हुमगांव चे प्राचार्य भगवान बाबर यांच्या सेवापूर्ती समारंभात ते  बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत सेवक बँकेचे चेअरमन राजेंद्र शिर्के , दादासाहेब  शिंदे  आबा, अशोक कोलते, घाडगे बापू, रघुनाथ बाबर, कुचेकर सर,नीलम चव्हाण मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रयत बँकेतर्फे चांदीचे नाणे देऊन बाबर सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.  
श्री. भगवान बाबर सर यांचेविषयी व अनेक जणांनी आपल्या भावना प्रकट केल्या.
 प्रास्ताविकात स्वाती देशपांडे मॅडम म्हणाल्या की बाबर सर सदैव चिरतरुण आणि मनाला उत्साहित करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी शाळेचा गुणवत्तेचा  आलेख चढता ठेवण्याचे काम केले. मुरुड , सातारा, जामखेड, लासुर्णे , वाडा , गव्हाण वाघेश्वर धायगुडे मळा, तासगांव  लोणंद, हुमगांव  इत्यादी ठिकाणी काम करत त्यांनी ३२ वर्षे  सेवा केली.  दीपक शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. 
प्रमुख पाहुणे श्री.राजेंद्र शिर्के म्हणाले की सरांचे  कम्युनिकेशन स्किल चांगले आहे. राहणीमान चांगले आहे. नीटनेटकेपणा, टापटिपीत राहणे हे त्यांना आवडते.मोकळेपणाने बोलून मुलांना आपलेसे करत ते  चांगले संस्कार करीत. सूत्रसंचालन त्यांना चांगले जमते. हजारजबाबीपणा  ही सारी वैशिष्ट्ये त्यांच्यात आहेत. तरुणाला लाजवेल  असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.

आदर्श शिक्षिका सौ. शुभांगी कुंभार यांनी’ सर हे सर्व सहकाऱ्यांशी आपुलकीने वागतात .त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे ताण तणाव कमी होतो. ते विद्यार्थ्यांशी एकनिष्ठ आहेत असे त्या म्हणाल्या. 
रघुनाथ बाबर यांनी बाबर सरांच्या आयुष्याचा आढावा घेतला. ते म्हणाले ग्रामीण भागातून संघर्ष करीत त्यांनी प्राचार्य पदापर्यंत प्रवास केला हे अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी सरपंच म्हणून स्वतः पाच वर्षे काम केले. कोणत्याही सेवकाने आपल्या आयुष्यात मिळवलेला पैसा अतिशय जपून वापरला पाहिजे असेही ते म्हणाले.

स्कूल कमिटीचे चेअरमन दादासाहेब शिंदे आबा म्हणाले की बाबर सर हे हाडाचे शिक्षक आहेत. शाळेत सर्वाच्या आधी ते  येतात आणि आपल्या कामात मग्न असतात आमचे विद्यालय दर्जेदार करण्यामध्ये त्यांचे योगदान आहे असा गौरव त्यांनी केला.  

बाबर सर यांनी सत्कारास उत्तर देताना प्रथम सर्वांचे आभार मानले. माझ्या जीवनात अत्यंत कठीण परिस्थिती शिक्षण घेत मी प्रामाणिक राहून समाजाची ही बांधिलकी जपली. आपल्या लहानपणी आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे म्हणून मी चांगले निर्णय घेतले. नोकरीच्या या  प्रवासात माझ्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे. मला तीन मुले असून दोन मुलींची लग्ने झाली आहेत .आता  लहान मुलाला देखील चांगले शिक्षण देऊन एक चांगला नागरिक बनवण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. शिक्षकाची नोकरी म्हणजे जबाबदारीची नोकरी आहे. शाळेतील सर्व मुलांना चांगल्या शिक्षणासाठी मी  सतत प्रोत्साहन दिले आहे. अनेक शाखांच्यामध्ये लहान थोर अनेक शिक्षक माझे मित्र आहेत. ज्यांनी इथपर्यंतच्या प्रवासात साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी आभार  मानले. निवृत्त मुख्याध्यापक मच्छिंद्र कुचेकर ,नीलम  चव्हाण , दादासाहेब शिंदे, योगिता भिसे मॅडम, प्रज्ञा अभिजित खंड झोडे ,प्रथमेश बाबर , विद्यार्थिनी प्रांजली शिंदे, वैष्णवी साळुंखे, यांनी मनोगत व्यक्त केले. हूमगावच्या सरपंच सौ. प्रियांका शिंदे ,माजी शिक्षक एस.डी.शिंदे , स्कूल कमिटी सदस्य बँकेचे  रवी महाजन, प्रदीप  बिडे ,एम.एम.मोमीन, शिक्षण प्रेमी सयाजी शिंदे, बुवासाहेब पिसाळ इत्यादींनी सेवानिवृत्ती निमित्त बाबर सरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे सेवक अनिल जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.नीलम भोसले व सौ.स्मिता मोरे यांनी केले. सौ.रेश्मा महांगडे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास न्यू इंग्लिश स्कुल मधील विद्यार्थी, शिक्षक,पालक  मोठ्या संख्येने हजर होते.

*वृत्त विशेष सहयोग
 प्रा.डॉ.सुभाष वाघमारे 
प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख, पदवी व पदव्युत्तर मराठी अभ्यास व संशोधन केंद्र, प्रसिद्धी विभागप्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. (घटक महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा) - भ्रमणध्वनी: ९८९०७२६४४०
*संकलन:
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close