shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पवार वस्ती जि.प.शाळेतील बाल चमूंचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न


अजीजभाई शेख / राहाता 
काल दिनांक १६/०७/२०२४ रोजी तालुक्यातील वाकडी येथील पवार वस्ती वरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा बाल दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा विठ्ठल रुक्मिणी आणी हरिनामाचा गजर करीत , विद्यार्थ्यांच्या दिंडीने गावप्रदक्षिणा पूर्ण करीत व वेशभूषेने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेश -भूषेत हा दिंडी सोहळा पवार वस्ती ते श्री क्षेत्र रामेश्वर मंदिराच्या ठिकाणी प्रस्थान केले.

 या वारीत जिल्हा परिषद शाळेच्या पवार वस्ती येथील सुमारे ३५ विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला होता. पालखी व विना पूजन करीत उपस्थित ग्रामस्थ, महिला, व पालक  यांच्या हस्ते करण्यात आले. ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करीत बालदिंडीने श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिर येथे विश्राम घेतला. 

या ठिकाणी रिंगण सोहळ्यात छोट्या वारकऱ्यांनी संत ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम, या जय घोषावर ताल धरत रिंगणाचा आनंद घेतला. रिंगणामध्ये लहान मुले, ग्रामस्थ, पालक यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. तसेच येथील ग्रामस्थ बापूराव पवार,दत्तात्रय पवार यांनी आपल्या सुमधुर ज्ञानोबा माऊलींचे अभंग गाऊन बाल दिंडीचा आनंद द्विगुणित केला. दिंडीत चालण्याचा आनंद बालगोपाळांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पालक भाऊसाहेब आहेर यांनी बाल दिंडीला त्यांच्या वस्तीवर भोजनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. वस्तीवर  पोहोचल्यावर येथील महिलांनी बाल दिंडीतील वारकऱ्यांचे गणपती, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज व पांडुरंगाची आरती व पूजन करून बाल दिंडीचे स्वागत केले. नंतर सर्व बाल वारकऱ्यांना खिचडी व केळी देऊन ,भोजनाचा आस्वाद घेतला. दिंडीचे यशस्वीरीत्या नियोजन पार पडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामदास सोनवणे, शिक्षिका दीपमाला सातपुते, सुवर्णा पवार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सोमनाथ गाढे , दत्तात्रय पवार, बापूराव पवार, यांचे मार्गदर्शन लाभले.

*वृत्त विशेष सहयोग*
सामाजिक कार्यकर्ते श्री.भाऊराव माळी
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close