नागरिकांनी आपल्या नावाची मतदार यादीत खात्री करावी - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केल्यानुसार जिह्यातील १२ विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच संबंधित मतदान केंद्रावर एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी. तसेच पुनःरिक्षण कार्यक्रम जिलह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी नागरिक व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात द्वितीय विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी व मतदान केंद्राच्या याद्यांच्या प्रसिद्धीबाबत सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शाहू मोरे, तहसिलदार प्रदीप पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, मा.भारत निवडणूक आयोग जाहीर केलेल्या छायाचित्र मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमानुसार ६ ऑगस्ट २०२४ रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करणे, ७ ते 20 ऑगस्ट दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी,दि. १०,११,१७ व १८ ऑगस्ट २०२४ रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमांच्या आयोजनाचा कालावधी असुन २९ ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. २९ ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे तसेच डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यीची छपाई करण्यात येणार असुन ३० ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम यादीची प्रसिद्धी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिली.
१ जुलै ते १ ऑक्टोबर, २०२४ दरम्यान १८ वर्षे पुर्ण करणाऱ्या मतदारांनी नाव नोंदणीसाठी नमुना ६ भरुन द्यावा. नाव, पत्ता बदल करणे व स्थलांतर यासाठी नमुना ८ भरुन द्यावा. मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांची नावांची वगळणी करण्यासाठी नमुना ७ भरुन द्यावा. एक गठ्ठा पध्दतीने आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे सांगत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महसुल पंधरवड्यामध्ये युवा संवाद, जनसंवाद, सैनिकहो तुमच्यासाठी तसेच एक हात मदतीचा-दिव्यांग कल्याण या उपक्रमातुनही मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार असुन अधिकाधिक मतदारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी केले.
नागरीकांना नमुना ६,७,८ भरण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी www.ceo.maharashtra.gov.in आणि www.electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. या शिवाय नागरीकांना व्होटर्स हेल्पलाईन मोबाईल अॅप देखील नाव नोंदणी व नाव शोधण्यासाठी उपलब्ध आहे. मतदार नोंदणीचे अर्ज जिल्हयातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालया या ठिकाणी देखील उपलब्ध असुन नागरीकांना कोणतीही अडचण असल्यास मतदार मदत क्रमांक 1800221950 वर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पुनःरिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्वाचा असून राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिनिधींची मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) म्हणून नेमणूक करावी. नागरिकांनी व राजकीय पक्षांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन पुनःरिक्षण कार्यक्रम जिल्हयामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री सालीमठ यांनी केले.
वृत्त विशेष सहयोग,
संकलन,समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११