अकरा वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर भारताला आयसीसीचे विजेतेपद मिळाले. तर तब्बल सतरा वर्षानंतर टि२०चे विजेतेपद पदरी पडले. सन २००७ ला धोनीच्या नेतृत्वात मिळालेल्या त्या विजेतेपदानंतर खुद्द धोनीनेच अनेक प्रयत्न करूनही भारताला तो पुन्हा टि२०चा विजेता करू शकला नव्हता. भले त्याने वनडेचा विश्वचषक भारताला सन २०११ मध्ये मिळवून दिला. पण टि२० मध्ये त्याचेही नेतृत्व फिके पडले होते. त्याच्या नंतर विराट कोहलीलाही विश्वचषक विजयाचे चक्रव्यूव्ह भेदता आले नव्हते. शेवटी बीसीसीआयने रोहित शर्माला त्याचा पाच आयपीएल विजेतेपदाचा आदर करून त्याला नेतृत्वाच्या बोहल्यावर बसवले. मात्र सन २०२२ च्या विश्वचषकात पहिल्या प्रयत्नात त्यालाही यशाने ठेंगा दाखविला. मात्र हार मानेन तो रोहित शर्मा कसला. उच्च मनोधैर्य व प्रबळ ईच्छाशक्तीच्या बळाबर त्याने संघाची बांधणी करत सन २०२४ च्या टि२० विश्वचषकाच्या विजेतेपदानंतर शब्दशः भारतीय तिरंगा बार्बाडोसच्या खेळपट्टीवर गाडला. त्यानंतर रोहितसह भारताची दिर्घ काळ सेवा करणारे विराट कोहली व रविंद्र जडेजा टि२० च्या आंतरराष्ट्रीय पटलावरून पायउतार झाले.
खरं बघाल तर सन २००७ च्या विश्वचषक विजयानंतर आयपीएलचा जन्म झाला. आयपीएल मुळे भारतीय क्रिकेट बोर्ड जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ बनलं. जागतिक क्रिकेटवर वर्चस्वही मिळविलं. पण ज्या टि२० क्रिकेटवर अधिराज्य गाजविण्यासाठी आयपीएल सुरू झालं ते उद्दीष्ठ साध्य होत नव्हते. आयपीएलमध्ये भाग घेणारे विदेशी खेळाडू भारतात येऊन पैसा, अनुभव व इज्जत कमावून भारतावरच महत्वाच्या स्पर्धात डाव उलटवत होते. तेंव्हा आयपीएलवर टिकाही होत होती. अखेर विविध उपाय योजनांनंतर यंदा त्याचे फळ मिळाले व भारताचे अनेक दिवसांचे आयसीसी स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न साकार झाले.
सन २०२४ चा विश्वचषक झाल्यानंतर संघात आमूलाग्र बदल झाले. सर्वात प्रथम प्रशिक्षक राहुल द्रविड सेवानिवृत्त झाले. विराट कोहली, रविंद्र जडेजा या सिनियर सहकाऱ्यांसह कर्णधार रोहितनेही टि२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. या वरिष्ठ खेळाडूंच्या एकत्रित निवृत्तीमुळे संघात पोकळी निर्माण होईल, पुन्हा पराभवांचा ससेमिरा पाठी लागेल असे वाटत होते मात्र तसे काहीच न होता उलट संघ पहिल्या पेक्षा जास्त जोमात खेळू लागला. कधी नव्हे ती संघात एकजूटता दिसू लागली.
नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर हा भारताला सन २००७ व २०११ ला विश्वविजेतेपद मिळवून देणारा मुख्य शिल्पकार होता. दोन्ही स्पर्धांच्या फायनलमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा त्याच्याच बॅटमधून निघाल्या होत्या. शिवाय आयपीएलमध्ये केकेआरला कर्णधार म्हणून दोनदा व मेंटॉर म्हणून एकदा विजेते करण्यात त्याचा मोठा हात होता. एक प्रयोगशील क्रिकेटींग ब्रेन म्हणून त्याच्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्व बघत होते. विंडीजच्या सुनिल नारायण, आंद्रे रसेल या निव्वळ फिरकी गोलंदाजांना केकेआर कडून खेळताना अव्वल दर्जाचे फलंदाज त्यानेच बनविले. आक्रमक वृत्ती, सरळ व स्पष्ट बोलणे व कठोर निर्णय घेण्याच्या त्याच्या स्वभावामुळे भले काही जण दुखावत असतील मात्र त्यामुळे तो सेवा देत असलेल्या संघाचा फायदाच होत असल्याने बीसीसीआयने त्याला थेट भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद देऊन टाकले.
गौतमनेही संघाचे सुत्रे स्विकारण्यापूर्वीच टि२० चा कर्णधार स्वतःच्या मर्जीतील सुर्यकुमार यादवला केले. वास्तविक त्या पदाचा नैसर्गिक दावेदार रोहित शर्माचा डेप्युटी हार्दिक पांड्या होता. मात्र त्याने आपला गंभीरपणा दाखवत निवड समितीकडून त्याची मागणी मान्य करून घेतली. भले संपूर्ण सपोर्टींग स्टाफ त्याच्या मर्जीप्रमाणे मिळाला नाही. पण संघ आपल्या सोयीप्रमाणे निवडून त्याने किमान पहिल्या दोन मालिकांत तरी रिझल्ट अपेक्षेपेक्षा चांगला व सकारात्मक दिला.
सर्वप्रथम झिंबाब्वे दौऱ्यावर त्याची पराभवाने सुरुवात झाली. मात्र त्याने खचून न जाता संघाची मोट घट्ट आवळून नवोदितांकडून योग्य ती चांगली कामगिरी करवून घेत २-१ अशी टि२० मालिका जिंकली. तेथे अभिषेक शर्मा, ऋतूराज गायकवाड यांनी चांगली कामगिरी केली तरी श्रीलंका दौऱ्यात त्यांना डावलले. यावर त्याला मोठ्या टिकेला सामोरे जावे लागले. झिंबाब्वेमध्ये फलंदाजीत अपयशी ठरलेल्या रियान परागला त्याने लंकेला नेले. मात्र तेथे त्याने त्याच्यातला गोलंदाज जिवंत केला. श्रीलंकेत भारत टि२० मालिका ३-० असा जिंकला. कागदोपत्री हे फार सुंदर दिसत असले तरी हा मालिका विजय सोपा नव्हता. प्रत्येक सामन्यात श्रीलंकेने तिव्र प्रतिकार केला, मात्र शेवटच्या टप्प्यात त्यांना विजयाची सांगड घालता आली नाही. तर गंभीरने संघाला निर्णायक क्षणी एकजूट व भक्कम बनविले व तिन्ही सामने पराभव समोर उभा ठाकला असताना जिंकले. तिसऱ्या सामन्यात पराग - रिंकू- सुर्या हे निव्वळ फलंदाज कुंबळे -वॉर्न -मुरलीपेक्षाही खतरनाक गोलंदाज साबीत झाले. या सर्वांमागे गंभीरचा मास्टरमाईंड होता. हे आता सर्व जगाला माहिती झाले आहे.
श्रीलंका मालिकेतून सुर्यकुमार यादवचे नेतृत्वगुण जगासमोर त्याच्या नावाप्रमाणेच चमकले. त्याच्यातला फलंदाज, क्षेत्ररक्षक, कर्णधार व शेवटी गोलंदाज जगाने आनंदाने अनुभवला. कर्णधारपदाच्या श्रीलंकेतील पहिल्या सामन्यात सामनावीर, नंतर मालिकेचा मानकरी व क्लिन स्विप देणारा यशस्वी कर्णधार असं संपूर्ण पॅकेज भारतीय क्रिकेटसाठी किमान सन २०२६ च्या टि२० विश्वचषकासाठी तरी संघाच्या उपयोगी येणार व विजेतेपद राखण्यासाठी पुरेशे ठरू शकते. सहकाऱ्यांवर विश्वास टाकण्याची सुर्याची वृत्ती त्याला नक्कीच महान कर्णधारांच्या पंगतीत नेऊन बसवेल.
लेखक : -
डॉ. दत्ता विघावे
ग्क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२