चाकण:-
पुणे- नाशिक महामार्गावरील चाकण शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून नागरिक या समस्येमुळे अतिशय त्रस्त आहेत. वर्षभर दररोज चाकण आंबेठाण चौक, तळेगाव चौक, मेदनकरवाडी फाटा, आळंदी फाटा, बिरदवडी चौक, कुरुळी, फाटा, चिंबळी फाटा, शेलपिंपळगाव,म्हाळुंगे, खराबवाडी, निघोजे फाटा या ठिकाणी तासंनतास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे सामान्य नागरिक, वाहन चालक, प्रवासी, कारखानदार, वैद्यकीय रुग्ण, कामगार, शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी यांचा प्रचंड वेळ जात असून वाहतूक कोंडीमुळे पोलीस यंत्रणेवर सतत ताण येत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात ते देखील असमर्थ ठरत आहेत. या वाहतूक कोंडीच्या समस्येतून दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेक लोकांना जीव देखील गमवावे लागलेले आहेत. चाकण येथील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या ट्राफिक मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा अशी रोजची स्थिती बनलेली आहे. त्यामुळे चाकण मधील ही एक मूलभूत समस्या बनली असून नागरिकांमध्ये या समस्येमुळे प्रचंड असंतोष आहे.
चाकण वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ज्याप्रमाणे राजगुरुनगर या ठिकाणी बायपास झाला आहे, भोसरी या ठिकाणी उड्डाणपूल आहे. त्या पद्धतीने उड्डाणपूल किंवा बायपास असा पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची नितांत गरज आहे. अशा पद्धतीच्या ठोस निर्णय कायमस्वरूपी वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गरजेचा आहे. तरच वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी मिटण्यास मदत होईल.
चाकण वाहतूक कोंडी समस्येसंदर्भात स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संघटनांकडून, विविध राजकीय पक्ष, यांच्यामार्फत आत्तापर्यंत वारंवार वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात येऊनही प्रशासनाने गांभीर्याने या समस्येचा कडे लक्ष देऊन प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न झालेला नाही. वाहतूक कोंडीच्या संदर्भात ठोस कार्यवाही झाली नाही.त्यासाठी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकांमधील वाढता असंतोष विचारात घेऊन ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी योग्य पर्याय मार्ग काढून त्याची अंमलबजावणी व्हावी. यासाठी "आम आदमी पक्षाच्या" वतीने शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट२०२४ रोजी चाकण तळेगाव चौकात सकाळी ठीक ११:३० वाजता संविधानिक मार्गाने सविनय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
"रास्ता रोको आंदोलना" संदर्भात जिल्हाधिकारी मा. सुहास दिवसे साहेब यांना भेटून त्याना आंदोलनासंदर्भात संदर्भातील निवेदन दिले आहे.
या निवेदनाच्या प्रती मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, सार्वजनिक वाहतूक मंत्री, विभागीय आयुक्त, केंद्रीय रस्ते विकास मंत्री-नितीन गडकरी, पोलीस अधीक्षक पिंपरी चिंचवड, तहसीलदार खेड, आयुक्त, पी.एम.आर.डी.पोलीस निरीक्षक चाकण, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना योग्य त्या कार्यवाहीसाठीदेण्यात आल्या आहेत.
चाकण वाहतूक कोंडी प्रश्न संदर्भात नुकतीच सर्वपक्षीय चाकण येथे बैठक घेण्यात आली होती. तिची चाहूल घेऊन विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री कार्यालयात मीटिंग घेऊन अतिक्रमणे हटवणे या स्वरूपातील कार्यवाही करण्यात येत असून त्यातून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. यापूर्वी एक ते दीड वर्षांपूर्वी ही अशाच पद्धतीने तात्पुरती उपाययोजना करण्यात आली होती. मात्र ठोस कार्यवाही झाली नाही. परंतु या प्रश्नासंदर्भात जोपर्यंत कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्यासाठी केंद्र-राज्य सरकारकडून ठोस प्रशासकीय कार्यवाही होत नाही व हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लागत नाही. तोपर्यंत आम आदमी पक्ष या प्रश्नातून माघार घेणार नाही अशी भूमिका आम आदमी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष श्री. मयूर दौंडकर यांनी निवेदन देताना जिल्हाधिकारी श्री.सुहास दिवसे यांना बोलून दाखवली.