भारतीय संघ जेंव्हा टि२० चा विश्वचषक जिंकला तेंव्हा त्यांना किमान या वेळी तरी जगातील कोणताही संघ तोड देणारा नाही असे दिसत होते. विश्वचषकानंतर भारताने झिंबाब्वे व श्रीलंकेला हरवून टि२०च्या मालिका जिंकून सर्वांच्याच त्यांच्या विषयी असलेल्या विश्वासाला सार्थ ठरविले. टि२० विश्वचषकानंतर संघाचं व्यवस्थापनच बदललं होतं. राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेतली. कोहली -रोहित -जडेजा हे त्रिकुटही टि२०तून निवृत्त झाले. संघात नवीन खेळाडूंचा भरणाही झाला. त्याचा सकारात्मक फायदा किमान टि२० मध्ये तरी दिसला. श्रीलंकेत टि२० मालिकेत ३-० असा विजय मिळवून भारताने दौऱ्याची सुरुवात झकास केली. सुर्यकुमार यादवच्या संघाने केलेली अकल्पीत कामगिरी बघून रोहित शर्मा, विराट कोहली व वनडे स्पेशालिस्ट खेळाडू संघात आल्याने भारत आधीच कमजोर दिसणाऱ्या व टि२०तील पराभवाने खचलेल्या श्रीलंकेला वनडे मालिकेत पार चिरडून टाकेल असे वाटत असताना न भूतो ना भविष्यती चमत्कार घडला व २७ वर्षांचा विजयांचा अभेद्य किल्ला चरिथा असलंकाच्या तरण्याबांड पोरांनी शब्दशः उधळून लावला.
कागदावरचे मोठमोठ्या नावाचे खेळाडू भयानक तुफानात उडून गेलेल्या पालापाचोळ्यासारखे दिसले. एकटा रोहित शर्मा सोडला तर ऐंशी आंतरराष्ट्रीय शतकांचा धनी कोहली, स्पिनचा स्पेशालिस्ट श्रेयस अय्यर, डावाचा अँकरींग मधील मास्टर केएल राहुल, रिषभ पंत, नांगर टाकणारे अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नवा उपकर्णधार शुभमन गिल तर नवशिख्या सारखे दिसत होते. एकटा बुमराहा गोलंदाजीत नव्हता तर सगळे गोलंदाज शाळकरी पोरांसारखे दिसत होते. तीनही वनडेत श्रीलंकेची मधली फळी ढेपाळू पहात असताना नवख्या दुनिथ वेल्लालगेने व तळाच्या गड्यांनी श्रीलंकेचे वारू भटकू दिले नाही.
सत्तावीस वर्षांपूर्वी, जेव्हा श्रीलंकेने भारताविरुद्ध द्विपक्षीय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली, तेव्हा सनथ जयसूर्या मालिकावीर ठरला. यावेळी जेव्हा श्रीलंकेने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली, तेव्हाही सनथ जयसूर्या श्रीलंकेच्या संघाशी संबंधित होता, पण एक खेळाडू म्हणून नव्हे तर अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून. जयसूर्या सध्या श्रीलंकन संघाचा हंगामी मुख्य प्रशिक्षक आहे, त्याच्या नेतृत्वाखालील श्रीलंकन संघाची कामगिरी पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील. टीम इंडियाच्या भक्कम बॅटिंग लाईनअप विरुद्ध श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी ज्या प्रकारे कामगिरी केली ते कौतुकास्पद आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेदचाही श्रीलंकेच्या २-० च्या मालिका विजयात मोठा वाटा होता. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. सन २०२३ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाला ९ सामन्यांत फक्त दोन विजय नोंदवता आले होते. भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला सुरुवातीपासून मालिका जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र तसे होऊ शकले नाही.
श्रीलंका आणि भारत यांच्यातील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने शानदार विजय नोंदवले आणि यादरम्यान संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची होती. आकिब जावेद श्रीलंकन संघाशी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संबंधित आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि श्रेयस अय्यरसारख्या फलंदाजांनी भरलेला भारतीय संघ श्रीलंकेच्या गोलंदाजांना बळी पडताना दिसला.
श्रीलंकेच्या गोलंदाजी आक्रमणाने भारतीय फलंदाजांना ज्या प्रकारे रोखून धरले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. कर्णधार रोहित शर्माने स्वत: कबूल केले की श्रीलंकेचा संघ चांगला खेळला आणि मालिका जिंकण्यास पात्र आहे. आकिब जावेदबद्दल बोलायचे झाले तर त्याने पाकिस्तानसाठी २२ कसोटी आणि १६३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जावेदने ५४ कसोटी आणि १८२ एकदिवसीय विकेट्स घेतल्या आहेत. मग असे सगळे योग, खेळाडू अनुभव जुळून आल्यावर श्रीलंका जुना इतिहास जामिनदोस्त करणार हे स्पष्टच होते.
लेखक : -
डॉ. दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.