श्रीरामपूर / प्रतिनिधी:
प्रवरा नदीपात्रात ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आलेले असून अशा परिस्थितीत भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील शेतीसाठी प्रवरा डावा व उजव्या कालव्यांना पाणी सोडून आवर्तन घ्यावे व पिकांना जीवदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच गावोगावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून ओव्हरफ्लोच्या पाण्याने गावतळी भरून घेण्यात यावी, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने वडाळा पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता संजय कल्हापुरे यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भंडारदरा व निळवंडे धरण परिक्षेत्रात जोरदार पाऊस होत असून श्रीरामपूर तालुक्यात मात्र दोन महिन्यांपासून पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने जगविलेली ऊसासह अन्य पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सुदैवाने भंडारदरा व निळवंडे धरणाच्या परिक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढत असून प्रवरा नदीपात्रात ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील शेतीसाठी प्रवरा डावा व उजव्या कालव्यांना पाणी सोडून आवर्तन घ्यावे व पिकांना जीवदान देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच गावोगावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून ओव्हरफ्लोच्या पाण्याने गावतळी भरून घेण्यात यावी, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने शुक्रवार दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वा. माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली श्रीरामपूर रेल्वे स्टेशनजवळील हनुमान मंदिर येथून वडाळा पाटबंधारे कार्यालयावर श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन व लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
निवेदन देतांना लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, नानासाहेब गांगड, रविंद्र झरेकर, प्रमोद करंडे आदी उपस्थित होते.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११