shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भारताचा सफाया करत लंकेने इतिहास बदलला



               श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी कायम राहिली आणि या सामन्यात संघाला ११० धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.  प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकांत सात गडी गमावून २४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात संपूर्ण भारतीय संघ २६.१ षटकांत १३८ धावांत गुंडाळला गेला.  भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर निष्प्रभ ठरली. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमच्या वळणाच्या खेळपट्टीवर संघर्ष करताना भारतीय फलंदाज पुर्णतः हतबल दिसत होते. श्रीलंकेसाठी फिरकीपटू दुनिथ वेल्लालगेने चमकदार कामगिरी करत पाच विकेट घेत भारतीय डाव खिळखिळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 


             भारताविरुद्धची टी२० मालिका ०-३ ने गमावल्यानंतर, श्रीलंकेने वनडे फॉरमॅटमध्ये लक्षवेधक कामगिरी केली. उभय संघांमध्ये पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटल्यानंतर गोलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेने पुढचे दोन्ही सामने जिंकले. अशाप्रकारे भारताकडून ही मालिका २-० अशी जिंकण्यात श्रीलंकेला यश आले. चरिथ असलंका याच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघासाठीही हा विजय महत्त्वाचा आहे, कारण यजमान संघाने १९९७ नंतर प्रथमच भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे.  तेंव्हा अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने भारताचा शेवटचा ३-० असा पराभव केला होता.  तेव्हापासून भारताने सलग ११ वेळा एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ हा विक्रम कायम राखू शकला नाही व २७ वर्षांनंतर त्यांना श्रीलंकेविरूध्द वनडे मालिका गमवावी लागली.

             विजयासाठीच्या २४९ धावांचा पाठलाग करताना असिथा फर्नांडोने शुभमन गिलला बाद करत भारतीय संघाला पहिला धक्का दिला. संघाच्या ३७ धावा असताना भारताने पहिला पहिला झटका बसला.  गेल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकविणारा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातही चांगली कामगिरी करताना दिसला, मात्र वेल्लालगेने कर्णधाराला बाद करून भारताला मोठा धक्का दिला.  यानंतर भारताचा डाव गडगडला आणि भारतीय फलंदाज एकामागून एक विकेट फेकत राहिले.  पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही विराट कोहली प्रभाव पाडू शकला नाही आणि २० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताची फलंदाजी इतकी खराब झाली होती की १०० धावांवर टीमने सात विकेट गमावल्या होत्या. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने २५ चेंडूत ३० धावांची खेळी केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भारतासाठी केवळ चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. विशेष म्हणजे भारताने फिरकीपटूंविरुद्ध नऊ विकेट गमावल्या. 

              संपूर्ण वनडे मालिकेत भारतीय फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसले. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने फिरकीपटूंविरुद्ध एकूण २७ बळी गमावले, की तीन सामन्यांच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत फिरकीपटूंविरुद्ध कोणत्याही संघाने गमावलेल्या विकेटची सर्वाधिक संख्या आहे.  त्याचवेळी, भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात एकापेक्षा जास्त वेळा पाच बळी घेणारा वेल्लालगे हा पहिला फिरकी गोलंदाज ठरला.  भारताविरुद्ध त्याने दोनदा ही कामगिरी केली आहे.                 तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली आणि पथुम निसांका आणि अविष्का फर्नांडो यांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. मात्र, पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे फिरकीपटूंना खेळपट्टीकडून मदत मिळत नव्हती. फर्नांडोने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. निसांकानेही डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर स्लॉग स्वीपसह दोन षटकार ठोकले. निसांकाने त्याचा चेंडू ऑफ साइडच्या बाहेर मारताना यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातात देऊन अक्षरने भारताला पहिले यश मिळवून दिले.  निसांका ४५ धावा करून बाद झाला.                  फर्नांडो आणि कुशल मेंडिस यांनी भारतीय गोलंदाजांविरुद्ध सहज धावा करून श्रीलंकेला मजबूत स्थितीत आणले. दिशाहीन गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराजविरुद्ध फर्नांडोने सहज धावा केल्या. फर्नांडोने पुल मारून सिराजवर सलग दोन षटकार ठोकले. फर्नांडो मात्र परागच्या सरळ चेंडूवर  पायचीत झाला, त्याचबरोबर त्याचे चौथे एकदिवसीय शतक हुकले. फर्नांडोने १०२ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. 

                डावाच्या ३६ व्या षटकात श्रीलंकेची धावसंख्या दोन गडी बाद १७१ धावा होती आणि यजमान संघ २८० धावांच्या आसपास जाईल असे वाटत होते. त्यानंतर परागने कर्णधार चारिथ असलंकाला दहा धावांवर पायचीत केले आणि त्यानंतर दुनिथ वेल्लालगेला दोन धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवून श्रीलंकेची लय भंगवली.  वेगवान फिरणाऱ्या चेंडूवर परागने वेल्लालगेला गोलंदाजी दिली. सिराजने सदिरा समरविक्रमाला तर वॉशिंग्टन सुंदरने जेनिथ लियानागेला बाद केल्याने श्रीलंकेचा डाव सहा बाद १९९ असा गडगडला. या दरम्यान यजमान संघाने २८ धावांत पाच गडी गमावले. मात्र, कुशल मेंडिस (५९) आणि कामिंडू मेंडिस (नाबाद २३) यांनी सातव्या विकेटसाठी ३६ धावा जोडल्या आणि संघाची धावसंख्या २५० धावांच्या जवळ नेली.

               गेली २७ वर्ष भारत वनडेमध्ये श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व राखून होता. मात्र टि२०चा विश्वविजेता कर्णधार रोहित शर्मा मागील सर्व कर्णधारांची अलौकिक कामगिरी पुढे नेऊ शकला नाही. वैयक्तीकरित्या त्याने ५८, ६४, ३५ अशा शानदार खेळी करून स्वतःचे काम प्रकारे केले. कर्णधार म्हणूनही तो निष्प्रभ नव्हता. मात्र कोहली, पंत, राहुल, दुबे, श्रेयस, गिल हे नावाजलेले फलंदाज निव्वळ आयपीएलचे कागदी वाघ ठरले. त्यामुळे संघाच्या इज्जतीचा फालुदा झाला व रोहितचे कर्णधार म्हणून रेकॉर्ड खराब झाले.

               चॅम्पियन्स ट्रॉफी तोंडावर आली असून त्यापूर्वीच हा धक्का बसला ते एक अर्थी चांगलंही झालं. कारण या चुकांमधून बरेच काही शिकता येईल व पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा करता येईल. "जे होतं ते भल्यासाठीच '' हि जुनी म्हण खरीच म्हणावी लागेल तर.



लेखक : -   
डॉ. दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close