*जयभवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीच्या विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी केला अनोखा उपक्रम*
इंदापूर: जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या विद्यार्थ्यांनीनी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये, राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणाऱ्या तसेच परकीय, अंतर्गत आक्रमणापासून देशाचे रक्षण करणाऱ्या, सीमेवर शांतता व सुरक्षा कायम ठेवणाऱ्या सैनिकांसाठी राखी बनवण्याचा अनोखा उपक्रम केला.
कुटुंबापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आणि राष्ट्रासाठी आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ देणाऱ्या सर्व वीर जवानाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या जाणीवेतून , भारत मातेच्या रक्षण करणाऱ्या बंधूला दीर्घायु लाभावे या उद्देशाने आपली बहीण या नात्यानेच हितचिंतक म्हणून सैनिकांसाठी स्वतःच्या कौशल्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या, आकर्षक राख्यांची निर्मिती प्रशालेमधील विद्यार्थीनींनी स्वतः केली. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेतील मार्गदर्शक शिक्षिका ट्विंकल देशमुखे व दिपाली चव्हाण यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले .
समाज जीवन जगत असताना आपण कोणाच्यातरी ऋणात राहत असतो तसेच आपले सैनिक सीमेवर लढत आहेत म्हणून आज आपण सुरक्षित जीवन जगत आहोत, हीच सैनिकाप्रती जाणीव ठेवून व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तसेच देशहितासाठी व देशवासीयांसाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचा आदर या भावनेतून हा उपक्रम राबवण्याची प्रेरणा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष माननीय श्री. श्रीमंत ढोले यांनी दिली.
हा अनोखा उपक्रम विद्यार्थिनींनी यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष माननीय श्री.श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले,मुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव साहेब, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, शिक्षकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.