श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने भंडारदरा ओव्हरफ्लोचे पाणी कॅनॉल द्वारे सोडून मुठेवाडगाव, टाकळीमानचा टेल टॅंक. तसेच इतर गावोगावीचेही पाझर तलाव, साठवण तलाव व बंधारे भरून द्यावेत अशी मागणी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेसच्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले.
ससाणे पुढे म्हणाले की, एकीकडे मोठा पाऊस पडतो आहे तर दुसरीकडे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भंडारदरा लाभक्षेत्रातील गावांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही तसेच विहिरीतील पाण्याची पातळी अपेक्षित रित्या वाढलेली नाही, भूजल पातळी अद्याप खालावलेलीच आहे . गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाट पाण्याची मोठी गरज आहे. सध्या सोयाबीनची पिके, ऊस, कपाशी, पशुधनासाठी लागणारा चारा पावसाअभावी सुकत असून चालू हंगामातील पिके वाचवण्यासाठी शेतकरी चिंतातुर आहे. त्यामुळे कालव्याद्वारे भंडारदरा ओव्हर फ्लोचे पाणी कालव्यात तात्काळ सोडून गावोगावीचे तलाव,बंधारे भरून द्यावेत अशी अशी मागणी ससाणे यांनी केली आहे. सध्या भंडारदरा ओव्हर फ्लोच्या पाण्याचा प्रवरा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे हे पाणी कालव्याद्वारे सोडून श्रीरामपूर तालुक्यातील पाझर तलाव, बंधारे भरून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे ससाणे यांनी म्हटले आहे. यावेळी वडाळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जि. प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, बाजार समितीचे संचालक विलास दाभाडे, माजी नगरसेवक मुजफ्फर शेख, मुन्नाभाई पठाण, भारत पवार, मोहन रणवरे, बाबासाहेब बनकर, सनी मंडलिक, प्रदीप वाघुले, बाबासाहेब लोखंडे, सरबजीत सिंग चूग, विशाल साळवे, राजेश जोंधळे,अक्षय जोंधळे, तीर्थराज नवले, सागर दुपाटी, कल्पेश पाटणी आदी मान्यवर उपस्थित होते.
संकलन,समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११