इंदापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने हे आज दि. ३ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. गेली काही दिवसापासून प्रवीण माने यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू होती अखेर हा पक्षप्रवेश पुणे शहरातील निसर्ग मंगल कार्यालयात आमदार रोहित पवार व पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश कार्यकरणी संचालक अमोल भिसे व पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी दिली.
लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे व प्रवीण माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार केला होता. मात्र अचानक प्रवीण माने हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारा असल्याने इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल होणार आहे .हे अनेक दिवसापासून प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा सुरू होती. या पक्षप्रवेशामुळे आता ती चर्चा खरी ठरते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रवीण माने यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह भाजपचा मोठा दबाव असल्याची ही चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता हेच प्रवीण माने अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजवणार आहेत. त्यामुळे इंदापूरच्या राजकारणात बदल घडू लागला आहे. इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तगडा उमेदवार देऊन इंदापूर विधानसभा खेचून आणण्याचे काम होणार असून तशी तयारी या पक्ष प्रवेशाच्या चर्चेतून दिसून येत आहे.
सध्या इंदापूर मध्ये तिरंगी लढत होईल असे चित्र दिसत असून एकीकडे शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रवीण माने व आप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची चर्चा असून दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना २०२४ चे आमदार करण्याची तयारी चालू केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रय भरणे हे फिक्स उमेदवार आहेत असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारीसाठी कोणाची लागणार वर्णी?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून इंदापुरात पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने तर दुसरीकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि बाजार समितीचे माजी सभापती आपासाहेब जगदाळे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.
शरद पवार इंदापूर विधानसभेसाठी आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने दोघांपैकी कोणावर शिक्कामोर्तब करणार की तिसरा पर्याय निवडणार हे अद्याप तरी गुपित आहे.