shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे  कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये जिल्ह्यात १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

    या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.
        शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे किंवा जमा करणे. कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे, जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य  कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.

            शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना  शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणूका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागु राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close