इंदापूर : बावडा येथे (दि.६) रोजी पिंपरी बु| गावचे सुपुत्र महेश भीमराव गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदावरती निवड झाल्याबद्दल किसान सार्वजनिक वाचनालय, किसान बहुउद्देशिय संस्था व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमा प्रसंगी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय ,जिद्द, चिकाटी व प्रयत्नात सातत्य आवश्यक असल्याचे मत किसान सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी व्यक्त केले. किसान सार्वजनिक वाचन, किसान बहुउद्देशिय संस्था व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात प्रमुख वक्ते म्हणून या तिनही संस्थांचे अध्यक्ष पंडितराव पाटील हे बोलत होते .
या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना महेश गायकवाड म्हणाले ,माझी जन्मभूमी जरी पिंपरी बु// हे गाव असले तरी बावडा गाव माझी कर्मभूमी आहे,माझे प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतचं शिक्षण बावडा गावात झाले आहे. माझी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती, लहानपणीच छत्र हरपले असताना सुद्धा अशा संकटकालीन परिस्थितीत बावडा येथील नातेवाईक व गावकऱ्यांनी मला सक्रिय सहकार्य केल्यामुळे मला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून माझे पीएसआय होण्याचे ध्येय गाठता आले त्यामुळे बावडेकरांचे हे ॠण मी केव्हाही विसरणार नाही.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी पंचायत समिती सभापती प्रशांत पाटील हे होते .आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रशांत पाटील म्हणाले,प्रशासकीय सेवेत अत्यंत सचोटीने,निष्ठेने लोकाभिमुख काम करून आपल्या गावचे,समाजाचे नाव राखावे .महेशने प्रथमपासून चांगल्या सवयींचा अंगीकार करून ,प्रयत्नवादावर विश्वास ठेवल्यामुळे त्यास यश मिळवता आले.
या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत गट नेते महादेवराव घाडगे, माजी सभापती प्रशांत पाटील यांनी शाल ,श्रीफळ व हार घालून गायकवाड यांचा सत्कार केला. किसान बहुउद्देशिय संस्थेचे सचिव गणेश घोगरे यांनी शाल व हार घालून तर किसान सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्रसाद ढवळसकर यांनी वाचनालयाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या ५ कादंबऱ्यांचा प्रथम खंड भेट देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमास बावडा ग्रामपंचायतीचे सदस्य व गटनेते महादेव घाडगे ,किसान सार्वजनिक वाचनालयाचे संचालक श्री. प्रसाद ढवळसकर,लक्ष्मण गायकवाड तसेच गणेश घोगरे, अशोक चव्हाण, रोहित चव्हाण, अमीर सय्यद, अच्युत कांबळे, रणजित कांबळे, विशाल घाडगे, ग्रंथपाल पवन पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक पंडितराव पाटील यांनी सत्कारमूर्ती गायकवाड व सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला.