शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार १ ऑगस्ट २०२४
संपत्तीपेक्षा संस्कृती महत्वाची..!!
आयुष्यात तरुणांनी मोबाईलचा वापर मर्यादित करावा- संजय ठेंगे..!!
मोबाईलमुळे मुलांचे वाचन कमी होऊन पुढील पिढीवर दुष्परिणाम होत आहे..!!
राहुरी : विद्यार्थी हा मोबाईल मुक्त असावा, मोबाईलमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढत आहे, मोबाईलमुळे कौटुंबिक संवाद बंद झाला आहे, मोबाईलमुळे मुलांचे वाचन कमी झाले आहे, मोबाईलचे दुष्परिणाम पुढील पिढीवर होत आहे. म्हणून विद्यार्थी हा मोबाईल मुक्त - विरहित असावा. असे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.
श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील स्व. रावसाहेब कोंडाजी साबळे पाटील (अण्णा) विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ठेंगे बोलत होते. भविष्य काळात मोबाईलचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर झालेले दिसून येतील. मोबाईलमुळे वेळेचा अपव्यय होत असून गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढत आहे. विद्यार्थी नको ते पाहतात. चांगलं घ्यायचं सोडून वाईट घेतात. म्हणून सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल मुक्त करावे, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घरातील टीव्ही कमी वेळ पहावा. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय असावी. कौटुंबिक संवाद महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकाकीपणा विद्यार्थ्यांमध्ये नसतो. हितगुज महत्त्वाचे असून संभाषणामुळे विचारांची देवाण-घेवाण होते. संभाषणातून प्रेम वाढते. संपत्तीपेक्षा संस्कृती महत्वाची आहे. मुलं सुसंस्कारित घडले तर संपत्ती कमवू शकतात. नाहीतर किती संपत्ती असून द्या, त्याचा उपयोग होत नाही. भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये म्हणून सर्वांना योग्य संस्कार मिळाले पाहिजे. दुर्योधनामुळे कुळाचा नाश झाला तर भक्त प्रल्हादामुळे कुळाचा उद्धार झाला. म्हणून सर्वांनी मुले सुसंस्कारित घडवावी.
सांप्रदायिक लोकांची बौद्धिक पातळी उंच असते. म्हणून आपण त्यांचे आचरण केले पाहिजे. विहार, आहार, विचार, आचार व उच्चार ही पंचसूत्री महत्त्वाची असते. याच्यातून विद्यार्थी हा घडत असतो. शकुनीच्या संगतीने दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले. आजही काही दुःशासन आहेत. त्यांना आळा घालण्याचे काम पोलीस खाते करत आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थिनींसाठी तक्रार पेटी असावी. मुलींच्या तक्रारीचे निवारण केले जाईल, असे ठेंगे म्हणाले.
गणेशोत्सवात सर्वांनी डीजे बंदी करून टाळ - मृदुंगाच्या गजरात गणपती विसर्जन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. गणेशोत्सवातून सामाजिक एकता तयार होते. म्हणून टिळकांनी हा उत्सव सुरू केला आहे. समानता, एकता व बंधुत्व ही त्रिसूत्री साधु संतांनी दिली. ताहाराबाद ह्या पवित्र- पावन भूमीतून मोबाईल मुक्त विद्यार्थी, डीजे मुक्त गणेश उत्सव व भयमुक्त विद्यार्थिनी हा संदेश 'पांडुरंग उत्सवा'तून समाजाला देऊ, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, व्यवस्थापकीय विश्वस्त बाबासाहेब वाळुंज, सरपंच निवृत्ती घनदाट, कामगार पोलीस पाटील किरण उदावंत, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष सिताराम झावरे, विश्वनाथ किनकर, नारायण झावरे, शरद किनकर, पोपट किनकर, गणपत झावरे, दिगंबर झावरे, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी झावरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक धोंडीभाऊ गागरे यांनी मानले.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600