उध्दव फंगाळ / मेहकर:
पुणे - माणसांचे गुणगान गाणारे, माणसे समृद्ध करणारे आणि माणसांना आत्मभान देणारे विचार साहित्यिक आणि विचारवंतांनी दिले पाहिजे. विचारांना कोणतीही सीमा न ठेवता ते वैश्विक असले पाहिजेत. प्रत्येक माणसाला ते विचार आपले वाटणारे असावेत. शोषितांच्या, वंचितांच्या, स्त्रियांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाणे हे साहित्यिक आणि विचारवंतांचे लक्षण असते. असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी व्यक्त केले.
स्वर्गीय राजकुमार काळभोर यांच्या जयंती निमित्ताने घेण्यात आलेले तिसरे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले सभागृह वानवडी पुणे येथे आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उद्घाटक शरद गोरे, स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, संमेलना अध्यक्ष वसुधाताई नाईक, पुणे विभागीय अध्यक्ष आणि निमंत्रक सूर्यकांत नामूगडे, राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती शुभांगीताई काळभोर, निलेशदादा काळभोर, प्रा. सुरेश वाळेकर, ज्ञानेश्वर धायरीकर, नानाभाऊ माळी आणि साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय राजकुमार काळभोर यांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या गुण कौशल्य धारकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चित्रकार बजरंग पवार यांनी काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राचे अनावरण तसेच कवयित्री सिंधू साळेकर यांच्या कस्तुरी गंध या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या राज्यस्तरीय संमेलनासाठी महाराष्ट्राच्या बुलढाणा, सातारा, बारामती, मुंबई, नाशिक, राजगुरुनगर, रायगड, भोर, सोलापूर आणि पुणे अशा विविध शहरातून कवी कवयित्रींनी उत्स्फूर्तपणे आपल्या बहारदार काव्यरचना सादर करून सभागृहातील रसिकांचे मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत नामूगडे आणि विनोद अष्टुळ यांनी तर आभार श्रीमती शुभांगीताई काळभोर यांनी व्यक्त केले.
मंचावर बोलताना शरद गोरे, सूर्यकांत नामूगडे, विनोद अष्टुळ, किशोर टिळेकर, सुरेश वाळेकर, वसुधाताई नाईक, शुभांगीताई काळभोर, ज्ञानेश्वर धायरीकर आणि नानाभाऊ माळी आदि मान्यवर
संकलन,समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर, ९५६११७४१११