श्रीरामपूर / प्रतिनिधी:
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील आज शुक्रवार (ता.९) रोजीचा वडाळा पाटबंधारे कार्यालयावर आयोजित शेतकऱ्यांचा मोर्चा मागण्या मान्य झाल्याने स्थगित करण्यात आल्याची माहिती अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन व लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रवरा नदीपात्रात ओव्हरफ्लोचे सोडण्यात आलेले पाणी भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील प्रवरा डावा व उजव्या कालव्यांना सोडून शेतीसाठी आवर्तन घ्यावे तसेच गावोगावच्या पिण्याच्या पाण्याचे गावतळी ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून घेण्यात यावी, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने वडाळा पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता यांना निवेदन देऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
वडाळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संजय कल्हापुरे यांचेशी समक्ष झालेल्या चर्चेत त्यांनी ओव्हरफ्लोच्या पाण्याने गावतळी भरून देण्यात येतील व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी पाणी देण्यात येईल, असे मान्य केले. तसेच आवर्तन घेण्याबाबतचा विषय हा कालवा सल्लागार समितीच्या अखत्यारीत असल्याने आवर्तन घेणेबाबत कालवा सल्लागार समितीकडे शिफारस करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. निवेदनातील सर्व मागण्या मान्य झाल्याने आजचा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती श्री.धुमाळ यांनी दिली.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११