गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आणि श्रीलंका दौऱ्यावर टि२० आंतरराष्ट्रीय मालिकेने त्याचा कार्यकाळ सुरू झाला आहे. तीन टि२० आंतरराष्ट्रीय आणि एका वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात तो प्रशिक्षक होता. त्यामध्ये भारताने यापैकी एकही सामना गमावला नाही. पण राहुल द्रविडला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त एकदाच जो अनुभव आला तो गौतम गंभीरने फक्त चार सामन्यांमध्ये दोनदा अनुभवला. तर रवी शास्त्री यांच्या संपूर्ण कार्यकाळातही असे केवळ दोनदाच घडले. हा विषय आहे सफेद चेंडूच्या खेळात प्रशिक्षक म्हणून भारताच्या शेवटच्या तीन प्रशिक्षकांनी घेतलेल्या टाय सामन्यांच्या अनुभूतीचा.
गौतम गंभीरच्या चार सामन्यांच्या छोट्याशा कार्यकाळात टीम इंडियाचे दोन सामने टाय झाले आहेत, तर राहुल द्रविड जेव्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते, तेव्हा फक्त एकदाच सामना टाय झाला होता. राहुल द्रविड सन २०२१ ते २०२४ या कालावधीत १६० सामन्यांमध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता आणि या काळात फक्त एकच सामना टाय झाला. रवी शास्त्रीही त्याच्या आधी बराच काळ टिम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता. त्याने १९० सामन्यांमध्ये प्रशिक्षकपद भूषविले, पण टीम इंडियाचा सामना बरोबरीत सुटण्याचा प्रकार केवळ दोनदाच घडला. परंतु गंभीरच्या कारकिर्दीत असे चार सामन्यांतच दोनदा घडले.
श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर त्याच्या दोनच दिवस आधी श्रीलंकेविरुद्धच्याच टि२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा सामना बरोबरीत सुटला होता. अशाप्रकारे गंभीरच्या कारकिर्दीतील दोन सामने टाय झाले. भारताने टि२० मालिका सुपर ओव्हरमध्ये जिंकली असली तरी एकदिवसीय मालिकेत सुपर ओव्हर नाही, त्यामुळे हा सामना बरोबरीत राहीला. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना टाय झाल्यास त्याचा निकाल निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर असते.
आपल्या अनोख्या शैली व स्वभावासाठी गंभीर प्रसिध्द असून त्याच्या स्वभावाच्या काही पैलूंवर जगभरातील अनेक खेळाडू, टिकाकार वेगवेगळे मतं बाळगून आहे. यापैकीच एक असलेला गंभीरचा टिम इंडियातील माजी सहकारी जोगिंदर शर्माने गंभीर व त्याचे पुढील भवितव्य या विषयी स्पष्ट मतं मांडली आहेत.
सन २००७ च्या टि२० विश्वचषक फायनलचा हिरो जोगिंदर शर्माने नुकता टिम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबद्दल मोठा दावा केला असून, गंभीर या पदावर जास्त काळ टिकू शकणार नाही असे त्याचे मत बनले आहेत. टि२० विश्वचषक २०२४ नंतर राहुल द्रविडची जागा गौतम गंभीरने घेतली आहे. त्याचे टीम इंडियातील आगमन उत्कृष्ट झाले. भारताने श्रीलंकेचा टि२० मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश केला, तर गंभीर रोहित शर्मासोबत त्याची पहिली मालिका प्रशिक्षण करत आहे. जोगिंदर शर्माचा असा विश्वास आहे की गौतम गंभीर हा खुशामत करणारा माणूस नाही आणि त्याच्या काही निर्णयांमुळे खेळाडूंशी भांडण होऊ शकते.
एका यूट्यूब चॅनलवर जोगिंदर शर्मा गौतम गंभीर बद्दल म्हणाला, "गौतम गंभीर संघाची काळजी घेणार आहे पण मला विश्वास आहे की, गौतम गंभीर जास्त काळ टिकू शकणार नाही. कारण गौतम गंभीरचे स्वतःचे काही निर्णय आहेत. कोणत्याही खेळाडूशी मतभेद होऊ शकतात, मी विराट कोहलीबद्दल बोलत नाही. तो पुढे म्हणाला, "गौतम गंभीर हा सरळ बोलणारा आहे. तो कोणाकडेही जाणार नाही. गौतम गंभीर चापलूस करणारा नाही. त्याला श्रेय देणारे आम्हीच आहोत. तो त्याचं काम मनापासून मोठ्या प्रामाणिकपणे करतो."
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा करार सन २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत आहे. या कालावधीत टीम इंडियाला सन २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी, सन २०२६ ची टि२० विश्वचषक आणि सन २०२७ ची विश्वचषक अशा तीन आयसीसी स्पर्धा खेळायच्या आहेत. याशिवाय भारत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही खेळू शकतो.
एवढया प्रदिर्घ काळ गौतम आपल्या भूमिकेशी गंभीरतेने तडजोड करेल का हा गंभीर प्रश्न त्याचाच मित्र व सध्या हरियाणा पोलिसात डिएसपी पदावर कार्यरत असलेल्या जोगिंदर शर्माने केल्याने थोडी काळजी व चिंता वाटणे साहजिकच आहे.
लेखक : -
डॉ. दत्ता विघावे
ग्क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२