भले क्रिकेट हा जन्माने इंग्लिश असला तरी आता तो पुर्णतः भारतातच स्थायिक झाला आहे. दिडशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात क्रिकेट इतका लोकप्रिय बनला असून क्रिकेटच्या जीवावर अनेकांचे जीवन चालते. क्रिकेट हेच अनेकांचे जीव की प्राण बनले आहे. इतकंच नाही तर क्रिकेटला धर्म व क्रिकेटपटूंना देव मानणाऱ्यांचे प्रमाणही भारतात खूप मोठे असून काही क्रिकेट भक्तांनी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे मंदिरे देखील बांधले आहेत. हल्ली अनेक नामांकित कंपन्या, उद्योजक आपल्या उत्पादनांचा खप वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये क्रिकेटपटूंना मोठ्या प्रमाणात चमकवताना दिसतात. त्या बदल्यात खेळाडूंना भरमसाठ पैसाही दिला जातो. आपला आवडता खेळाडू सदर जाहिरातीत काम करतोय हे बघून अंध क्रिकेट भक्त संबंधित जाहिरात व मालाची कुठलीही शहानिशा न करता ती वस्तू वापरतो व फसतो.
सध्या तरी क्रिकेटपटूंच्या लोकप्रियतेचा लाभ मद्य, तंबाखू, गुटखा व ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कंपन्या मोठया प्रमाणात आपल्या मालाच्या जाहिराती करताना दिसत असून सोशल मिडीया, मोबाईल, टिव्ही, वृत्तपत्रांत त्यांच्या जाहिराती बिनधास्तपणे प्रसारीत करत आहेत. इतक्या सहजतेने संबंधीत पदार्थ व घटकांची जाहिरात होत असल्याने भाबडे क्रिकेट चाहते आपल्या लाडक्या खेळाडूने केलेल्या जाहिरातीचे अनुसरण करतात. परिणामत: मद्य, गुटखा, तंबाखू व जुगार यांच्या आहारी जाऊन आपले जीवन उधवस्त करून घेत आहेत. निव्वळ भारतातीलच नव्हे तर जगाभरातील अनेक रसिक या खोट्या जाहिरातींचे बळी पडत असून यामुळे अनेक कुटुंबं व पिढ्या बरबाद होऊ शकतात.
भारतीय क्रिकेटमध्येये मानाचं स्थान असलेले सुनिल गावस्कर, कपिलदेव, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, वेस्ट इंडियन ख्रिस गेल सारखे सुप्रसिध्द खेळाडू स्वतःला मिळणाऱ्या भरमसाठ पैशासाठी त्यांनाच मानणाऱ्या चाहत्यांना देशोधडीला लावण्याचं काम करत आहेत. याचा होणारा मोठा व विघातक दुष्परिणाम लक्षात घेता भारत सरकार व त्यांचे आरोग्य मंत्रालयही हरकतमध्ये आले असून त्यांनीही सक्त पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
त्याचाच भाग म्हणून की काय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) खेळाडूंना तंबाखू आणि दारूच्या अप्रत्यक्ष जाहिराती करण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे. केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील लाखो तरुणांसाठी ते आदर्श आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि एसएआयचे महासंचालक संदीप प्रधान यांना लिहिलेल्या पत्रात, आरोग्य सेवांचे महासंचालक (डीजीएचएस) डॉ.अतुल गोयल यांनी गुरुवारी सांगितले की, खेळाडूंनी, विशेषत: क्रिकेटपटूंना निरोगी, सक्रिय प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तसेच उत्पादक जीवनशैली तरुणांसाठी आदर्श आहे.
गोयल म्हणाले, "भारतातील खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांना लक्षात घेऊन धोरणे, फ्रेमवर्क, क्रिकेटच्या खेळाला आणि त्याचे प्रशासन, प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे काम बीसीसीआयकडे सोपविण्यात आले आहे. या काळात काही प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध अभिनेते तंबाखू आणि अल्कोहोलशी संबंधित उत्पादनांचे अप्रत्यक्षपणे समर्थन करताना पाहणे निराशाजनक आहे.”
"या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, बीसीसीआय खेळाडूंना तंबाखू, गुटखे व अल्कोहोल संबंधित उत्पादनांना अप्रत्यक्षपणे मान्यता देण्यापासून रोखण्यासाठी सकारात्मक पावले उचलू शकते," डिजीएचएसने काही उपाय सुचवले आहेत, जसे की तंबाखू विरोधी 'स्वास्थ्य घोषणा' करार फॉर्मवर स्वाक्षरी करणे, स्टेडियममध्ये जाहिरात न करणे किंवा बीसीसीआयद्वारे आयोजित किंवा सहभागी झालेल्या कार्यक्रमांमध्ये आणि बीसीसीआय अंतर्गत खेळाडूंना तंबाखूचे मुखवटे घालण्यास बंदी घालणे आवश्यक आहे. तसेच संबंधित उत्पादने जाहिरात,भागीदारी, तसेच जाहिराती करण्यापासून दूर राहण्यासाठी सूचना जारी करणे.
गोयल म्हणाले, "पुढे, अशी विनंती आहे की इतर सेलिब्रिटींच्या अशा छद्म-जाहिरातींना आयपीएलसारख्या बीसीसीआयच्या क्रीडा स्पर्धांमध्ये परवानगी देऊ नये. मला आशा आहे की तुम्ही या छद्म-जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या सेलिब्रिटींना केवळ देशातीलच नव्हे तर जगभर रोल मॉडेल मानले जाते. पण जगभरातील लाखो तरुणांनी त्यांचे अनुकरण केले तर जगाचे अधःपतन निश्चित होईल.
तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, दरवर्षी सुमारे १३.५ लाख टाळता येण्यासारख्या मृत्यूंची नोंद होते. शिवाय, भारतातील सर्व कर्करोगाचे ३३ टक्के प्रकरणे तंबाखूशी संबंधित आहेत, त्यापैकी सुमारे ५० टक्के पुरुष आणि १७ टक्के महिलांमध्ये तंबाखूमुळे होते.
सरकार, बीसीसीआय, साई हे पुढे जात कडक पावले उचलून संबंधीतांवर कठोर कारवाई करेलही, पण संबंधीत खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री यांनी जनाची नाही पण मनाची लाज राखून स्वतःची नैतिकता म्हणून तरी केवळ पैशाच्या मागे न पळता असे अघोरी उद्योग बंद करावेत. अन्यथा जनतेनेही अशा समाजकंटकांना बहिष्कृत करण्यासारखे कठोर पावले उचलावेत.
लेखक : -
डॉ. दत्ता विघावे
ग्क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२