दुःखाचे मूळ कारण काय ?
दुःख कशाने होते हे शोधताना बुद्धांनी ‘तृष्णा हीच सतत दुःख निर्माण करण्यास कारण असल्याचे सांगितले. लोभाचा हव्यास ,किंवा द्वेष करण्याचा हव्यास म्हणजे तृष्णा. अज्ञानामुळे माणूस आपण या जगात अमर राहणार आहोत या भावनेने सतत हव्यास मोह करत असतो. पंचेद्रिय म्हणजे डोळे,नाक ,कान,जीभ व त्वचा व सहावे इंद्रिय मन यांना रुपाची,रंगाची , वासाची, आस्वाद घेण्याची , चांगला आवाज ऐकण्याची स्पर्शाची, तसेच मनाला भावलेल्या विचाराची कल्पनेची पुन्हा पुन्हा इच्छा होते.ती असते तृष्णा. एखाद्या माणसाला सुख मिळविण्याची किंवा वर्तमान जीवनात आणि भविष्य स्वप्नात देखील तृष्णा असते ती सतत मौज करू पाहते , काम भोग घेण्याची इच्छा मनात निर्माण करते. प्रत्येक माणसाच्या मनात ही तृष्णा आहे ,म्हणूनच दुःख जन्मते. अविद्या हे दुःखाचे मूळ कारण आहे.अविद्येमुळे तृष्णा जन्म घेते.
तृष्णा तीन प्रकारची आहे. काम म्हणजेच सुखोपभोग उपभोग घेण्यासाठीची काम तृष्णा.भव तृष्णा म्हणजे भव आसक्त असलेली तृष्णा.
विभव तृष्णा म्हणजे दुसऱ्याचे अहित करण्याची, द्वेष करण्याची,तृष्णा वैर आणि द्वेष हेच याचे मूळ असते. थोडक्यात लोभ , द्वेष ,मोह , क्रोध या प्रकारचे विकार जे दुःख निर्माण करतात. पद , पैसा , प्रतिष्ठा , सत्ता ,संपत्ती ,मान -सन्मान , सौंदर्य शक्ती , इत्यादी गोष्टी मानवाच्या मनात आसक्ती निर्माण करतात.या गोष्टींची अभिलाषा यात आसक्ती असते.ती माणसाला गुलाम बनवते.भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी सतत व्याकूळ होणे हे दुःख निर्माण करणारे असते .त्यांना वाटते कि भौतिक गोष्टी मिळाल्या की सुख मिळते.पण एक मिळाली की दुसरी मिळविण्याची अभिलाषा वाढत जाते. त्यातून मला जे हवे ते मिळायलाच पाहिजे ही ओढ तीव्र होते. त्यातून काम लालसा तयार होते. पुढे मी मिळविलेली गोष्ट म्हणून तिच्यावर मालकी माझीच हवी ही भावना निर्माण होते. आपण मिळविलेल्या भौतिक वस्तूचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्याकडे येते. यातूनच मारामारी ,जखम , संघर्ष,भांडण ,असत्यता ,या
सारख्या वाईट गोष्टी सुरु होतात .शील चांगले राहत नाही, एका मागून एक दुःखाची मालिका तयार करत आपण जात असतो. आसक्ती ही भौतिक वस्तू किंवा हवी त्या गोष्टीचे दास बनविते. तृष्णेमुळे मानसिक दास्य येते. मनात येणाऱ्या या लोभ विषयक इच्छा नाहीशा केल्या तर दुःख व्हायचे काहीच कारण नाही,. गरजेपेक्षा अधिकची तृष्णा अति दुःख देत असते. वस्तू , किंवा संवेदना या एक सारख्या राहत नाहीत त्या अनित्य असतात .जन्मलेली गोष्ट नष्ट होते हे जागतिक सत्य आहे. तसे मिळविलेली गोष्ट कायम आपल्याला सुख देईलच असे नाही. त्या अभिलाषेत राहणे हे दुःखाला कारण होते. भगवान बुद्धांचा मध्यममार्ग या एस.एम. मोरे लिखित ग्रंथात त्यांनी अभिधम्मात तृष्णेचे १०८ प्रकार असल्याचा उल्लेख केला आहे. रूप आसक्ती शब्द आसक्ती,गंध आसक्ती , रस आसक्ती ,स्पर्श आसक्ती आणि कल्पना किंवा विचार याकडे असणारी मनाची आसक्ती. ही तृष्णेची विविध रूपे आहेत. या प्रकारच्या आसक्ती मध्ये मजा किंवा सुख वाटते म्हणूनच आसक्ती वाटत असते. मग प्रश्न पडतो की आसक्तीने सुख मिळत असेल तर दुःख व्हायला कारण आसक्ती का बरे असेल ? याचे उत्तर असे की एकदा सुख मिळाले की ते सुख पुन्हा पुन्हा हवे वाटते , सुखाची चटक लागते. अभिलाषा सतत सुरु होते. आसक्तीला अंत राहत नाही. अनेक विषयांची आसक्ती सुरु होते. पुन्हा पुन्हा मिळावे ही वासना वाढते ,सुख मिळतेच आहे तर अजून सुख मिळावे, दुःख वेदना असेल तर साहजिकच सुख मिळावे, दुःखापासून मुक्त व्हावे ,सुख मिळवावे म्हणून सतत धडपड चालू असते. वासनेने पछाडलेले असणे ही काम तृष्णा आहे. सतत निरंतर गतीने उफाळून येणे यात होते.कामपूर्ती झाली तर अधिकच वाढते. मी जगात अमर राहणार आहे,पुढच्या जन्मात देखील मी कायम असणार आहे अशा प्रकारची विचारसरणी हे सुद्धा दुःखाचे कारण आहे. याला भव तृष्णा म्हणतात. आम्ही कसेही वागू खा ,प्या ,मजा करा..या दृष्टिकोनाचे लोक जे सतत हपापलेले असणे ही विभव तृष्णा आहे. थोडक्यात सुख दुःखादी संवेदनेमुळे तृष्णा निर्माण होत असते. भगवान गौतम बुद्धांनी प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत सांगितला. त्यात दुःखाची कारण परंपरा सांगितली आहे. दुःखाच्या कारणांचा घटनाक्रम समजून घेऊया.
ती अशी – अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नाम रूप , नामरूपामुळे षडायतन , षडायतणामुळे स्पर्श , स्पर्शामुळे सुख दुःख वेदना ,वेदनेमुळे तृष्णा , तृष्णेमुळे उपादान , उपादानामुळे भव ,भवामुळे जन्म ,आणि जन्म झाल्यामुळे जरा,मरण, शोक, परिदेव ,दुःख ,दौर्मनस्य आणि उपायास उत्पन्न होतात. असे दुःख निर्माण होते. या १२ कड्या आहेत. म्हणजे दुःख निर्माण व्हायला ही एकमेकावर एक अवलंबून असलेल्या कड्या समजून घ्यायला पाहिजेत. दुःख आहे ,पण दुःख कसे निर्माण होते याचा शोध घेताना निसर्गात नेमके काय घडते आहे याचा शोध घेऊन त्यांनी प्रतीत्यसमुतपाद सिद्धांत सांगितला. काय होण्यामुळे
काय उत्पन्न होते हा नियम त्यांनी शोधून काढला पण सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात हा सिद्धांत समजणार नाही.म्हणून धम्म समजून घेताना हा सिद्धांत समजून घ्यावा लागेल. यातून एक गोष्ट लक्षात येते कि कोणतीही गोष्ट शास्वत नाही, नित्य नाही .ती अनित्य आहे. सर्व पदार्थ क्षणभंगुर आहेत. हे झाले की ते होते,अशी ही साखळी आहे .
१ अविद्या २ संस्कार ३ विज्ञान ४ नामरूप -५ षडायतन ६ स्पर्श ७ वेदना ८ तृष्णा ९ उपादान १० भव ११ जाती [जन्म ]१२ दुःख [ जरा ,मरण, शोक,परिदेव , दौर्मनस्य आणि उपायास ] अशी ही चेन आहे. १ अज्ञान अनंत काळापासून आपण अज्ञानी आहोत. चार आर्य सत्य,मानवी प्रकृती आणि तिचे चलन वलन याबातीत अज्ञानी आहोत. थोडक्यात निसर्गात भौतिक व मानसिक व्यवहार कसे होतात याचे मनुष्याला ज्ञान नाही. [अविद्या] २ संस्कार अज्ञान असल्यामुळे आपल्यात दोष असलेले विचार जन्म पावतात त्या प्रमाणे कार्य करण्याची चेतना निर्माण होते. यालाच संस्कार असे म्हटले आहे. ३ विज्ञान त्यामुळेच संस्कार सत्य शोधण्यास आपण प्रवृत्त होतो यातूनच ज्ञान विज्ञान संरचना काय हे समजून घेण्याची प्रेरणा मिळते. विज्ञानामुळे इंद्रियविषयाच्या अस्तित्वाची ओळख होते. संवेदना, चेतना ,प्रत्येक इंद्रियाची कार्यपद्धती ,मनाने मानसिक गोष्टी कळणे , हे विज्ञानाने कळते. विशिष्ट इंद्रियविषय विज्ञान जागृत होत नाही तो पर्यंत इंद्रिय विषय कळत नाहीत. आपले मन भटकले असेल तर पुढे पुस्तकात आपण काय वाचतोय हे कळत नाही कारण त्यावेळी चक्षुइंद्रियविज्ञान जागृत नसते. वर्गात शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्याचे मन तिथे नसेल तर काय बोलतात ते कळत नाही. कारण त्यावेळी आपले कानाच्या विषयाचे विज्ञान ४ नाम रूप ज्या द्वारे व्यक्तिगत ओळख ,म्हणजे नाम रूप –समजून घेता येतो .प्राण्याचे वस्तूचे नाव आपण त्याचे रूप ,आकार , किंवा विशिष्ट खूण,विशिष्ट प्रवृत्ती,वर्तन इतर गोष्टीवरून ठेवतो. नाव ठेवल्यामुळे आपल्याला तो प्राणी ,पक्षी किंवा वस्तू ही हाच आहे हे कळते .थोडक्यात नावामुळे त्या वस्तू अगर प्राण्याचे स्मरण आपण करतो नाम रूप म्हणजे त्या वस्तूची ओळख तसेच तिची वैशिष्ट्ये आपल्याला कळतात . ५ षडायतन नामरूंपानंतर पाच इंद्रिये आणि सहावे मन म्हणजे षडायतन . इंद्रिय विषय,इंद्रिय विज्ञान आणि मनाचे माध्यमातून एक प्रकारचा समन्वय होत एक रूप तयार होते. मन रंग , रूप ,घनता ,आकार ,किंवा स्पर्श समजू शकत नाही पण इतर इंद्रीयाशी असलेल्या समन्वयाने ते जाणू शकते. मन अदृश्य आहे ,अस्पर्शी आहे ते या इतर पंचेंद्रिय यांना कळत नाही. पण मन पंचेद्रीयाच्या हुकुमाने चालत नाही तर ते त्यावर अधिपत्य गाजवते.बुद्धांनी म्हणूनच सांगितले आहे की मन घडविते तसा मनुष्य घडतो. दृश्य आकृती रंग, आवाज, गंध ,स्पर्श ,चव इत्यादी इंद्रिय विषय असले त्याचा सबंध पंचेद्रीयांशी आला तरच विज्ञान जागृत होते. जर कल्पना व विचार यां विषयाशी सबंध आला तर मनइंद्रिय विज्ञान जागृत होते. म्हणजे विज्ञान देखील शाश्वत नाही ते क्षणाक्षणाला बदलत असते. मन आणि इंद्रियाचा मिलाफ गरजेनुसार होत असतो.रूप, वेदना , सद्न्या, संस्कार,विज्ञान या पाच स्कंधाना वेगळे काढता येत नाही. ६ स्पर्श वस्तू आणि इंद्रिये यांचा एकमेकांना स्पर्श होतो.त्यातूनच मग संवेदना जन्माला येतात. वेदना वेदना म्हणजे संवेदना वस्तू आवडते तेंव्हा सुख संवेदना निर्माण होतात. आवडत नाही तेंव्हा क्रोध ,नकार या प्रकारच्या संवेदना तयार होतात .यातील ज्याने सुखद अनुभूती येते त्या वस्तू ,गोष्टी ,व्यक्ती इत्यादीची आसक्ती निर्माण होते. त्याला तृष्णा म्हणतात. तृष्णा तृष्णा म्हणजे इच्छित गोष्ट मिळविण्याची तहान .ही तहान वाढतच जाते. वस्तू मिळाली तरी पुन्हा पुन्हा तो अनुभव हवा वाटतो ,एक मिळाली की दुसरी हवी , दुसरी मिळाली की तिसरी हवी अशी लालसा ,वाढत जाते .हाव संपत नाही. लाभाच्या ओढीने माणूस विकारी होतो ,मला ती मिळालीच पाहिजे अशी दृढता मनात तयार होते. मग मिळालेल्या वस्तूवर माझीच मालकी पाहिजे अशी भावना होते. यातून अधिकार, अहंकार, दादागिरी ,वेळ प्रसंगी मारामारी ,व्याकुळता , रडणे ,चिडणे भांडणे ,त्रागा निंदा ,इर्षा ,द्वेष खोटे बोलणे ,इत्यादी अनेक गोष्टी सुरु होतात त्यामुळे दुःख वाढत जाते .अशांती निर्माण होते. गरजेपेक्षा अधिकची हाव ,लालसा ही दुःख निर्माण करते. कामपूर्ती झाली तरी अजून पाहिजे ,अजून पाहिजे जे हे संपत नाही. त्यातूनच लोभ जन्म घेतो. लोभ लाभाची लालसा अनेक विकार निर्माण करते .अशी म्हण आहे की लोभी लोकांना खूप तहान भूक लागलेली असते .त्यांचे पोट मोठे पण तोंड लहान असते. त्यामुळे त्याला नीट खाता येत नाही .त्यामुळे अशी व्यक्ती अस्वस्थ असते. एखाद्या प्रेयसीच्या साठी तडफडणाऱ्या प्रियकरासारखी बेचैनी, हव्यास तयार होतो.उपादान म्हणजे हाच लोभ .हीच गती पुढे चालत राहते तेंव्हा भव घडते. त्याच प्रकारच्या विचाराची वृत्ती घडते. उपादान म्हणजे लोभ असल्याने भव उत्पन्न होते . त्याच हव्यासाचा गर्भ तयार होतो .आणि त्यातूनच पुढे जाती म्हणजे जन्म होतो. विचार ,वाणी ,कृती प्रबल होते की पुढे त्याच प्रकारच्या प्रवृतीचा जन्म होतो.आपण जसे कर्म करतो तसेच घडत असतो .तसेच परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. पूर्वी जसे कर्म करता तसा वारसा तयार होत जातो. अनुवांशिक वारशापेक्षा भोवतालच्या परिस्थितीचा माणसावर अधिक परिणाम होतो असे बुद्धांचे मत आहे. दुःख- जन्म झाला की मरणापर्यंत शारीरिक ,मानसिक दुःखे मागे लागतात . त्याला कारण मन आहे. जग असे आहे असे वाटणे आणि असणे यात फरक आहे. जरा , मरण ,शोक ,चिंता ,त्रस्तता ,प्रियाचा वियोग ,अप्रीयचे संबंध ,इच्छेची पूर्तता न होणे हे दुःख आहे. ज्या पाच गोष्टीने प्राणी तयार होतो. त्याबद्दलची आसक्ती दुःख निर्माण करते. सुख किंवा दुःखाचे अनुभव हे देखील अनित्य असतात. त्यामुळे त्याच्याबद्दलची आसक्ती निर्माण झाली तर दुःख होते .कारण अनुभव क्षणभंगुर असतात. देह जन्मतो आणि नष्ट देखील होतो. माणसाला लोभ ,द्वेष आणि मोहाच्या लालसेने दुःख होत असते. म्हणून अशी कर्मे न करता मैत्री , करुणा घेऊन कुशल कर्मे केली तर माणसाला सुख मिळते. माणूस दुःख मुक्त होतो ,म्हणजेच त्याला निर्वाण प्राप्त होते. दुःखाला कारण तृष्णा असेल तृष्णामुक्त जीवन जगायला हवे. जगातील सर्वच गोष्टी अनित्य आहेत.तृष्णामुक्त जीवन जगण्यासाठी पंचशील हे खूप महत्वाचे आहे. लोभाच्या प्रवाहात वाहत जाणारा माणूस शेवटी दुःखाच्या सागरात प्रवेश करतो. द्वेषाने द्वेष वाढत जातो. हे जग जसे आहे तसे नीट समजून घेतले जग हे अनित्य आहे याची जाणीव होते. मी मधील फोलपणा लक्षात येतो . त्यामुळे , लोभ,मोह ,द्वेष करण्याची इच्छा उरत नाही. माणूस तृष्णामुक्त होतो तेंव्हा मानसिक शांती समाधान याचा अनुभव तो घेतो. पुढच्या लेखात दुःख निरोध कसा करायचा या विषयी बुद्धांनी काय सांगितले ते पाहू.
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे छत्रपती शिवाजी कॉलेज,
सातारा - ९८९०७२६४४०
*संकलन:*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११