सोनई, दि. २० (वार्ताहर)
शिंगणापूर -राहुरी रस्त्यावर कॉलेजपासून सोनईपर्यंत व सोनईपासून मुळा कारखान्यापर्यंत गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सोनई-राहुरी रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम झाल्याने या रस्त्यावरून शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविकांचे वाहने वेगाने चालतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोनईपासून कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनीची कायमच वर्दळ असते. त्यामुळे येथे कायमच अपघात होत असतात. शाळा, कॉलेजला जाणारी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे या रस्त्यावरून येणे-जाणे असल्याने रस्त्याच्या दुतर्फा गदर्दी असते.
राहुरीकडून येणाऱ्या भाविकांचे वाहने अतिशय वेगाने असतात. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण सध्या वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन येथे सिमेंट काँक्रीटचे गतिरोधक बसवावेत. या आधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्लास्टिकचे स्पीड ब्रेकर बसविले होते मात्र ते आता रस्त्यावरून नाहीसे झाल्याने वाहने अतिशय वेगाने चालतात.
कारखाने सुरू झाल्यानंतर ट्रॅक्टर, बैलगाड्या बाच रस्त्याने जात असल्याने व शाळेतील विद्यार्थी याच रस्त्याने प्रवास करत असतात. त्यातच बसस्थानक परिसरामध्ये या रस्त्यावर फळ विक्रेते यांनी अतिक्रमण केले असल्याने येथे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे कायमच वाहतुकीची कोंडी होताना दिसते. प्रशासनाने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी भाविक व सर्वसामान्यनागरिकांनी केली आहे.