*आ. कानडे यांच्या संकल्पनेतून महिला उद्योजकता विकास कार्यशाळा व महिला आर्थिक साक्षरता मेळावा
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
महिला या समाजाच्या सक्षम घटक आहेत. त्यांच्याकडे उत्तम चातुर्य व व्यवहार ज्ञान आहे. त्या काटकसरीने व्यवहार करतात. त्यांना केवळ मार्गदर्शनाची गरज आहे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला स्वावलंबी होत आहेत. बचत गटाच्या चळवळीतून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन अबला नव्हे तर सबला असल्याचे दाखवून द्यावे, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
आ. कानडे यांच्या संकल्पनेतून स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन व संवाद श्रीरामपूरच्यावतीने येथील स्व. गोविंदराव अदिक सांस्कृतिक सभागृहात आयोजित केलेल्या महिला उद्योजकता विकास कार्यशाळा व महिला आर्थिक साक्षरता मेळाव्यात ते बोलत होते. श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, प्रा. कार्लस साठे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, सरपंच अशोक भोसले, हरिभाऊ बनसोडे, राजेंद्र कोकणे, आबा पवार, राजेंद्र औताडे, शिवाजी गांगुर्डे, माजी नगरसेविका जयश्री शेळके, ऍड. पूजा लावरे, महिला काँग्रेसच्या तालुका समन्वयक रुबीना पठाण, स्वयंशक्तीच्या स्वाती शहा, जिल्हा उद्योग केंद्राचे अशोक बेनके, एफएलओचे नगर येथील राजेश अंभोरे, नाशिक येथील उद्योजिका दिपाली चांडक, नंदिनी रामचंदानी, जयश्री पवार आदी व्यासपीठावर होते.
आ. कानडे म्हणाले, सन ८५ मध्ये आपण लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन गटविकास अधिकारी झालो, पूर्वी महिलांना सक्षम, सुदृढ करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविले जात होते, यावेळी आपण हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी गेलो असता तेथील महिलांशी संवाद करताना महिला गट का स्थापन केला, याची दुःखभरी कहानी त्यांनी सांगितली. तेव्हापासून बचत गटांची संकल्पना अस्तित्वात आली. सेल्फ हेल्थ ग्रुप हे नाव या योजनेला देण्यात आले. परंतु त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने तसेच लोकसंख्येचा ५० % महिला केवळ सक्षम नसल्याने सरकारने त्यांना कर्ज रूपाने मदत करण्याची भूमिका घेतली.
बचत गटांना कर्ज मागणी व ते मंजूर करणे एवढे पुरेसे नाही. मिळालेल्या कर्जाचा, अनुदानाचा उत्तम प्रकारे उपयोग करता आला पाहिजे, शास्त्रशुद्ध पद्धतीने उद्योग म्हणून व संसाराला हातभार लागेल म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, ग्राहक मिळवणे, त्याची जाहिरात करणे या गोष्टी उत्तम प्रकारे करू शकलो तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने उद्योग वाढू शकतो. सरकारच्या योजना या कर रूपाने गोळा केलेल्या जनतेच्या पैशातून केल्या जातात. या सर्व शासकीय योजनांचा लाभ महिलांना मिळाला पाहिजे. लाभांपासून कोणी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. शासकीय योजनांचे प्रशिक्षण तसेच पाठपुरावा केल्यास त्याचे उत्तम रिझल्ट मिळू शकतात, असे ते म्हणाले.
श्रीरामपूर तालुक्यात १७ हजार तर राहुरी तालुक्यातील ३२ गावात दहा हजार महिला बचत गट आहेत. त्यांना सक्षम करण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आज पहिला कार्यक्रम आहे. यापुढेही असे मेळावे घेण्यात येणार आहेत असे सांगून श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आ. कानडे यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी, नगरपालिके अंतर्गत असलेल्या शासकीय योजनांची तसेच बचत गटांना दिलेल्या कर्ज वाटपाची माहिती दिली. श्री. बेनके यांनी, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची तर राजेश अंभोरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची माहिती दिली. जयश्री पवार व नंदिनी रामचंदानी यांनी आपल्या उद्योगाविषयी माहिती दिली. दिपाली चांडक यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी नगरपालिकेतील गुणवंत अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कर्ज मंजूर झालेल्या महिला बचत गटांना चेकचे वाटप करण्यात आले. स्वाती शहा यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११