शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
साईबाबांच्या नगरीत परंपरा जोपासत दहिहंडीचा उत्सव गोविंदानी जल्लोषात साजरा केला. तरुणाईचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक मंडळाच्या गोविंदा पथकांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
शिर्डीमध्ये गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाचे महत्त्व मोठे आहे. अनेक मंडळ वर्षानुवर्षाची परंपरा जोपासत या उत्सवाचे आयोजन करतात. यंदाच्या वर्षी सुध्दा सर्वच मंडळांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून या पारंपरीक सणाचा आनंद निर्माण केला आहे.
शहरातील सर्वच मंडळांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देत गोविंदा पथकांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. गोविंदा पथकांनी ना. विखे पाटील यांचे स्वागत केले. गोविंदांनी सेल्फी काढण्याचा हट्ट पूर्ण केला. मंत्र्यांनी सुध्दा गोविंदांचा उत्साह अधिक वाढविण्यासाठी ठिकठिकाणी सर्वांच्या सत्काराचा स्विकार केला. गोविंदा आला रे आलाच्या तालावर तरुणाईने धरलेल्या ठेक्यावर ना. विखे पाटील यांनाही मोह आवरला नाही. लहानग्या गोविंदांना उचलून घेत त्यांचाही उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.
साई द्वारकामाई प्रतिष्ठान, ५०१ ग्रुप शिर्डी शहर, क्रांती व सन्मित्र युवक मित्र मंडळ यांच्यासह अनेक मंडळाना ना. विखे पाटील यांनी भेटी दिल्या. त्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिक, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेचे दत्तात्रय कोते यांच्या नेतृत्वाखाली जागृती युवक मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराम फिटनेस गोविंदा पथकाने पटकावला. तसेच ना. विखे पाटील यांच्याहस्ते लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिलांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी महिला व पुरुष लकी ड्रॉ विजेत्यांना देखील बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
या दहीहंडी उत्सवासाठी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, रमेश गोंदकर, नितीन कोते, एम्प्लॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, विलास कोते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, निलेश कोते, काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक गोंदकर, सोसायटी चेअरमन तान्हाजी गोंदकर, बाबासाहेब कोते, संग्राम कोते व शिर्डी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागृती युवक मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.