shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राज्यात युवा पिढीच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. ही योजना राज्यातील १२ वी पासून पुढील सर्व प्रकारचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून या योजनेसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असणे आवश्यक आहे. विनाअनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना, उद्योग, महामंडळामार्फत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कालावधीत त्यांना कुशल/ अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल.

कार्य प्रशिक्षण कालावधी ६ महिन्यांचा राहणार असून या कालावधीत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना ६ हजार रुपये, आय.टी.आय व पदविका उत्तीर्णांना ८ हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांना १० हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे. उद्योगक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या (इंटर्नशिप) संधी उपलब्ध होणार आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ७ हजार ९५९ रिक्तपदे अधिसूचीत करण्यात आली असून त्यापैकी ३ हजार ९३४ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. एकूण ३ हजर ७५५ उमेदवार नियुक्ती दिलेल्या ठिकाणी रुजू झाले आहेत. त्यापैकी महसूल १६४, जिल्हा परिषदेचे विविध विभाग ३ हजार ४६, महानगरपालिका ६७, जिल्हा रुग्णालय १८, महावितरण ६३, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ८, इतर शासकीय विभाग ५९ आणि खाजगी आस्थापनांमध्ये उत्पादन, सेवा आणि बँकींग क्षेत्रात ३३० उमेदवारांना रोजगार मिळाला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील विभागात सर्वाधिक युवकांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यातून एकूण १० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असून उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रीया सुरू राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नागापूर येथील कार्यालयात औद्योगिक आस्थापनांसाठी सुविधा केंद्रही सुरू करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही युवकांना कुशल, अर्धकुशल प्रकारचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरणार असून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

*सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी-* युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे जिल्ह्यात १० हजार युवकांना रोजगार देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध शासकीय विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.  युवकांना रोजगारासोबत विविध आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ त्यांना भविष्यातदेखील होणार आहे. अधिकाधिक युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

*निशांत सुर्यवंशी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास*- युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. योजनेत सहभागी होण्याकरिताhttps://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी  किंवा https://forms.gle/6L3Agu9CEfG6A4Uh9 या लिंकवर अर्ज करावा.  कौशल्य विकास व रोजगार कार्यालयात किंवा तालुकास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जावून ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधादेखील आहे. 

संकलन
 *जिल्हा माहिती कार्यालय,अहमदनगर
----------------------------------------------

*प्रसिद्धी:
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close