श्रीलंकेच्या कामेंदू मेंडिसने कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत एकही फलंदाज करू शकलेला तो अद्वितीय पराक्रम केला. श्रीलंका आणि न्युझिलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना गाले येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने ९० षटकांत तीन गडी गमावून ३०६ धावा केल्या होत्या. अँजेलो मॅथ्यूज ७८ धावा करून नाबाद माघारी परतला, कामेंदू मेंडिसने ५१ धावांवर त्याचा जोडीदार होता. मेंडिसने आपले अर्धशतक पूर्ण करताच एक खास विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यापासून, मेंडिसने सलग आठ कसोटी सामन्यांमध्ये पन्नास पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने पाकिस्तानचा फलंदाज साऊद शकीलचा विश्वविक्रम मोडला.
साऊद शकीलने पदार्पणापासून सलग सात कसोटी सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. या चालू मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात मेंडिसने शकीलची बरोबरी केली होती. शकीलबद्दल बोलायचे झाले तर आठव्या कसोटी सामन्यात त्याला अर्धशतकही करता आले नव्हते. पदार्पणापासूनच कामिंदू मेंडिस ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यामुळे त्याला श्रीलंकेचा भावी स्टार म्हटले जात आहे. जर आपण कामेंदूच्या कसोटी आकडेवारीवर नजर टाकली तर तो आपला आठवा कसोटी सामना खेळत आहे, या दरम्यान त्याने १३ डावात ८७३ धावा केल्या आहेत. कामेंदूच्या खात्यात चार शतके आणि पाच अर्धशतकांची नोंद आहे. त्याची सरासरी ७९.३६ इतकी आहे. कामेंदूचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे तो चांगल्या पैकी उपयुक्त अशी फिरकी गोलंदाजी करतो. मात्र तीचं वेगळेपण असं की, समोरचा फलंदाज बघून डावा - उजवा अशी दोन्ही हाताने लिलया गोलंदाजी करू शकतो.
या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात कामेंदूने शतक झळकविले आहे.. श्रीलंकेसाठी दिनेश चंडिमलने सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावले, तर मॅथ्यूज आणि कामेंदूने अर्धशतक केले. सामन्याचा पहिला दिवस किवी गोलंदाजांसाठी खूपच कठीण गेला. कर्णधार टीम साऊदीने एक आणि ग्लेन फिलिप्सने एक विकेट घेतली, याशिवाय सामन्याच्या पहिल्या दिवशी एकाही किवी गोलंदाजाला यश मिळाले नाही.
श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज दिनेश चंडिमलने गुरुवारी न्युझिलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकवून मोठी कामगिरी केली आहे. पथुम निसांका बाद झाल्यानंतर क्रिझवर आलेल्या दिनेशने १७१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. चंडिमलचे हे कसोटीतील सोळावे शतक आहे. यासह त्याने श्रीलंकेकडून खेळताना सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक असलेल्या दिग्गज सनथ जयसूर्याची बरोबरी केली. शतक झळकविल्यानंतर दिनेश जास्त वेळ टिकला नाही, ग्लेन फिलिपने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
दिनेश चंडिमलची कसोटी क्रिकेटमधील पन्नासपेक्षा अधिकची ही ४५ वी धावसंख्या होती. यासह त्याने सनथ जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जयसूर्याने ११० सामन्यांमध्ये ४५ वेळा फिफ्टी प्लस स्कोर केला होता. दिनेश चंडिमलने अवघ्या ८४ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. श्रीलंकेसाठी सर्वाधिक फिफ्टी प्लस स्कोअर करण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या (९३) नावावर आहे. महेला जयवर्धने (८४), अँजेलो मॅथ्यूज (५९) आणि दिमुथ करुणारत्ने यांनी ५५ वेळा ही कामगिरी केली आहे.
दिमुथ करुणारत्नेसोबत दिनेशने दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात न्युझिलंडचा ६३ धावांनी पराभव केला होता. श्रीलंकेचा डब्ल्यूटीसी फायनल पर्यंतचा प्रवास सोपा असणार नाही. त्यांना न्युझिलंडविरुद्ध सुरू असलेली कसोटी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी आणि मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटींसह उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. जर त्यांनी असे केले तर ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतात.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२