shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूरची रश्मी शिंदे झालीमिस इंटरनॅशनल इंडिया !


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या डिवाइन गृपने आयोजित केलेल्या मिस डीवाईन ब्यूटी २०२४ सौंदर्य स्पर्धेच्या प्रतिष्ठित मिस इंटरनॅशनल इंडिया स्पर्धेत श्रीरामपूरच्या मिस रश्मी प्रेरणा राजीव शिंदे हीने विजयाची पताका रोवली आहे. श्रीरामपूर सारख्या तालुका पातळीवरील ठिकाणाहून येऊन आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद मिळवणारी रश्मी शिंदे ही संपूर्ण भारतातील  तालुकास्तरावरील पहिलीच तरुणी होय. या अभूतपूर्व कामगिरीमुळे रश्मी शिंदे हिला जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी होणाऱ्या 'मिस इंटरनॅशनल' या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. 'मिस इंटरनॅशनल'  ही जगातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित अशी सौंदर्य स्पर्धा असून तिचे मुख्यालय टोकियो या ठिकाणी आहे. सौंदर्य व विलक्षण बुद्धिमत्तेच्या  धनी असलेल्या कु.रश्मी शिंदे हिच्या प्रतिनिधित्वामुळे प्रथमच या स्पर्धेच्या इतिहासात विजेतेपदाला गवसणी घालण्याची सुवर्णसंधी भारताला प्राप्त झाली आहे. 

रश्मी शिंदे हीचा मिस इंटरनॅशनल इंडियाच्या विजेतेपदापर्यंतचा हा प्रवास अथांग कर्तुत्वाचा ,अथक मेहनतीचा आणि स्वतःवरील दृढ विश्वासाचा राहिला आहे .श्रीरामपूर सारख्या नीमशहरी भागातून येऊन जागतिक सौंदर्य स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घालण्याचा पराक्रम हा केवळ अविश्वसनीय आणि थक्क करून सोडणारा आहे. यापूर्वीही रश्मी हीने देशांतर्गत विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये  आपल्या कर्तुत्वाची अविट अशी छाप सोडली आहे. मग ते 'इंडियाज मिस टिजीपीसी' सारख्या सौंदर्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणे असो किंवा व्हीजेटीआय मुंबईच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयातील  'प्रतिबिंब' आणि ' वस्त्र ' सारख्या लोकप्रिय फॅशन शोमध्ये सर्वांची वाहवा मिळवणे असो.  रश्मी  हे नाव मॉडलिंगच्या दुनियेत गेल्या चार ते पाच वर्षापासून सतत चर्चेत राहिले आहे. 
रश्मी  हीचा शैक्षणिक प्रवास देखील अतिशय उल्लेखनीय राहिला असून तिने  आपले प्राथमिक शिक्षण श्रीरामपूर येथील सेंट झेवियर्स या  शाळेतून तर माध्यमिक शिक्षण  पुण्यातील नामांकित अशा बिशप स्कूलमधून पूर्ण केले आहे. शिक्षण चालू असतानाच साहित्य ,संगीत, कला ,खेळ या विविध क्षेत्रातही तिचा  मुक्त वावर राहिला आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी स्व.ऍड रावसाहेब शिंदे यांच्या रूपात एक ज्ञान तपस्वीच  आजोबांच्या रूपात प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या संस्कारांचे ,ज्ञान लालसेचे ,समाजसेवेचे ,साहित्य तसेच वक्तृत्वाचे बाळकडू रश्मी हीस  बालवयातच संस्कार रूपाने मिळाले. त्यातूनच तिच्या व्यक्तिमत्त्वाचा बहुआयामी विकास होत राहिला. परिणामी  रश्मी आज आघाडीची राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू तसेच राष्ट्रीय स्केटर  खेळाडू म्हणूनही ओळखली जाते. एक परिपूर्ण अथलेटीक  म्हणूनही तिच्याकडे  आज पाहिले जात असून  विविध मॅरेथॉन   स्पर्धांमध्ये भाग घेऊन चमकदार कामगिरी करत तिने आपल्या शारीरिक क्षमतेची आणि कणखरपणाची चुणूक वारंवार दाखवून दिली आहे. 
 एवढेच नव्हे तर कथ्थक सारख्या शास्त्रीय नृत्याचे विधिवत प्रशिक्षण घेऊन तिने त्यात ही नैपुण्य प्राप्त केले आहे. रश्मी  हीचे मराठी ,हिंदी ,इंग्रजी या तीनही भाषा वरती कमालीचे प्रभुत्व असून त्यातून अमोघ वक्तृत्वाचे कौशल्य  तिने प्राप्त केले आहे . अशा विविध अंगाने  रश्मी हीचे व्यक्तिमत्व विकसित होत असतानाच शैक्षणिक क्षेत्रातही तिने धवल यश मिळवले आहे. व्हीजेटीआय मुंबई सारख्या नामांकित महाविद्यालयातून तिने   बी टेकची पदवी अतिशय उत्तम गुण मिळवून प्राप्त केली आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रात उत्तम करिअरची संधी  समोर उभी असताना  कॉर्पोरेट की मॉडेलिंग तसेच सौंदर्य स्पर्धचे  क्षेत्र असा यक्ष प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला असता अंत:प्रेरणेने व ठाम आत्मविश्वासाने रश्मी  हीने मॉडेलिंग क्षेत्राची निवड केली . अतिशय आव्हानात्मक क्षेत्र असताना देखील तिने घेतलेला हा निर्णय हा तिचा स्वतःवरील प्रचंड विश्वासाचा आणि धाडसीपणाचे द्योतक आहे. हा करियर संदर्भातील अतिशय कठीण निर्णय घेत असताना रश्मी  हीस  आई-वडिलांचा भरभक्कम पाठिंबा मिळाला. डॉ. प्रेरणा आणि डॉ.राजीव शिंदे यांनी पालक म्हणून कधीही आपल्या इच्छा, अपेक्षा आपल्या मुलांवर लादल्या नाहीत. मुलांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडण्याची मोकळीक त्यांनी  नेहमीच दिली. त्यातूनच रश्मी आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेवू शकली. 
डॉ. प्रेरणा शिंदे या श्रीरामपूर मधील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आहेत. पूर्णवेळ कार्यमग्न  असूनही आई म्हणून त्या  रश्मी  हिच्या पाठीशी  नेहमीच उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येक प्रसंगी रश्मी शिंदे हीस मानसिक, भावनिक पाठिंबा देण्याचे, तिचे  मनोधैर्य   उंचावण्याचे काम डॉ.प्रेरणा यांनी नेहमीच केले आहे. त्यामुळे रश्मीच्या  यशात डॉ.प्रेरणा यांचा शब्दश:  सिंहाचा वाटा आहे असे म्हटले तरी वावगे  ठरणार नाही.
रश्मीने मॉडलिंग सारख्या अतिशय आव्हानात्मक क्षेत्रात कार्य करीत असूनही त्याच वेळेस  विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल या श्रीरामपुरातील अग्रगण्य शैक्षणिक संकुलाच्या व्यवस्थापक  पदाची जबाबदारी ही आपल्या खांद्यावर घेतली आहे. तिच्या  प्रशासकीय कौशल्यामुळेच विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल आज संपूर्ण नगर जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संकुल म्हणून नावारूपाला आले आहे . आज या संकुलात दोन हजारपेक्षा (२०००) जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून मोठ्या वेगाने संस्थेचा विकास होत आहे. सामाजिक बांधिलकीच्या उदार जाणिवेतून महिला सक्षमीकरणासाठी कार्य करीत असलेल्या प्रेरणा फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या सचिव म्हणूनही रश्मी  काम पाहत आहे.  तिच्याच मार्गदर्शनाखाली प्रेरणा फाउंडेशन विविध समाज उपयोगी उपक्रम सातत्याने श्रीरामपूर या ठिकाणी राबवत आहे. त्यात गरीब मुलींच्या  इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून  शिक्षणाची जबाबदारी , पौगंडावस्थेतील मुलींच्या समस्ये संदर्भातील सेमिनार, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना मोफत कपडे वाटप, कोरोना काळात गरिबांना शिधा वाटप तसेच मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीत भरीव आर्थिक  मदत करण्यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. 

रश्मी हीने  अतिशय कमी वयात जीवनाच्या विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे . 'मिस इंटरनॅशनल इंडिया ' या विजेते पदाला तिने घातलेली गवसणी ही तिच्या सौंदर्य, कुशाग्र बुद्धिमत्ता तसेच बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचाच पुरावा आहे. जगात ज्या आघाडीच्या सौंदर्य स्पर्धा गणल्या जातात त्यात मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड, मिस अर्थ आणि मिस इंटरनॅशनल या चार स्पर्धांचा समावेश होतो. या चार पैकी मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धा वगळता तीनही स्पर्धांवर भारतीय तरुणींनी विजयाची मोहर उमटवलेली आहे. तेव्हा जपानची राजधानी टोकियो येथे होणाऱ्या  ' मिस इंटरनॅशनल' या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजेतेपदाचा लखलखणारा हिरेजडीत मुकुट रश्मी शिंदे जेव्हा  आपल्या मस्तकावर धारण करेल तेव्हा  वर्षानुवर्षीचे कोट्यवधी भारत वासियांचे अधूरे राहीलेले  स्वप्न साकार होईल. याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. रश्मी हीस या स्पर्धेसाठी आणि विजेतेपदासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.


ह्या विजेते पदाच्या पार्श्वभूमीवर रश्मी हीचा भव्य स्वागत आणि नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन  श्रीरामपूरकर वासीयांच्या वतीने शुक्रवार दि. ०६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजता महादेव मळा याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तरी ह्या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
शंकरराव बाहुले (सर) श्रीरामपूर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close