शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राजकीय बातमी
शिर्डी लोकसभा मतदार संघातील अकोले तालुक्यात मार्क्सवादी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात नुकतीच आभार सभा संपन्न झाली. यावेळी खा.वाकचौरे आपल्या अध्यक्षीय भाषणात उत्तर देताना बोलत होते. मतदार संघाचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी नियोजित आराखडयावर निर्णायक काम तातडीने सुरु करू असे आश्वासन दिले. आज पक्षाच्या कार्यालयात खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली हा विकास आराखडा बनविण्यात आला.
अकोले विधानसभा मतदार संघाच्या खऱ्याखुऱ्या विकासाचा दृष्टीकोन असलेला सात कलमी विकास प्रस्ताव आज माकपच्या वतीने खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. माकपच्या अकोले येथील पक्ष कार्यालयात विकास चिंतन सभेत विविध अंगांनी चर्चा करून हा प्रस्ताव बनविण्यात आला. शिर्डी लोकसभेसह अकोले व संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या दृष्टीने आवश्यक निवडक मागण्या विचार मंथनातून निश्चित करत हा प्रस्ताव बनविण्यात आला. लोकसभा निवडणुकीत माकपने खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना पाठींबा दिला होता. निवडून आल्यानंतर खा.वाकचौरे यांनी न विसरता माकपने मोठ्या ताकतीने मला निवडून आणण्यासाठी मदत केली होती, त्याची विकासकामातून परतफेड करणार असल्याची ग्वाही दिली.
माकपच्या वतीने यावेळी, शिर्डी-अकोले-शहापूर रेल्वेमार्ग अस्तित्वात यावा. एन.डी.डी.बी. अंतर्गत अकोले येथे आधुनिक सरकारी किंवा सहकारी दुग्ध प्रक्रिया प्रकल्प सुरु करावा. आदिवासी भागात केंद्र सरकारच्या विकास योजनेचा भाग म्हणून सरकारी हिरडा प्रक्रिया प्रकल्प सुरु करावा. राजूर येथे जिल्हा रुग्णालय समकक्ष सरकारी हॉस्पिटल उभारावे. तोलार खिंड (गाढवा डोंगर) टनेल करून तालुक्याला माळशेजमार्गे मुंबई जवळ करावी. मुळा, प्रवरा, आढळा खोऱ्याचे पाण्याचे पुनर्वाटप होऊन आदिवासी भागासह अकोले विधानसभा मतदार संघाला पाण्याचा रास्त वाटा मिळावा, डोंगरांवरून इतर जिल्ह्यांमध्ये वाहून जाणारे पाणी मतदार संघातील संपूर्ण भूभाग सिंचनासाठी वळवावे. अकोले तालुक्यात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होईपर्यंत मजुरांची परवड थांबावी यासाठी आळेफाटा येथे मोफत मुक्काम व अल्प दरात भोजन व्यवस्थेसह ‘सरकारी मजूर निवारा केंद्र’ उभारावे या सात मुद्यांच्या आधारे हा प्रस्ताव तयार करून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
प्रस्तावातील मागण्या जनतेच्या खऱ्याखुऱ्या विकासाची नांदी असून यावर अत्यंत प्राधान्याने काम सुरु करू असे आश्वासन यावेळी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले. आशावर्कर, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार या ग्रामीण श्रमिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना देण्यात आले.
वन जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची पिक पाहणी त्यांच्या नावावर लागावी यासाठी पिक पाहणीचे अर्ज पक्ष व किसान सभेच्या वतीने भरून घेण्यात आले. अकोले विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
व्यासपीठावर माकपचे नेते डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभिरे, तुळशीराम कातोरे, ताराचंद विघे, संगीता साळवे, हेमलता शेळके, शिवराम लहामटे यांच्यासह ग्राहक कक्षाचे प्रांतीक सदस्य मुकुंद सिनगर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश नवले, म्हाळादेवीचे अध्यक्ष प्रदीप हासे, मिलिंद नाईकवाडी, अमोल बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.