shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भोकर - खोकर परीसरात दमदार पावसाची हजेरी, खरीपाच्या पिकांची नासाडी ?


खंडीत विज पुरवठ्यामुळे उकाड्याने नागरीक त्रस्त, सोयीबीन, कपाशी व काद्यांच्या रोपांचे नुकसान

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीामपूर तालुक्यातील भोकर व खोकर परीसरात आज,काल व परवा सलग दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने पाणी पातळीत वाढ होणार असल्याने रब्बीच्या पिकांच्या दृष्टीने फायदेशीर असलेला पाऊस आज मात्र खरीपांच्या पिकांसाठी नुकसानकारक ठरल्याचे चित्र स्पष्ट झाल्याने शेतकर्‍यांमध्ये कही खुशी कही गम अशी अवस्था झाल्याचे दिसत आहे. पण सध्या तरी शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भिती निर्माण झालेली आहे. त्याच बरोबर या पावसासोबत गेल्या दोन दिवसांपासून परीसरातील खंडीत विज पुरवठ्यामुळे उकाड्याने नागरीक त्रस्त झाल्याने महावितरणच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

यावर्षी तसा सुरूवातीपासून पावसाने चांगली सुरूवात केल्याने सर्वत्र शेतकर्‍यांत समाधान व बळीराजाच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. त्यात ओढे नाले भरून वाहु लागल्याने व परीसरातील बंधारेही तुडूंब झाल्याने परीसरातील घास, मका, कपाशी, सोयाबीनसह खरीपाच्या पिकांवरील तेजाप्रमाणे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरचे तेज चमकत होते. त्यात सध्याच्या कडक उन्हाने सोयाबीन काढणीचा शुभारंभ झाला, घाटमाथ्यावरच्या जमीनीतील सोयाबीन काढणी सुरू झाली, अंदाजे १० टक्क्याच्या दरम्यान सोयाबीनची काढणी झाली उर्वरीत सोयाबीन अद्याप शेतातच आहे. त्यात काही ठिकाणी नुकतीच शेतकर्‍यांची काढणी केलेली सोयाबीन या दमदार पावसाने शेतातच पाण्यात पोहत असल्याने त्यांना मोड येणार यात शंका नाही. तर दुसरीकडे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनची ही तशीच अवस्था आहे, येथे ही पावसाची अशीच झड लागुन राहीली तर उभ्या पिकाच्या शेंगातून मोड बाहेर येणार आहेत.
त्या बरोबर एकीकडे सोयाबीनची काढणी सुरू झाली अन् लगेच बाजार पेठेत तेलाचे भाव वधारले असले तरी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस व शेतकर्‍यांची रब्बीच्या पिकांची सुरू झालेल्या तयारीमुळे मुळातच अडचणी असलेल्या शेतकर्‍यांना व्यापार्‍यांकडून कोंडीत पकडत हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी सुरू झाल्याचे दिसत आहे. म्हणजे गेल्या आठवड्यातले सोयाबीनचे चार हजार सहाशेच्या वरचे भाव आता चार हजारावर आल्याने येथे शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याने शासनाने तातडीने हमी भावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले तरच परीसरातील बळीराजा जगू शकतो. तर दुसरीकडे सरकारने आत्ता सध्या कांदा खरेदीचे दर वाढविले असले तरी बैल गेला अन् झोपा केल्या अशी अवस्था झाल्याचे दिसत आहे. अशी अवस्था सध्याची कांद्याची आहे कारण जेथे शेतकर्‍यांकडे घरी खायला कांदा राहीला नाही तेथे त्या दर वाढीचा या शेतकर्‍यांना काहीच फायदा होणार नाही.
गेल्या दोन दिवसांपूसन सुरू असलेला पावसाने जमीनीतील पाणी पातळीत वाढ होवून रब्बीच्या पिकांना फायदा होणार असला तरी आज खरीपाची उभी पिके मात्र पाण्यात पोहत आहेत. सध्या घास, मका, ऊस, कपाशी, सोयाबीन आदि पिके अडचणीत असतानाच पुढच्या तयारीला लागलेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी हा पाऊस नुकसानीचा आहे. कारण काही शेतकर्‍यांनी कांद्याचे रोपं टाकलीत त्यांचे ही या पावसाने मोठं नुकसान होणार आहे. तसेच कपाशीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळू लागले आहे. कपाशीला काहीशा प्रमाणात आलेल्या बोंडांची उकल होण्यापुर्वीच जास्त पावसाने आता हि बोंडगळ सुरू झाली तर शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. एंकदरीत या पावसाने शेतकर्‍यांत ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था दिसत असली तरी खरीपाच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना आधार देण्याची गरज आहे. कारण गेल्या वर्षीच्या विम्याचे पैसे अद्याप पर्यंत शेतकर्‍यांच्या पदरात पडलेले नसल्याने बळीराजा सध्या मोठ्या अडचणीत आहे.
तर या पावसाचे निमीत्त करून आक्टोबर हिट म्हणजेच उन्हाळ्यापेक्षा कडक उन्हात थोडासा वारा किंवा पाऊस सुरू झाला की भोकर सबस्टेशन मधून तर कधी तांत्रीक बिघाडामुळे  अनेकदा विज पुरवठा खंडीत होत आहे. याबाबत संबधीतांशी संपर्क साधला असता जून्या नव्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या वादात काही कामगार कर्मचारी केवळ संबधीतांचे हितसंबध न जपल्याने घरी बसलेले आहे तर काहींची येथे बदलून आलेल्या बदली कर्मचार्‍याला स्थानीक सहकारी मदत करत नसल्याने बिघाड काढणे मुश्कील होत असतानाच या परीसरातील विज वाहक तारांजवळील अपेक्षीत वृक्षतोड न झाल्याने अनेकदा बिघाड होत आहे, त्यामुळे परीसरातील नागरीकांना नाहक उकाड्याला सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने तातडीने येथे कुशल कर्मचार्‍यांची नेमणूक करून नागरीकांची या उकाड्यातून सुटका करण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे,अन्यथा नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close