प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १२/ मराठा संघर्ष योद्धा मा. श्री. मनोज जरांगे-पाटील यांनी दिनांक १०/०९/२०२४ रोजी माढा, करमाळा, भूम-परंडा व बार्शी तालुक्यातून मराठा समन्वयकांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये प्रत्येक गावातील कमीत कमी २० मराठा सेवक (हक्काचा माणूस) यांची नाव नोंदणी करण्याबाबत चर्चा झाली असून, असे मराठा सेवक गावागावातून तयार करायचे आहेत, की जे मराठा समाजाच्या विविध अडचणी जसे की मराठा समाजाच्या नोंदी, जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी करण्यास मदत करणे, शेती, शिक्षण, वैद्यकीय अडचणी बाबत मदत करणे, तसेच सामाजिक अडचणी व इतर समस्या सोडण्यासाठी काम करतील.
सदर बैठकीसाठी करमाळा तालुक्यातून दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर तसेच स्वाभिमानीचे श्री. गणेश मंगवडे, प्रशांत नाईकनवरे तसेच प्रा. संजय जगताप सर हे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मा. श्री मनोज जरांगे-पाटील यांच्या बैठकीस हजर होते. प्रा. झोळ सर यांनी लगेच तातडीने मराठा बांधवांची बैठक घेऊन, करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात फिरून मराठा सेवकांसाठी अर्ज भरून आजपासून नाव नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. तरी इच्छुक मराठा बांधवांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे.