श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आल्याची माहिती मराठी भाषा राज्य महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा. सुनील डिसले यांनी दिली.
राज्यातील मराठी भाषा राज्य महासंघाची राज्यकार्यकारिणी व जिल्हाध्यक्षांची आभासी सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये शालेय शिक्षण विभागाने १३ सप्टेंबर २०२४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा, महाविद्यालयात इयत्ता बारावी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे.
राज्य शासनाने १ एप्रिल २०२४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंत राज्यातील सर्व खाजगी व सरकारी शाळा, महाविद्यालयांना मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत आणि तिची अंमलबजावणी करण्याबाबत अध्यादेश जारी केला होता. शासनाने टप्प्याटप्प्याने २०२२-२३ साली आठवीच्या बॅचपासून सुरू केलेल्या सक्तीची मराठी भाषेचा टप्पा आता २०२४-२५ ला दहावीपर्यंत पूर्ण झालेला आहे. या टप्प्यानुसार इयत्ता अकरावीसाठी २०२५-२६ पासून मराठी भाषा आता सक्तीची होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज मराठी भाषा राज्य महासंघाची तातडीची आभासी सभा राज्याध्यक्ष सुनील डिसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मराठी भाषेच्या संदर्भात शासनाने सकारात्मक पाऊल उचलल्याबद्दल राज्यातील सर्व मराठी विषय शिक्षकांनी या शासन निर्णयाचे स्वागत केले आहे. सभेत सर्व मराठी विषय शिक्षकांनी राज्य शासनाचे आभार मानत अभिनंदनाचा ठराव संमत केला आहे.
या आभासी सभेला अध्यक्ष प्रा. सुनील डिसले (बारामती), कार्याध्यक्ष डाॅ. मनीषा रिठे (वर्धा), सचिव बाळासाहेब माने (मुंबई), उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार (चंद्रपूर), कोषाध्यक्ष दिलीप जाधव (सांगली), सल्लागार डॉ विजय हेलवटे (चंद्रपूर), अहमदनगर जिल्हाध्यक्ष डॉ. शरद दुधाट तसेच समस्त राज्य कार्यकारिणी चे पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. या आभासी सभेचे प्रास्ताविक प्रा. बाळासाहेब माने यांनी केले. या आभासी सभेचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष प्रा. संजय लेनगुरे (भंडारा) यांनी केले तर आभार प्रा. मिनल पाटील (नंदुरबार) यांनी केले. सभेला ३५ जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी व समस्त राज्य कार्यकारिणीचे १६ पदाधिकारी उपस्थित होते.
वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११