shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अंबानींमुळे 'लालबागचा राजा मंडळा'वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: 'लालबागचा राजा नवसाला पावतो', अशी लाखो भाविकांची दिशाभूल करणारी जाहिरात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रसारमाध्यमांद्वारे केलेली आहे. त्यातून हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार मंडळाचे मानद सचिव व त्यांच्या मर्जीतील कार्यकारिणी सदस्य सन २००५ पासून करीत आहेत. या कथित भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी मंडळाची कार्यकारणी बरखास्त करावी व मंडळावर चक्क प्रशासक नेमावा, अशी मागणीही असंख्य सामाजिक कार्यकर्ते व भाविक यांनी संबंधित सरकारी यंत्रणांकडे वारंवार केलेली होती, मात्र सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांचे मंडळातील पदाधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत व त्यामुळेच अद्याप कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अनंत अंबानी यांच्या मंडळातील आगमनामुळे या भ्रष्टाचारावर ब्रेक लागणे तर सोडाच, पण तो आणखी वाढीस लागण्याची शक्यता, असंख्य भाविकांनी 'स्प्राऊट्स'च्या टीमशी बोलतांना व्यक्त केलेली आहे.

मंडळाने यावर्षी अनंत अंबानी (Anant Mukesh Ambani) यांची मंडळाच्या विश्वस्तपदी नियुक्ती केलेली आहे. अनंत अंबानी हे वादग्रस्त व महाभ्रष्ट उद्योगपती मुकेश धीरूभाई अंबानी यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. ते आता मंडळाचे आश्रयदाते बनलेले आहेत.  त्यांना प्रसिद्धीच्या झोतामध्ये रहायचे प्रचंड वेड आहे. त्यांच्या नुकत्याच झालेल्या लग्नसोहळ्यामुळे ते अधिकच लाइमलाईटमध्ये आले. त्यासाठी त्यांनी ५ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा चुराडा केला. अर्थात ही रक्कम त्यांनी त्यांच्या 'रिलायन्स'सारख्या उद्योगामधून वसूलही केली. आवळा देवून कोहळा काढण्यात अंबानी फॅमिलीचा हातखंडा आहे.

अंबानी परिवार हा पहिल्यापासूनच नियमबाह्य पद्धतीने व्यापार करण्यात कुप्रसिद्ध आहेत. नियम धाब्यावर बसवून व्यापार करण्याचे बाळकडूच त्यांना धीरूभाईं अंबानींपासून मिळालेले आहे. त्यांचा हा दळभद्री वारसा त्याचे दोन्ही चिरंजीव (मुकेश व अनिल ) हे पुढे नेटाने चालवत आहेत. त्यांच्या कुटुंबियांचे वर्णन हे corrupt, unethical and crony capitalist family असेही करता येईल.

अनंत यांच्या या अपवित्र एन्ट्रीने त्यांचे image building होत आहे, मात्र त्यामुळे मंडळातील भ्रष्टाचार आणखी बोकाळणार आहे. काही दिवसांनी या मंडळाचा उल्लेख हा 'अंबानींचा गणपती', 'अंबानींचे मंडळ' किंवा 'अंबानींचा राजा' असाही केला जाण्याची शक्यता आहे.

अंबानी यांचे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांशी आर्थिक व कौटुंबिक संबंध आहेत. याशिवाय कॉर्पोरेट व सरकारी यंत्रणाही त्यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून वश केलेली आहे. त्याचा फायदा मंडळातील पदाधिकाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे विशेषतः साळवी व इतर पदाधिकाऱ्यांच्या हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांवर पांघरूण घातले जाण्याची शक्यता आहे.

*उद्योगपती अंबानींकडून मनी लॉन्ड्रिंगचीही शक्यता

महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या भावना या 'लालबागच्या राजा'शी निगडित आहेत. हे भाविक मोठया श्रद्धेने सोने, चांदी किंवा रोख रक्कम ही दानस्वरूपात दानपेटीत टाकतात. ही रक्कम किंवा दागदागिने आणखी मिळावीत, यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियात यासंबंधीच्या बातम्याही वारंवार दाखवल्या किंवा वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केल्या जातात, त्यासाठी मंडळ हे मीडियाशी 'अर्थ'पूर्ण संबंध जोपासतात.

महत्त्वाची बाब म्हणजे दानपेटीत टाकलेल्या दागदागिने किंवा रोख रक्कम यांची कुठेही कागदोपत्री नोंद होत नाही. त्यामुळे मनी लॉन्ड्रिंगची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः वादग्रस्त व महाभ्रष्ट अंबानी कुटुंबियांकडून हा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे, अशी भीतीही असंख्य भाविकांनी 'स्प्राऊट्स'शी बोलतांना नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.

*१९ वर्षांपासून साळवीच मानद सचिव का?

'स्प्राऊट्स'ला प्रमाणित पत्रांतून इत्यंभूत माहिती मिळालेली आहे. त्यानुसार सन १९५८ साली 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबाग' या नावाने मंडळ स्थापन झाले. या मंडळात सन २००५ पासून सुधीर साळवी हे मानद सचिव व त्याच्या मर्जीतील इतर ३४ कार्यकारणी सदस्य (३ ते ४ जण अपवाद वगळता) सलग १९ वर्षे कायम आहेत.

या कार्यकारिणीने सन २००७ साली मंडळाचे नाव 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' असे बदलून घेतले. त्यानंतर 'नवसाला पावणारा लालबागचा राजा' अशी चक्क खोटी जाहिरात केली. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात आला. ' लालबागचा राजा नवसाला पावतो' अशी जेवढी अधिक प्रसिद्धी तेवढा गल्ला अधिक' असे साधे मार्केटिंगचे सूत्र वापरण्यात आले व ते गणित यशस्वीही झाले. त्यातूनच साळवी व त्याच्या कार्यकारणीतील सदस्यांनी लाखो श्रद्धाळू भाविकांची लूट केली.

मर्जीतल्या कार्यकारी सभासदांमुळे भ्रष्टाचारास मिळाले अधिक बळ

सन २००५ साली साळवी (Sudhir Salvi) मंडळाचे मानद सचिव झाले. (त्याआधी ते ८ ते ९  वर्षे अध्यक्ष होते ) त्यावेळी त्यांनी त्यांच्या मर्जीतील ३४ सहकारी सभासदांना कार्यकारणीमध्ये घेतले. यातील ३ ते ४ जणांची साळवी यांनी हकालपट्टी केली तर काहींचा आवाज दाबण्यात आला. त्या जागी साळवी यांच्या मर्जीतील सहकारी सभासदांना घेण्यात आले. हेच ३४ कार्यकारणीतले सदस्य आज तब्बल  १९ ते २० वर्षे मंडळावर कायम असून भाविकांची अक्षरशः लूट करीत आहेत. त्यांच्या अनिर्बंध हुकूमशाहीमुळे भाविकच नव्हे तर चक्क 'ऑन ड्युटी' असणाऱ्या वरिष्ठ पोलीसांनाही केली जाणारी मारहाण, महिला भाविकांचा विनयभंग नित्याचेच होऊन बसले आहे.
भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या

मंडळातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी रान उठविणाऱ्या व मंडळातील गैरप्रकार चव्हाट्यावर आणणाऱ्या समाजसेवक तर काही प्रामाणिक पत्रकारांवर दबाव आणण्यात आले. काही सामाजिक कार्यकर्त्यांना तर 'तुमचा दाभोकर, पानसरे करू' (जीवे मारण्याच्या) अशा धमक्या देण्यात आल्या. (याविषयी वारंवार पोलीस स्थानकात तक्रारीही करण्यात आल्या, पोलिसांनी जबाबही नोंदवून घेतले, मात्र त्यानंतर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.)

भाविकांच्याच पैशांतून न्यायालयात दावे दाखल

'स्प्राऊट्स' (Sprouts) या मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक उन्मेष गुजराथी (Unmesh Gujarathi ), सामाजिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात धर्मादाय आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सक्तवसुली संचनालय (ED)  यांसारख्या सरकारी यंत्रणांकडे असंख्य तक्रारी केल्या. सरकारला जाब विचारला, त्यामुळे संतप्त झालेल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरच केसेस दाखल केल्या. या दोन केसेस अनेक वर्षांपासून शिवडी न्यायालय व मुंबई न्यायालयात चालू आहेत. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे दावे टाकण्यात आलेले आहेत. त्यासाठी नामवंत वकिलांची फौज उभी करण्यात आलेली आहे.

केसेस दाखल, मात्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी नाही

या वकिलांची गलेलठ्ठ फीज व कोर्ट स्टॅम्प फी ही सर्व भाविकांच्या पैशातून घेण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या न्यायालयांत केसेस दाखल करण्यासाठी त्यांनी नियमानुसार धर्मदाय आयुक्तांची (Charity Commissioner ) परवानगी घेणे बंधनकारक आहे, मात्र ती परवानगीही त्यांनी घेतलेली नाही, अशी माहितीही 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (SIT ) माहितीच्या अधिकारातून (RTI) मिळालेल्या कागदपत्रांतून मिळालेली आहे.

मंडळातील कोट्यवधींचा भ्रष्टाचाराला आजूबाजूच्या गणेशोत्सव मंडळातील कोणीही आवाज उठवू नये, यासाठी त्यांना लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या जातात. प्रत्यक्षात अशा पद्धतीने आजूबाजूच्या मंडळावर भाविकांनी  दिलेले पैसे उधळणे, हा त्यांचा विश्वासघात आहे. शिवाय अशा हेतूने देणग्या देण्याची तरतूद मंडळाच्या घटनेमध्ये केलेली नाही, म्हणजे ही घटनेतील नियमांची पायमल्ली होय, त्याची त्वरित चौकशी करण्यात यावी व प्रत्येक जमा -खर्चाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणीही 'स्प्राऊट्स'ने केलेली आहे.

मानद सचिव सुधीर साळवी, माजी अध्यक्ष अशोक पवार व मंडळातील कित्येक कार्यकारणीवरील सदस्य नोकरी किंवा धंदा करीत नाहीत. मग यांच्याकडे असणारे फ्लॅट्स, बँक बॅलन्स, आलिशान गाड्या, मालमत्ता, सोने-नाणे, रोकड आली कुठून, असा सवाल करीत त्याची चौकशी करण्याची मागणीही 'स्प्राऊट्स'च्या वतीने करण्यात आलेली आहे.

नवस व व्हीआयपी रांग कशासाठी?

नवसाची व व्हीआयपी रांग हे मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे रोख पैसे कमवण्याचे साधन आहे, असा आरोपही असंख्य भाविकांनी 'स्प्राऊट्स'शी बोलतांना केला आहे. या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले जातात. मंडळाची स्थापना 1958 साली झाली. तेव्हा 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबाग' हे नाव होते.  मात्र अचानक साळवी व त्यांच्या मर्जीतील कार्यकारिणीने २००७ साली हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार  'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' हे नवे नामकरण करण्यात आले व त्यानंतर प्रसारमाध्यमांना 'पेड न्यूज' देवून 'नवसाला पावणारा लालबागचा राजा' असे भाविकांमध्ये पसरविण्यात आले. त्यासाठी भाविकांच्या खोट्या मुलाखतीही चॅनेल्सवर दाखविण्यात आल्या. त्यासाठी चित्रपटांतील नट - नटयांना 'मॅनेज' करण्यात आले, असा आरोपही भाविकांनी 'स्प्राऊट्स'शी बोलताना केला आहे. वास्तविक अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार साळवी व मंडळाच्या इतर पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी होती, मात्र सरकारी यंत्रणा 'मॅनेज' केल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नवसाची रांग बनली चरण दर्शनाची रांग

१९५८ ते २००७ या कालावधीत नवसाच्या रांगेचा उल्लेख मंडळाच्या कुठल्याही कागदपत्रांत आढळत नाही, मग ही बाब अचानक पुढे कशी आली, असा सवालही त्यांनी विचारला. वेंगुर्लेकर यांनी नवसाची रांग बंद करण्यात यावी, अशी धर्मदाय आयुक्तांकडे लेखी तक्रार केल्यानंतर घाबरून मंडळाने या रांगेचा 'चरण दर्शनाची रांग' असा उल्लेख करायला सुरुवात केली.

मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते 'ऑन ड्युटी' असणाऱ्या पोलीस शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळप्रसंगी मारहाण करतात, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात, त्याचे सीसीटीव्ही फुटेजही चॅनेल्सवर दाखवले जाते, एवढा भरभक्कम पुरावा असतानाही आरोपी पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही, याउलट मारहाण झालेल्या ठिकाणीच त्या पोलिसांना परत ड्युटीवर उभे राहण्याचे आदेश दिले जातात. यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होत आहे.

एका ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कार्यकर्त्यांकडून २०१८ साली बेदम  मारहाण  करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवसाची रांग त्वरित बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले, मात्र त्याची अद्याप अमलबजावणी झाली नाही. वास्तविक नवस व व्हीआयपी या दोन्ही रांगा बंद करून भाविकांसाठी एकच रांग करण्यात यावी, ही विनंती सरकार व धर्मदाय आयुक्त यांना वारंवार करण्यात आली. मात्र त्याची अदयाप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

मंडळाचे माजी उपाध्यक्ष रोहिदास जाधव यांनीही मंडळातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धर्मदाय आयुक्तांना जाहिरात, पेटीचोरी ते रुग्णसहाय्यनिधीपर्यंत होणाऱ्या भ्रष्टाचाराची इत्यंभूत माहिती २२ नोव्हेंबर २०१७ रोजी अफेडिव्हिटवर लिहून दिली, मात्र या तक्रारीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

फंडे मार्केटिंगचे

कधी 'राजा'चे 'मुखदर्शन', पाद्यपूजन, 'हस्त पूजन', चोपडा (वर्गणी पुस्तक) पूजन, 'टी शर्ट' रुपी प्रसाद तर कधी 'पहिले दर्शन' असे विविध मार्केटिंगचे फंडे वापरले जातात. यातून भाविक भावुकपणे कोट्यवधी रुपयांचे दान करतात. विशेष म्हणजे हे सर्व करताना कुठेही धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेतली जात नाही. यासंबधी वारंवार तक्रारी करूनही धर्मदाय आयुक्त व सरकार मंडळावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई करीत नाही.

पाद्यपूजनाला शास्त्रात आधार नाही!

वास्तविक पादुकापूजनाला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे, त्याला शास्त्रात आधार आहे. मात्र पाद्यपूजनाला कोणताही आधार नाही. हिंदू धर्मात मूर्तीच्या कुठल्याही खंडित भागाचे दर्शन घेतले जात नाही. किंबहुना मूर्तीचा कुठलाही भाग खंडित झाल्यावर शास्त्रानुसार अशी मूर्ती त्वरित विसर्जित केली जाते. मात्र  इथे मार्केटिंगसाठी धर्मशास्त्रातले नियमही तोडले जातात.

विशेष म्हणजे पाद्यपूजनासाठी बनविण्यात आलेले पाऊल हे शाडूच्या मातीपासून बनविण्यात येते. मात्र मूर्ती ही प्लास्टर ऑफ पॅरिसची बनविली जाते. म्हणजेच दर्शनासाठी मूर्ती घडविताना ज्या भाविकांनी पाद्य  पूजनास साष्टांग नमस्कार केला, त्या मातीचा एकही कण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीत वापरला जात नाही. त्यामळे या पाद्यपूजेत कोणतेही पावित्र्य नसून हे कृत्य म्हणजे भाविकांच्या भाबड्या भावनांशी खेळण्यासारखे आहे व ती एक विटंबना आहे. त्यामुळे या पाद्यपूजनावर बंदी आणण्याची मागणी यापूर्वीही काही भाविकांनी केलेली आहे, मात्र त्याचीही दखल घेण्यात आलेली नाही.

या विशेष बातमीवर प्रतिक्रिया घेण्यासाठी साळवी यांना संपर्क साधला असता, तो होवू शकला नाही.

*'स्प्राऊट्स'ला हवी आहे तुमची साथ

'स्प्राऊट्स'ची लालबागच्या राजावर पूर्वीपासूनच अपार श्रद्धा आहे, त्यामुळेच तेथील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी 'स्प्राऊट्स' व त्याच्या सहकाऱ्यांनी कंबर कसलेली आहे, तिला साथ देण्याची जबाबदारी सुजाण नागरिकांची आहे.

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

close