अजीजभाई शेख / राहाता
राहाता तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेतर्फे राहाता येथील नायब तहसीलदार एच.जी. पाटील यांना निवेदन देऊन शिक्षक दिन हा अन्याय दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नसल्यामुळे आणि वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यांवर कोणताही निर्णय होत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पूर्वीच दिलेल्या इशारा पत्रकानुसार यावर्षीच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बहिष्कार टाकून ५ सप्टेंबर शिक्षक दिन हा राज्यभर अन्याय दिवस म्हणून सरकारच्या निषेधार्थ राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले.
शिक्षकांच्या मागण्यांमधील १२९८ वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी सदर पदावर कार्यरत केवळ २८३ शिक्षकांचा समावेशनाचा आदेश शासनाने काढला आहे. अद्याप अनेक शिक्षकांचे समायोजन अजून झालेली नाही. अशा अनेक समस्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. आयटी शिक्षकांच्या समायोजनाचा शासन आदेश, अंशतः अनुदान प्राप्त शिक्षकांना वाढीव टप्पा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, शाळा संहितेनुसार वर्गातील विद्यार्थी संख्येचे निकष पाळणे इत्यादी मान्य मागण्यांबाबतचे आदेश निघालेले नाहीत. उर्वरित मागणीबाबत अधिवेशन संपताच चर्चा केली जाईल, असे शासनाने सांगितले होते; परंतु अद्यापही चर्चा केली नाही. महासंघातर्फे शासनाला अनेकवेळा भेटी देऊनही या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी ५ सप्टेंबर हा अन्याय दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले.
राहाता येथील तहसील कार्यालयात राहाता तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या वतीने राहाता तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. शरद दुधाट, सचिव प्रा. शाम जगताप यांच्यासह राहाता युनिट प्रतिनिधी प्रा. रणजित पाटील, प्रवरानगर युनिट प्रतिनिधी प्रा. जवाहरलाल पांडे, प्रा. ज्ञानदेव दवंगे, प्रा. शिवप्रसाद जंगम, प्रा. सागर निगुडे, प्रा. दीपक धोत्रे आदी शिक्षकांनी राहाता तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्या आणि शासनाने केलेल्या दुर्लक्षेच्या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, प्रवरानगर व शारदा कनिष्ठ महाविद्यालय, राहाता येथील शिक्षकांनी सहभाग घेऊन निवेदनावर आपल्या स्वाक्षऱ्या नोंदविल्या आहेत.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११