बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिली कसोटी चेन्नई आणि दुसरी कानपूर येथे होणार आहे. चेन्नई कसोटीसाठी बीसीसीआयने रविवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे २१ महिन्यांनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. योगायोगाने पंतने डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्धच शेवटची कसोटी खेळली होती. यानंतर पंतचा कार अपघात झाला आणि त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले. त्याने पंधरा महिन्यांनंतर म्हणजेच जून २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
केएल राहुलही क्रिकेटच्या मोठया फॉर्मेटमध्ये परतला आहे. त्याने या वर्षी जानेवारीत इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती, दुखापतीमुळे तो संपूर्ण इंग्लंड मालिका खेळू शकला नाही. वेगवान गोलंदाज यश दयालचे नशीब चमकले. त्याची प्रथमच निवड झाली आहे. २६ वर्षीय दयालने दुलीप ट्रॉफी २०२४ च्या पहिल्या सामन्यात भारत ब संघासाठी चार विकेट घेतल्या. त्याचबरोबर भारत अ संघाकडून नऊ विकेट घेणाऱ्या अष्टपैलू आकाशदीपवर निवडकर्त्यांनी विश्वास ठेवला आहे. फेब्रुवारीमध्ये त्याने कसोटी पदार्पण केले.
या वर्षाच्या सुरुवातीला मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळू न शकलेल्या विराट कोहलीचेही कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संघात परतण्यात अपयश आले. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी यापूर्वी सांगितले होते की, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज शमीने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत तेरा कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी अकरा भारताने जिंकले आहेत तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान आणि यष्टिरक्षक ध्रुव जुरेल हे देखील भारतीय संघात निवडले गेले आहेत. या दोघांनी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि नेत्रदिपक कामगिरी करून संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची फिरकी चौकडी कायम आहे. शक्तिशाली वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह प्रदीर्घ काळानंतर ॲक्शनमध्ये दिसणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये भारताने जिंकलेल्या टि२० विश्वचषकानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराज त्याला साथ देईल.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवडलेला भारतीय संघ असा असेल : - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल ( यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
बांगलादेशविरूध्द पहिल्या कसोटीसाठी भारताने प्रबळ संघ निवडून, बांगलादेशने पाकिस्तानमध्ये केलेल्या चमत्कारीक कामगिरीला रोखण्याचा पुरा बंदोबस्त केला आहे. या उभयतातील मालिका वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिपचाच हिस्सा असल्याने या मालिकेलाही विशेष महत्व आहे. भारत या चक्रातही गुणतालिकेत अद्याप पहिल्याच क्रमांकावर विराजमान असून सलग तिसऱ्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याच्या मार्गावर आहे. मायदेशात भारताचा गड अभेद्य असल्याने बांगलादेशविरूध्द विजय ग्राह्य समजला जातो. मात्र बांगलादेशला हलक्यात घेण्याची चुक भारताने करू नये. कारण बांगलादेशकडेही दर्जेदार फिरकीपटू, धारदार वेगवान गोलंदाज व फॉर्मात असलेले फलंदाज आहेत. या बांगलादेशी संघाने मागच्याच आठवड्यात पाकिस्तानला पाकिस्तानात हरविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली असल्याने भारताला भारतात हरविण्याचे त्यांचे मनसुबे असले तर ते गैर नाही.
भारताला आपला लौकिक जपायचा असेल तर बांगलादेश सोबत जराही हाराकिरी करून चालणार नाही. रोहित शर्मा आणि कंपनी आपल्या कर्तव्यात कुठलाही हलगर्जीपणा करणार नाहीत. अशी आशा करून एका चांगल्या झुंजीची ठेऊ या. o
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२