आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने सर्व संघांची डब्ल्यूटीसीची अंतिम समिकरणे जाहीर केली आहेत. यामध्ये भारताची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला शेवटच्या दोन चक्रांच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यश आलं होतं, पण विजेतेपद मिळवता आलं नाही. भारताला पहिल्यांदा न्युझिलंडकडून तर दुसऱ्या वेळेसे ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. आता टीम इंडियाची नजर सलग तिसऱ्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचून विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याकडे असेल. भारत सध्या ६८.५२ टक्के गुणांसह डब्ल्यूटीसी गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
भारताच्या खात्यात सध्या ६८.५२ टक्के गुण आहेत. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपच्या तिसऱ्या चक्रात तीन संघांविरुद्ध मिळून आणखी दहा कसोटी सामने खेळायचे आहेत. जर भारत दहा पैकी दहा कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी झाला तर कोणतीही वजावट न केल्यास ८५.०९ टक्के या कमाल टक्केवारीपर्यंत पोहोचू शकतो. तथापि, टीम इंडियासाठी हे करणे थोडे कठीण आहे, कारण भारताला या दहा पैकी ५ कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीवर खेळायच्या आहेत.
भारताच्या नजरा घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या इतर पाच कसोटी सामन्यांवर असतील. रोहित शर्मा आणि चमू १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. यानंतर त्यांना न्युझिलंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. जर भारत या पाच कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरला, तर तो ७९.७६ टक्के कमाल टक्केवारी गाठेल. अशा परिस्थितीत त्यांची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता खूप जास्त असेल.
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या अंतिम फेरी गाठण्याच्या शक्यतेबद्दल बघितले तर भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेव्यतिरिक्त त्यांना श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. जर कांगारू हे सर्व कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी ठरले तर ते ७६.३२ हि टक्केवारी गाठू शकतील की, जी अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पुरेसे असेल.
न्युझिलंडची डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त दिसते, कारण त्यांना ७८.५७ टक्के पॉइंट्स गाठण्याची संधी आहे. किवी संघाला श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि भारताविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, त्यानंतर किवीज तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. अशा स्थितीत त्यांना अधिक गुण मिळवण्याची संधी आहे. सध्या न्युझिलंडच्या खात्यात पन्नास टक्के गुण आहेत आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर बांगलादेशला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि वेस्ट इंडिजविरुद्ध समान सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत हे सहा सामने त्यांच्यासाठी फायनलचे दरवाजे उघडू शकतात.
इतर संघांबद्दल बोलायचे झाल्यास, श्रीलंका जास्तीत जास्त ६९.२३ टक्के गुणांपर्यंत पोहोचू शकतो, तर इंग्लंड ५७.९५, दक्षिण आफ्रिका ६९.४४ पाकिस्तान ५९.५२ आणि वेस्ट इंडिज ४३.५९ टक्के गुणांपर्यंत पोहोचू शकतो. सध्या इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज हे संघ डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेले दिसत आहेत.
फायनल पूर्वी अजून बरेच सामने बाकी असल्याने अनिश्चिततेच्या या खेळात काहीही चमत्कार होऊ शकतो. त्यामुळे क्रिकेटच्या महान इतिहासात कशाची नोंद होते हे भविष्याच्या गर्भात दडले आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२