shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

देशात ज्ञानी पिढी घडविण्यासाठी घराघरात ग्रंथ हवेतच ! - प्रा. डॉ. सुभाष वाघमारे


उंब्रज - सातारा /  प्रतिनिधी:
‘ बहुश्रुत वाचन केल्यानेच माणूस ज्ञानी होत असतो. आपल्या प्रत्येक घरात जीवनाला विविध प्रकारचे ज्ञान देणारे ग्रंथ असायला हवेत. घर हे सदाचारी व ज्ञानसमृद्ध व्हायचे असेल तर वाचन संस्कृती घरात रुजवली पाहिजे. वाचन व्यासंगानेच  जगात विविध क्षेत्रातील विविध विद्वान, संशोधक  तयार झाले. त्यांच्या ज्ञानाने  माणसाला यथार्थ जग समजू लागले. न्याय व अन्याय कळू लागला. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी इत्यादींनी देखील खूप वाचन करून देशासाठी योगदान दिले आहे. जगात आपल्या देशाचा दर्जा उंचावला आहे. वाचनाने व्यक्तिमत्व बहुश्रुत बनते, वाचन हे जीवनाला मार्गदर्शन करीत असते. 

वाचन सतत केल्याने माणूस विवेकी होत जातो.आपल्या घरात कितीही सोनेनाणे असले तरी ज्ञानासाठी ग्रंथाचे कपाट असले तरच मनाची व घराची श्रीमंती वाढते असे मत त्यांनी व्यक्त केले. देशात ज्ञानी पिढी घडविण्यासाठी घराघरात ग्रंथ हवेतच. ग्रंथ वारसा असलेली सर्जनशील माणसे आपण तयार केली पाहिजेत. अनेकांना लिहिते , वाचते केले पाहिजे असे विचार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. मंगलताई रामचंद्र जगताप  महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन निमित्ताने आयोजित  केलेल्या कार्यक्रमात ‘अभिजात मराठी भाषा व वाचन संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कांबळे होते. 

  वाचन करण्याविषयी आवाहन करताना ते पुढे म्हणाले की‘ देह जगविण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तसे मनाचे पोषण होण्यासाठी ग्रंथाची व अनुभवाची गरज असते. ग्रंथ आपल्याशी हितगुज करून सुख दुःख सांगत असतात. आपल्याला जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करीत असतात. व्याकूळ झालेल्या मनाला धीर देतात. तर दुःखी मनाला आधार देतात. ग्रंथ मित्र असतात तसे आपले सेवक असतात. ग्रंथ कधी आदेश देत असतात तर कधी सदुपदेश करीत असतात. ग्रंथ निष्ठावंत असतात. ते आपल्याला अनेक रस प्यायला देतात.आपल्या बालपणात ,तारुण्यात, वृद्धापकाळात देखील आपले सोबती असतात. आपली प्रिय माणसे आपल्याला सोडून गेली तरीही ग्रंथ धीराने राहण्याची  हिम्मत देतात आणि शांती आणि आनंदाच्या वाटा सांगत राहतात.आज मात्र ग्रंथ सोडून माणसे मोबाईलमध्ये अडकली आहेत. एकट्याने पुस्तक वाचून जग समजून घेण्याचा आनंद खूप मोठा असतो,म्हणून प्रत्येकाने नियमित दररोज एक तास तरी अवांतर वाचन केले पाहिजे. माणसे मटण खाण्यासाठी भरपूर खर्च करतात पण  वर्तमान घडामोडी जाणून घेण्यासाठी वर्तमानपत्र विकत घेत नाहीत अद्ययावत माहितीसाठी नियमित वर्तमानपत्र वाचले पाहिजे.खरोखर अवांतर वाचनाने माणसाचे दृष्टीकोन उदात्त होतात.भाषा हे मन भावना व विचाराचे स्पंदन आहे .मुळात कोणत्याही भाषेची किंमत कमी जास्त नसते. प्रत्येक भाषेला तिची स्वतःची  किंमत असते. व्यवहारात,व्यापारात,ज्ञान व्यवहारात  त्या भाषेचा वापर जास्त  होत गेला तर तिची प्रगती होते. मराठी माणूस  आपल्या कर्तृत्वाने जगभर नाव कमवेल आणि भाषेशी निष्ठा ठेवून तिचा विस्तार करेल तर मराठीचा वापर वाढत जाईल. पण आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेची देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात होत आहे.इतर भाषेतील ग्रंथ मराठी भाषेत भाषांतरीत झाल्याने जगातले विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला मिळत आहे. जगातील विविध माणसांची संस्कृती,अनुभव काय आहेत हे जाणून घेण्याची जिज्ञासा आता वाढलेली आहे. मराठीतील ग्रंथ इतर भाषेत अनुवादित होत आहेत  त्यामुळे या पुढच्या काळात मराठीच्या वृद्धीबरोबर जगातल्या अनेकविध भाषा शिकल्या पाहिजेत. 
    अभिजात भाषा निवडीच्या पद्धतीविषयी सविस्तर माहिती देऊन ते  पुढे म्हणाले की, ‘ पूर्वी तमिळ,संस्कृत,कन्नड ,तेलगु,मल्ल्याळम,ओडिया या सहा भाषांना  अभिजात भाषेचा दर्जा मिळाला . अलीकडे ३ ऑक्टोबरला मराठी , पाली, प्राकृत ,असामी,बंगाली या  भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यासाठी  रंगनाथ पठारे समितीने जे परिश्रम घेतले ,आणि अनेक साहित्यिक व मराठी भाषिकांनी यासाठी परिश्रम घेतले त्यांचे कृतज्ञ आपण राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.
         अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.संजय कांबळे म्हणाले की ‘ विद्यार्थ्यांनी कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक वाचले पाहिजे . आपल्या ग्रंथालयात, वैचारिक, ललित चरित्रात्मक अशी अनेक चांगली पुस्तके असून विद्यार्थ्यांनी ती मनापासून वाचली पाहिजेत.जसे शिक्षक विद्यार्थ्यांना मूल्य शिकवतात तसे ग्रंथ न रागावता आपल्याला जागृत करतात. मूल्य विवेक शिकवतात. कार्य संस्कृती जशी महत्वाची तशी ज्ञानासाठी  वाचन संस्कृती महाविद्यालयात तयार झाली पाहिजे. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी वाचन ,लेखन या बाबतीत सातत्य ठेवले असून विचारपूर्वक कृती करून ते समाजाचे हित करणारे ते मानवतावादी लेखक असल्याचे  त्यांनी सांगितले.लंडन आणि मॉरिशस या देशांना भेटी देऊन त्यांनी तेथील संस्कृती व शिक्षणक्षेत्राची माहिती जाणून घेतल्याबद्दल त्यांनी प्रा.वाघमारे यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात ग्रंथालय विभागाने ‘चांगले वाचक’ म्हणून  मराठीचे प्राध्यापक प्रा.घनश्याम गिरी यांची निवड केली. व त्यांचा या कार्यक्रमात ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
 या कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल प्रा.विकास बर्गे यांनी केले.तर आभार प्रा. सौ.सुवर्णा मूळगांवकर यांनी मानले या कार्यक्रमास प्रा.डॉ.संभाजी गावडे, प्रा. डॉ.अनिल उबाळे,प्रा.डॉ. वंदना मोहिते, प्रा.आर.एस. जाधव,प्रा.प्राजक्ता पाटणे, प्रा.धनाजी सावंत,प्रा. कुलकर्णी, श्रीमती नीता मोहिते , महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते. 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस 
श्रीरामपूर,९५६११७४१११

 *बॉक्स मध्ये घणे* 👇
-------------------------------------------
*वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने प्रा.डॉ.सुभाष वाघमारे युवकांना  संदेश दिला.‘ वाचन संस्कृती रुजण्यासाठी एकमेकाला ग्रंथ भेट द्यायला हवेत.  वाढदिवशी  ज्ञान किती वाढले,माणसे किती जोडली. स्व हिताचे  व समाज हिताचे काम किती केले याचा विचार करायला हवा. युवकांनी कोणत्याही विध्वंसक कार्यात सहभागी न होता घराचे  व समाजाचे चांगले व्हावे अशाच कामात सहभागी व्हावे. विषमता असलेल्या समाजात समता निर्माण करण्यासाठी बंधुभाव जोपासला पाहिजे आणि माणसे तोडण्याऐवजी माणसे जोडण्याचे काम केले पाहिजे. जगात अनेक प्रकारच्या श्रद्धा निर्माण झाल्या असल्यातरी आपल्याला माणसातच जीवन जगायचे आहे . त्यामुळे स्वतःस व इतरास सुखशांती मिळावी म्हणून आपण कर्म करीत रहायला हवे, म्हणून माणसात रहा. आळशी न राहता उत्साही रहा, कष्टाळू व प्रयत्नवादी व्हा. स्वावलंबी व्हा.  जीवनात सदाचारी व्हा, निर्व्यसनी व्हा ,शीलवान व्हा,समतावादी व्हा.मैत्री भावना प्रसार करा. जीवन पुन्हा नाही त्यामुळे वेळेचा सदुपयोग करून वाईट कामे न करता चांगलीच कामे करा असे ते म्हणाले. त्यांनी आपले भाषण संवाद पद्धतीने केल्याने विद्यार्थी प्रश्नोत्तरात सहभागी होत समरस झाले होते. या वेळी ग्रंथपाल प्रा. विकास बर्गे यांनी मी पुस्तक बोलतोय या आशयाची कविता सादर केली

close