shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मराठी ग्रामीण कथा : शोध आणि बोध


*(ग्रामीण साहित्यातील अमूल्य ठेवा : डॉ. शिवाजी काळे गौरव ग्रंथाचे प्रकाशन)

कथा हा वाचकांच्या सर्वात आवडीचा साहित्यप्रकार. मौखिकेकडून लिखित साहित्याकडे प्रवास करणाऱ्या कथेने आपले स्वतःचे विश्व निर्माण केले आहे. १८९० साली ह. ना. आपटे यांनी लिहिलेल्या कथा 'करमणूक' मधून प्रसिद्ध होत. कथा साहित्याचा हा पहिलाच लेखनप्रपंच माणसाच्या विकासाच्या टप्प्यात बदलत गेला आहे. मानवी संस्कृती बरोबर ग्रामीण कथा जन्माला आल्या. शेती, पशु-पक्षी, प्राणी यांचे जीवन हे मानवी जीवनाशी निगडित आहे.

 या ग्रामीणत्वाचा लेखाजोखा ग्रामीण साहित्यातून उमटवू लागला. पौराणिक कथेपासून अर्वाचीन कथा ते आधुनिक कथा साहित्यापर्यंतचा कथेचा प्रवास रोमांचक आणि वैविध्यपूर्णतेने नटलेला आहे. रामायण, महाभारत, लीळाचरित्र, दृष्टांतकथा हे ग्रंथ समाजसंस्कारांच्या पाऊलखुणा आहेत. ग्रामीण कथेला अनेक ग्रामीण साहित्यिकांनी वळण दिले. १९६० नंतर ग्रामीण कथेला खरी प्रतिष्ठा लाभली. याच पाऊलवाटेवरील डॉ. शिवाजी काळे यांनी आपल्या ग्रामीण लेखन साहित्याचा प्रपंच साकारला. डॉ. काळे यांचे जीवन नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव सारख्या खेड्यात आकाराला आलेले आहे. त्यामुळे ग्रामीणत्वाचा स्पर्श त्यांच्या जीवनाला स्पर्शून गेला आहे. 
      ग्रामीण संस्कृतीची नाळ जोडल्या गेलेल्या डॉ. काळे यांचे जीवन आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे. रयत शिक्षण संस्थेसारख्या बहुजन समाजासाठी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संस्थेतून त्यांची शिक्षक म्हणून झालेली जडणघडण नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या साहित्यगुणांचा गौरव व्हावा म्हणून 'मराठी ग्रामीण कथा : शोध आणि बोध' हा संशोधनात्मक गौरव ग्रंथ आकाराला आला आहे. आजवर अगणित नोकरदारांनी आपल्या सेवेला विराम देताना बहुप्रचलित पद्धतीला आपलेसे केले आहे; परंतु डॉ. काळे यांचा हा आगळावेगळा अभिनव प्रयोग भविष्यातील सेवानिवृत्त होणाऱ्या सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारा आहे. 
       डॉ. काळे यांचा शैक्षणिक प्रवास हा खूपच कष्टाचा आहे. शेवगाव, श्रीरामपूर, अहमदनगर येथून शिक्षण घेऊन त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी संपादन केली. श्रीरामपूरच्या मुळा प्रवरा इलेक्ट्रिक को-ऑप. सोसायटीच्या माध्यमातून एक अभ्यासू अभियंता म्हणून त्यांचा प्रवास सुखकर ठरला; परंतु त्याचे सौख्य काही वर्षांचे सीमित होते. मुळा प्रवरा सोसायटीने अखेर शेकडो जणांच्या समवेत डॉ. काळे यांचीही साथ सोडली. इथून पुढचा काळ मात्र त्यांच्यासाठी खूपच खडतर होता. नोकरी गेली म्हणजे तोंडातला घास गेला; परंतु विधीज्ञ स्व. रावसाहेब शिंदे यांच्या माध्यमातून कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेत २०११ सालापासून उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडे इलेक्ट्रॉनिक्स  हा विषय घेऊन अध्यापन करण्याची त्यांना संधी मिळाली. मुख्य विषय इलेक्ट्रॉनिक्स; परंतु मराठीवर प्रचंड प्रभुत्व. मराठी विषयात एम. ए., एम. फील., पीएच.डी., नेट, सेट, डी.एस.एम. यासारख्या उच्च पदव्यांचे संपादन केलेल्या डॉ. काळे यांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रातील कार्य आदर्शवत आहे. स्वतः उच्च विद्याविभूषित आहेतच. मुलांनाही उच्च शिक्षण दिले आहे. शिवाय पत्नीलाही उच्च शिक्षणाची प्रेरणा देऊन त्याही सध्या पीएच. डी. चा संशोधनात्मक अभ्यास करत आहेत. नव्याने सुरू केलेले आसरा प्रकाशन त्यांच्या यशोकीर्तीमध्ये भर घालत आहे. 
        डॉ. शिवाजी काळे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या 'मराठी ग्रामीण कथा: शोध आणि बोध' या ग्रंथाचे संपादन साहित्यिक, गुरुवर्य डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले आहे. आसरा प्रकाशन श्रीरामपूर यांच्यामार्फत या ग्रंथाचे ६ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रकाशन होत आहे. डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे या ग्रंथाला लाभलेले संपादकीय साहित्यमूल्यरुपी विचारधन आहे. डॉ. शिवाजी काळे यांनी आपल्या जीवनाच्या वाटचालीचा मागोवा घेताना ग्रामीण जीवनातल्या आठवणी उद्ध्रृत केल्या आहेत. खडतर कौटुंबिक जीवन प्रवासात पत्नीची मिळालेली अनमोल साथ, प्राप्त परिस्थितीत मुलांनी केलेले समायोजन, कौटुंबिक सुसंस्कार हीच त्यांच्या जीवनाची अनमोल शिदोरी आहे. जीवनातील खडतर परिस्थितीला पायदळी तुडवत प्रत्येक वळणावर स्वतः आणि कुटुंबाचा तोल सांभाळत त्यांनी केलेला जीवनप्रवास नव्या पिढीला खूपच प्रेरणादायी आहे. 
         या गौरव ग्रंथाच्या विभाग एक मध्ये डॉ. स्नेहल तावरे, डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. कीर्ती मुळीक, डॉ. वंदना मुरकुटे, डॉ. दादासाहेब कोळी, डॉ. शितल सुसरे, डॉ. रामकृष्ण जगताप यांचे 'मराठी ग्रामीण कथा : शोध आणि बोध' या विषयाच्या अनुषंगाने संशोधनपर लेख प्रसिद्ध झाली आहेत. विभाग दोन मध्ये 'डॉ. शिवाजी काळे : व्यक्तित्व आणि साहित्य' यामध्ये पल्लवी सौंदोरे, मोहिनी काळे, माजी प्राचार्य टी. ई. शेळके, संगीता फासाटे,  सुखदेव सुकळे, क्षितिज लेंभे, सुप्रिया ताके, कमलजीतकौर बतरा, किरण खानवेलकर, सुनील काळे, बापूसाहेब सदाफळ, प्रा. प्रशांत खाडे, माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, प्रा. दिलीप सोनवणे, डॉ. दादासाहेब गलांडे, सुभाष सोनवणे, संतोष लेंभे,  ज्योती चव्हाण, लेविन भोसले,  सुकन्या काळे यांचे विचाररुपी धन डॉ. काळे यांच्याविषयी लेखातून प्रकटले आहे. डॉ. काळे यांच्या प्रती या सर्वांची आत्मीयतेची भावना वाखाणण्याजोगी आहे. शेवटच्या भागात डॉ. काळे यांच्या वैयक्तिक माहिती बरोबर नोकरीतील सेवाकाळ, विविध संस्थात्मक कार्य, संशोधन कार्य, प्रकाशित ग्रंथ, संशोधन, नियतकालिकातील लेखन, विविध पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावना, विविध पुरस्कारांची यादी, काळे घराण्याची वंशावळ  यांची ओळख करून दिलेली आहे. 
डॉ. शिवाजी काळे यांच्या 'गावकुसातल्या कथा' ग्रामीण जीवनातील अनुभवसंपन्न कथा आहेत. या कथातून ग्रामीण  ग्रामीणत्वाचा आणि गोष्टीवेल्हाळपणाचा निर्देश होतो. ज्या घटना अनुभवल्या आहेत, त्या अत्यंत प्रांजळपणे आणि तरलतेने अवतरल्या आहेत. त्यांच्या लेखनात सहजता, नाट्यमयता,  मनोरंजनातून उपदेश करण्याची हातोटी आणि ग्रामीण वास्तवाचे चित्रण आढळते. या कथा वाचकांच्या मनाचा वेध घेत ग्रामीणत्वाचे महत्त्व विशद करतात. 'मराठी ग्रामीण कथा : शोध आणि बोध' या गौरवग्रंथाचा ग्रामीण साहित्याचा अभ्यास करणा-या संशोधकांना खूपच उपयुक्त ठरणार आहे. हा गौरव ग्रंथ म्हणजे साहित्य मूल्यरूपी विचारधन आहे. या गौरव ग्रंथाचे संपादन डॉ. उपाध्ये,  प्रकाशन आसरा प्रकाशनच्या मोहिनी काळे यांनी केले आहे. गीताई प्रेस, सावेडी, अहमदनगर यांनी मुद्रण केले आहे.            या ग्रंथाचे मुखपृष्ठ चैत्राली काळे यांनी खूपच बोलके आणि अर्थपूर्ण असे केले आहे. या गौरव ग्रंथाची पृष्ठसंख्या २०८ असून गौरवग्रंथ वाचताना डॉ. काळे यांच्याविषयी विविध क्षेत्रातील लेखांच्या रूपाने आलेल्या आठवणी त्यांच्याविषयीच्या आत्मीयता, जिव्हाळा आणि ऋणानुबंधाच्या भावनेने ओतप्रोत व्यक्त झालेल्या आहेत. हा गौरव ग्रंथ मांडणी, रचना, कल्पकता, बांधणी, मुखपृष्ठ, मलपृष्ठ आदींच्या बाबतीत खूपच प्रेरक आहे. एका बाजूला 'मराठी ग्रामीण कथा: शोध आणि बोध' तर दुसऱ्या बाजूला डॉ. काळे यांचे ग्रामीण जीवनाशी निगडित अनुभवसंपन्न जीवन व्यक्तिमत्त्वाच्या विविध गुणांनी उद्धृत झालेली आहे. या गौरव ग्रंथाच्या रूपाने मराठी ग्रामीण साहित्यात ही मोलाची भर ठरणार आहे. डॉ. काळे यांना या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा !

डॉ. शरद दुधाट
जिल्हाध्यक्ष, मराठी विषय महासंघ,अहमदनगर.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close