shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भारताला भारतात हरविण्याची न्युझिलंडची ऐतिहासिक किमया



                सामन्याच्या पहिल्या दिवशी साक्षात निसर्गाचाच प्रकोप त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात. नाणेफेकीचा जो कौल खास करून भारतात खेळताना निर्णायक साबीत होतो तो खुद्द भारतीय कर्णधाराच्या बाजूने पडला पण येथेच भारताच्या नशिबाचे फासे उलटे पडायला सुरुवात झाली. मागील काही दिवसांपासून बंगळुरात पाऊस चालू असल्याने खेळपट्टी झाकलेली होती. शिवाय ग्राऊंडसमनने खेळपट्टी तयार करण्यासाठी काही प्रमाणात वापर केलेले पाणी व सततच्या पावसाने मुरलेले पाणी खेळपट्टीत जिरले. शिवाय खेळपट्टी झाकलेली असल्याने ती सुकायला वेळच मिळाला नाही. मग न्युझिलंडच्या वेगवान गोलंदाजांना त्यांच्या मायदेशात मिळते तशी खेळपट्टी, वातावरण उपलब्ध व अशा अनुकूल परिस्थितीचा लाभ त्यांनी घेतला नसता तर नवलच झाले असते. या सर्व बाबींचा अचूक लाभ उठवत किवीज गोलंदाजांनी कागदोपत्री बलाढय नावं असलेली भारतीय फलंदाजी मात्र ४५ धावात नेस्तनाबुत केली आणि येथेच सामन्याचा निकाल निश्चित झाला होता.

            त्यातच जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार किवीज फलंदाजांनी ४०२ धावा करून केला. भारतात भारतीय फलंदाजा प्रमाणे भारतीय गोलंदाजही शेर असतात मात्र यावेळी त्यांचेही काहीच चालले नाही. संपूर्ण सामन्यात वातावरण व नाशिबानेही पाहुण्या संघालाच साथ दिली. भारतीय फलंदाज फलंदाजी करताना गोलंदाजांना अनुकूल ढगाळ वातावरण असायचे तर भारतीय संघ क्षेत्ररक्षण करताना सुर्य देवता मैदानावर राज्य करून फलंदाजीला पोषक वातावरण बनायचे. नाणेफेक जिंकल्यानंतर खेळपट्टी ओळखण्यात भारतीय संघ प्रबंधानांची झालेली चुक ते निसर्गाची न मिळालेली साथ भारतीय संघाला महागात पडली. त्याचा परिणाम म्हणजे आठ गडी राखून न्युझिलंडने विजय मिळवून ३७ वर्षानंतर भारतात विजयाची चव चाखली. या पराभवानंतर तुर्त तरी डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारताच्या अव्वल स्थानाला धक्का पोहोचणार नसला तरी पुढील ७ पैकी किमान पाच सामने जिंकले तरच फायनलचं तिकीट मिळणार आहे.
               तत्पूर्वी शनिवारी सर्फराज खान आणि रिषभ पंत यांनी ३ बाद २३१ धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली आणि भारताची धावसंख्या ४०० धावांच्या पुढे नेली. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये एकूण १७७ धावांची भागीदारी झाली.  न्युझिलंडला चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात पहिली विकेट मिळाली.  टीम साऊदीने सर्फराजला एजाज पटेलकडे झेलबाद केले. बरोबर दीडशे धावांची दमदार इनिंग खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.  यानंतर राउरकेने पंतवर निशाणा साधला आणि तो ९९ धावांवर त्याचा बळी ठरला.  त्याचे सातवे शतक अवघ्या एका धावेने हुकले.  या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाजाने १०५ चेंडूत नऊ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ९९ धावा केल्या. 
              टॉम लॉथमने ऐंशीव्या षटकात दुसरा नवीन चेंडू घेतल्यानंतर भारताची फलंदाजी ढासळली आणि अवघ्या ६२ धावांत सात गडी गमावले. यापूर्वी संघाचा धावगती पाच होता, तर ८१ ते ९९ षटकांमध्ये तो केवळ ३.१८ राहिला.  के एल राहुल १२, जडेजा पाच, अश्विन १५, कुलदीपने नाबाद सहा धावा केल्या तर बुमराह आणि सिराज खाते न उघडता बाद झाले.  किवीजकडून हेन्री आणि रुर्के यांनी प्रत्येकी तीन तर एजाझने दोन गडी बाद केले.  त्याचवेळी साऊथी आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.  केवळ १०६ धावांची आघाडी घेत भारताने किवीजसमोर १०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.  
             न्युझिलंडने पहिल्या डावात ४०२ धावा केल्या आणि ३५६ धावांची मोठी आघाडी घेतली.  तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सर्फराज खानच्या अर्धशतकांसह सावरण्याचा प्रयत्न केला.  कोहली आणि सर्फराज खान यांच्यात चांगली भागीदारी सुरू होती जी ग्लेन फिलिप्सने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर कोहलीला बाद करून फोडली. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली.
               बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि न्युझिलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एकूण ४५३ धावा झाल्या आणि १० फलंदाज बाद झाले.  भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातील एका दिवसातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी सन २००९ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतात कसोटी सामन्याच्या एका दिवशी सर्वाधिक धावा केल्या गेल्या होत्या.  त्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण ४७० धावा झाल्या.

               भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत न्युझिलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ९९ धावा करून बाद झाला आणि त्याचे शतकही हुकले. अशाप्रकारे पंत कसोटीत सातव्यांदा नर्व्हस ९० चा बळी ठरला आहे.  चौथ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या पंतने सर्फराज खानसोबत चौथ्या विकेटसाठी शानदार भागीदारी करत भारताला संकटातून बाहेर काढले. पंत आणि सर्फराजच्या भागीदारीच्या जोरावर भारताला दुसऱ्या डावात आघाडी घेण्यात यश आले. 
               सर्फराज आणि पंतने शनिवारी न्युझिलंडच्या गोलंदाजांना खूप त्रास दिला. या काळात पंतने आक्रमक फलंदाजी करत आपले बारावे अर्धशतक पूर्ण केले. एवढेच नाही तर कसोटीत सर्वात जलद २५०० धावा पूर्ण करणारा पंत भारतीय विकेटकीपर फलंदाज ठरला. पंत शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, पण ९९ धावांवर तो विल्यम ओ'रूर्कने त्याला बोल्ड केले आणि त्याचे शतक हुकले. 
                पंत कसोटीत सातव्यांदा नर्व्हस ९० चा बळी ठरला आहे आणि सर्वाधिक वेळा शतकापासून वंचित राहणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आहे.  भारतासाठी कसोटीत सर्वाधिक वेळा शतक हुकण्याचा अवांछित विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, जो त्याच्या कारकिर्दीत एकूण दहा वेळा नर्व्हस नाईटीजचा बळी ठरला आहे.  त्याचबरोबर संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड नऊ वेळा शतक झळकविण्यात अपयशी ठरला आहे. 
भारताकडून कसोटीत सर्वाधिक ९० वेळा नर्व्हसचा बळी ठरलेला फलंदाज,सचिन तेंडुलकर - १०, राहुल द्रविड - ०९, ऋषभ पंत - ०७, सुनील गावस्कर-०५, महेंद्रसिंग धोनी - ०५, विरेंद्र सेहवाग - ०५.
                या मालिकेतील अजून दोन सामने बाकी असून पिछाडीवरून बाजी मारण्यात भारताचा हातखंडा आहे. त्यामुळे किमान उर्वरीत सामन्यांत भारताच्या मर्जी प्रमाणेच सर्व काही घडेल व मायदेशात सलग कसोटी मालिका जिंकण्याची परंपरा पुढे सुरूच राहिल अशी आशा करू या.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close