shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी - हर्षवर्धन पाटील •बावडा येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

इंदापूर : प्रतिनिधी दि.15/10/24
                 छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कर्तृत्व व गनिमी कावा नीती जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकाने जीवन जगताना शिवाजी महाराजांचे विचार घेऊन वाटचाल करावी. सर्व समाजाला, अठरापगड जातींना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांमुळे आजही सामाजिक एकोपा कायम आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.12) काढले.
       बावडा येथे श्री शिवाजी एज्युकेशन  सोसायटीच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा व अनावरण सोहळा  हर्षवर्धन पाटील व जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या शुभहस्ते शानदार सोहळ्यामध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला. यावेळी होमहवन विधी सोहळा व  शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते उत्साही वातावरणात व हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी प्राणप्रतिष्ठेची पूजा संस्थेचे सचिव व माजी सरपंच किरण पाटील व सौं.धनश्री पाटील या उभयतांच्या हस्ते करण्यात आली.
             हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी कर्तृत्वाचा देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये गौरवपूर्ण उल्लेख केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यामुळे सर्व समाजाला, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून, त्यातून प्रत्येकाचे जीवन यशस्वी होण्यास आत्मबळ प्राप्त होणारे आहे.
         पुतळा ब्रांझ धातु पासून बनवलेला असून, पुतळ्याचे वजन 2 टना पेक्षा अधिक आहे. हजारो वर्ष हा पुतळा समाजाला स्फूर्ती देत राहणार आहे. या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून, सदरचे काम येत्या 3 ते 4 महिन्यात पूर्ण होईल, त्यासाठी सुमारे 45 लाख रुपये खर्च येणार असून, त्यापेक्षा जास्त निधी लागला तरीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली. संस्थेचे संस्थापक शंकरावजी पाटील उर्फ भाऊंनी या शिक्षण संस्थेला 70 वर्षांपूर्वी शिवाजी हे नाव दिले, त्याच संस्थेच्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारुढ पुतळा उभा राहत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात नमूद केले.
    दरम्यान, पुतळा प्राणप्रतिष्ठा व अनावरण कार्यक्रमांमध्ये बावडा गावातील सर्व 31 जाती-धर्माच्या नागरिकांना मान देण्यात आला. अनावरण सोहळ्यामध्ये त्यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील नागरिकांनी येऊन पहावा, असा सुंदर अश्वारुढ पुतळा  बनविण्यात आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
           प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केले. यावेळी अशोकराव घोगरे, समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पुतळ्याचे शिल्पकार चंद्रसेन यादव यांचा सपत्नीक सन्मान हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव किरणकाका पाटील, संचालक उदयसिंह पाटील, सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य डी. आर. घोगरे व शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर निलाखे तर आभार संस्थेचे संचालक पवनराजे घोगरे यांनी मानले.
_______________________________
फोटो:-बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा अनावरण प्रसंगी हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील व मान्यवर.
close