*इस्रो सहलीसाठी जिल्ह्यातुन निवड होणे भूषणावह – डॉ. विश्वासराव आरोटे!*
*कळस (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवत आहेत. कळस येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांची इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) सहलीसाठी नगर जिल्ह्यातून निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. ही भूषणावह गोष्ट असून भविष्यात हे विद्यार्थी शास्त्रज्ञ होण्याच्या मार्गावर आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले.
कळस येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गणेश महाराज वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, चेअरमन विनय वाकचौरे, पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख गणेश रेवगडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव निसाळ, मुख्याध्यापक तानाजी वाजे आदी मान्यवर उपस्थित होते.
नगर जिल्ह्यातून इस्रो सहलीसाठी कु. गौरी विष्णू वाकचौरे हिची निवड झाल्याबद्दल तसेच परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या कावेरी राजेंद्र खताळ हिच्या यशाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. दोन्ही विद्यार्थिनींना सन्मान चिन्ह, रोख पाचशे रुपये, शालेय साहित्य, पुस्तके, स्कूल बॅग आदी बक्षीस देण्यात आले.
सत्कार समारंभात डॉ.विश्वासराव आरोटे यांनी आपल्या जीवनातील संघर्षाचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. “मीही एकेकाळी शेवटच्या बेंचवरील विद्यार्थी होतो. मात्र, पेपर विक्रेता ते संपादक असा माझा प्रवास झाला आहे. म्हणूनच मी विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करतो,” असे त्यांनी सांगितले.
समारंभात तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव निसाळ यांची निवड झाल्याबद्दल आणि सुंदर गायन सादर केल्याबद्दल दिक्षा वसंत ढगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सुलतानपूरच्या प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या. यावेळी सुरेश गोसावी व संदीप गावडे हे शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संगीता दिघे यांनी केले, सूत्रसंचालन योगेश थोरात यांनी तर आभार प्रदर्शन गणेश रेवगडे यांनी केले.