shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

‘ग्रामगीता’कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज..

*‘ग्रामगीता’कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

लोकशाही कायद्याने व शासनाने यशस्वी होऊ शकत नाही, त्यासाठी लोकांचे मतपरिवर्तन व मानसिक सुधारणा करण्याची आवश्यकता असते. पण, ती शक्ती सरकारमध्ये असू शकत नाही. जी व्यक्ती जनसागराचे हृदय आंदोलीत करू शकते तीच देशात अचाट क्रांती घडवून आणू शकते. ज्यांचे जीवन विश्वासी समरस झालेले आहे. त्यांच्याच शब्दात एवढे अचाट सामर्थ्य असू शकते. तेच सामर्थ्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील प्रत्येक शब्दात आहे. जे काम भारतातील दगडातसुद्धा जीव ओतणार्‍या तुलसी-रामायणामुळे त्या होऊ शकले तीच क्रांती या वर्तमान युगात संत तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ करू शकेल.

लोकशाहीत मानसिक क्रांती आवश्यक आहे. राष्ट्रसंताची ‘ग्रामगीता’ हे आंतरीक क्रांती घडविण्याचे अलौकिक सामर्थ्य आहे. तुकडोजी महाराजांच्या जीवनाची बैठक रामदास, विवेकानंद, विनोबाजी इत्यादी साधू पुरुषांसारखी आहे. हे सर्व संत भारतीय पद्धतीनेच परमार्थाचा विचार करतात. परमेश्वराच्या ठिकाणी त्यांची पूर्ण श्रद्धा आहे. राष्ट्रसंतांनी अर्धपोटी राहणार्‍या आणि अज्ञान, दारिद्य्र व आळस यांच्या पाशात सापडून आगतिक झालेल्या आपल्या अगणित दीन आणि दलित देशबांधवांत त्यांचा देव दिसतो, असे ग्रामगीतेत दर्शविले आहे.
ज्याप्रमाणे ज्ञानदेवांनी ‘श्री भगवद्गीता’ सामान्य माणसाला समजावी म्हणून भगवद्गीतेचे मराठी भाषांत करून ज्ञानेश्वरीच्या रुपाने सामान्य लोकांना अध्यात्म, विज्ञान, सर्वधर्म समन्वय भक्ती व कर्मयोग याचा खजिना उपलब्ध करून दिला. त्याप्रमाणे राष्ट्रसंतांनी ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून आपल्या देशातील झोपी गेलेली खेडी जागी व्हावी, अज्ञान, लोकभ्रम आणि सामाजिक जडत्व त्यामुळे खेड्यातल्या जीवनाला अवकळा आली आहे, ती नाहिसी व्हावी यासाठी विविधांगी लेखन केले. 
“ईश्वरे निर्मिले हे विश्व, म्हणुनी जगची आम्हा देव ।
विश्वाचा मूळ घटक गाव, ‘ग्रामगीता’ त्याचसाठी ॥”
राष्ट्रसंतांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे त्यांनी समग्र विश्‍वासाला दिलेली अमूल्य देण आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे. आणि खेड्याचा विकास झाला तरच राष्ट्राचा विकास होऊ शकतो, हा विचार प्रामुख्याने त्यांनी मांडलेला आहे.
श्रीसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रामसेवेच्या बाबतीत अधिकार मोठा आहे. रामायणातून रामराज्य निर्माण झाले, गामगीतेतून ‘ग्रामराज्य’ निर्माण झाले. विसाव्या शतकात असुरी प्रवृत्तीकडे चाललेल्या समाजव्यवस्थेत परिवर्तन करून दैवी प्रवृत्तीची समाजरचना घडविण्याच्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ३० एप्रिल १९०९ रोजी गुरुदेव शक्ती अवतरले. लहानपणचे नाव माणिक. गुरुदेव आडकोजी महाराजांची कृपादृष्टी माणिकवर पडली आणि माणिकचे नाव आडकोजी महाराजांनी तुकड्यादास ठेवले. तेव्हापासून त्यांना तुकडोजी म्हणतात. 
तुकडोजी महाराजांना साहित्य लेखनाचा लहानपणापासून छंद होता. पुढे साहित्यरचना, अनुभावसागर भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले. इ.स.१९३५ साली त्यांनी मोझरी (अमरावती) येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. ‘गुरुदेव सेवामंडळ’ याद्वारे त्यांचे अध्यात्म आणि समाजसेवामय कार्य सुरू झाले. गुरुदेव सेवामंडळाच्या द्वारे अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्या कार्याचा प्रचार शिस्तबद्ध पद्धतीने झाला. भजन, किर्तन, प्रबोधन, खंजिरी वादन याद्वारे त्यांनी लोकजागृती केली. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेद निर्मूलन यावर त्यांनी विशेष लक्ष देऊन त्या कार्याला गती दिली. 
त्यांचे कार्य अध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता यावर आधारीत होते. त्यांचा ‘भारत छोडो’ आंदोलनातील सहभाग आणि स्वातंत्र्य संग्रामातील तरुणांना आणि जनतेला उपदेश हा अतिशय मोलाचा ठरला. त्यामुळे त्यांना दोनवेळेस अटकही झाली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण यावर त्यांनी अनेक ठिकाणी प्रबोधन केले आणि ‘ग्रामगीता’ची निर्मिती केली. ही ‘ग्रामगीता’ महाराष्ट्रभर आणि देशभर गाजली. अनेक भाषेत ग्रामगीतेच्या आवृत्त्या निघाल्या. अनेक राष्ट्रीय संघटनेत त्यांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले. त्यांनी जपान येथे विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. राष्ट्रपती भवनात त्यांचे खंजिरी भजन विशेष गाजले. महनीय राष्ट्रपती यांनी त्यांना तिथेच ‘राष्ट्रसंत’ ही पदवी बहाल केली.
अनेक राष्ट्रकर्त्यांनी त्यांच्या प्रबोधनाची प्रशंसा केली. त्यात डॉ.राजेंद्र प्रसाद, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन्, पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी इत्यादी महनीय होते. ‘राष्ट्रसंत’ देशासाठी जीवन जगले आणि अमर झाले. राष्ट्रसंतांनी पाकिस्तान युद्धाच्यावेळी सीमेवर जावून त्यांच्या प्रबोधनाने सैनिकांना प्रोत्साहन दिले. 
भारतीय श्री गुरुदेव महामंडळाद्वारे त्यांनी भारतभर कार्य केले. त्यांच्या निधनानंतरही कर्मयोगी तुकाराम दादा यांनी त्या कार्याचा विस्तार केला. त्यानंतर आजही त्यांचे कार्य गुरुकुंज-मोझरी (अमरावती) येथे सुरू आहे. भारतातील एक नाविण्यपूर्ण अध्यात्मिक केंद्र म्हणून आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या राष्ट्रकार्याप्रती नतमस्तक होवून विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली!
सुखदेव सुकळे,श्रीरामपूर
मो.८६००१६६००५

*लेख विशेष सहयोग* 
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११
close