shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नेवासा येथे जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प उभारणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील


अहिल्यानगर / प्रतिनिधी:
संपूर्ण जगाला जीवनाचे तत्वज्ञान  ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनपट उलगडवणारा जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प नेवासे येथे उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

      शहरातील सहकार भवन येथे संत ज्ञानेश्वर सृष्टी विकास आराखड्यासंदर्भात जिल्ह्यातील महाराजांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, रामराव महाराज ढोक, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, देवीदास महाराज म्हस्के, उद्धव महाराज मंडलिक, माजी आमदार पांडूरंग अभंग, वास्तू विशारद अजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
          पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, भगवद्गीतेचा भावार्थ संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगासमोर आणला.  जगाला जीवनाचे तत्वज्ञान देणाऱ्या या ग्रंथाचे २१ भाषेत भाषांतर करण्यात आले.  देशातील असा हा एकमेव  ग्रंथ असून या ग्रंथाच्या निर्मितीबरोबरच जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या पसायदानाची निर्मितीही आपल्या जिल्ह्यातून झाली याचा सर्वांना अभिमान  आहे.
  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी, उज्जैन येथे धार्मिक कॉरिडॉरची उभारणी केली, त्याच धर्तीवर त्र्यंबकेश्वर व नेवासा येथे  कॉरिडॉरची उभारणी करण्याचा मानस आहे. यासाठी सर्वांच्या सहकार्य अपेक्षित असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

     अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव देण्याबरोबरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाकडून  देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
       यावेळी नरहरी महाराज चौधरी, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, देविदास महाराज मस्के, माजी आमदार पांडुरंग अभंग, रामराव महाराज ढोक यांनी संत ज्ञानेश्वर सृष्टी आराखड्याच्या अनुषंगाने सूचना केल्या.
वास्तु विशारद अजय कुलकर्णी यांनी संत ज्ञानेश्वर सृष्टी आराखड्याचे सादरीकरण केले. बैठकीस राज्य व जिल्ह्यातून आलेले साधू-संत उपस्थित होते.

वृत्त विशेष सहयोग
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close