छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचा दिमाखदार लोकार्पण सोहळा संपन्न..!!
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शनिवार ०५ ऑक्टोंबर २०२४
राहुरी विद्यापीठ : छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलामध्ये पाच कृषि संलग्न महाविद्यालयांचा व एका कृषि तंत्रनिकेतनचा समावेश असून राज्यातील नव्हे तर भारतातील एकमेव अशी ही संकल्पना आहे. या कृषि विज्ञान संकुलामध्ये परिसरातील शेतकऱ्यांना येथील प्राध्यापकांद्वारे त्यांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.या संकुलामुळे येथील शेतकऱ्यांचा शाश्वत विकास होणार आहे. यामुळे हे छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल शेतकऱ्यांसाठी कृषि पंढरी ठरेल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील, काष्टी, मालेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करतांना राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनीक बांधकाम (सार्वजनीक उपक्रम) व रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना.श्री. दादाजी भुसे होते. याप्रसंगी व्यासपीठावर खा. श्रीमती शोभा बच्छाव,आ. नरेंद्र दराडे, माजी मंत्री श्री बबनराव घोलप, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य संजीव भोर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.श्री. दादाजी भुसे म्हणाले की आपण सतत पाठपुरावा करून सरकारची मान्यता घेऊन शेती महामंडळाच्या ६५० एकर क्षेत्रावर या कृषि विज्ञान संकुलाची उभारणी सुरु केली. या संकुलाद्वारे भविष्यातील शेतीचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना कृषिचे आधुनिक शिक्षण देण्यात येणार आहे. हे संकुल भविष्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केंद्र म्हणून ओळखले जाईल.
भविष्यात या संकुलाद्वारे विद्यार्थ्यांना पद्युत्तर तसेच आचार्य पदवीचे शिक्षण देण्यात येणार आहे. ना. श्री भुसे पुढे म्हणाले या शासनाच्या दूरदृष्टी धोरणामुळे या परिसरात डाळिंब इस्टेट प्रकल्प आणि नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प येत्या काळामध्ये पुर्नत्वास येणार आहे.मालेगाव येथे नुकतेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयचे लोकार्पण झालेले आहे.जिल्ह्यातील दोन लाखापेक्षा अधिक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला असून १००० तरुणांना युवा कार्य प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यावेळी इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वार तसेच कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी नवीन इमारत व इतर पायाभूत सुविधांची पाहणी केली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतांना कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील म्हणाले कि आजचा लोकार्पण सोहळा हा सुवर्णयोग असून ना. भुसेंच्या अथक प्रयत्नाने या संकुलाची उभारणी शक्य झाली आहे.
या प्रसंगी ना. भुसे यांच्या शुभहस्ते हे संकुल उभारणीमध्ये योगदान असणारे माजी कृषि अधिकारी प्रकाश पवार, वास्तुविशारद संग्राम साळुंखे, इजि. संजय पवार, पाटकर, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, इजि. समीर पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार कृषि विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांनी केले.
यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलसचिव अरुण आनंदकर, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके,कृषि परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, सहयोगी अधिष्ठता डॉ. सात्तप्पा खरबडे, डॉ. बबन इले, प्रा. विवेक कानवडे, डॉ. सोमनाथ सोनवणे, डॉ. संदीप पाटील, कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी, कृषि विज्ञान संकुलाचे विद्यार्थी, पंचक्रोशितील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600